श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
सासूचा हॅपी बर्थडे ! श्री प्रमोद वामन वर्तक
“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”
“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”
“नाही नां, मग ?”
“आई, आज तुमचा एक्सष्टावा वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”
“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”
“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”
“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”
“अजिबात नाही आई, पण डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं तुम्ही ?”
“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”
“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”
“ते जाऊदे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?
तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”
” ए sss क दो sss न चमचे साखर मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा ?”
“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”
“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे, मी का तुम्हांला सांगायला हवं ?”
“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”
“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”
“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”
“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”
“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”
“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं.”
“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”
“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”
“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”
“म्हणजे काय आई, आवडलं नाही का सरप्राईज ?”
“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”
“कोणती ?”
“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”
“मग झालं तर !”
“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”
“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”
“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी तुला करा !”
“हां ही आयडिया पण छान आहे, मी सुचवते विलासला तसं. पण कशानं करायची तुला तुमची ?”
“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”
“अहो पण आई, तुला म्हणजे वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”
“हॊ बरोबर !”
“पण मग ते कसं जमणार आई ?”
“का, न जमायला काय झालं?”
“अहो आई तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळत नाही ! शिवाय एवढा मोठा वजन काटा आपल्याला फक्त लाकडाच्या वाखारीतच मिळेल आणि अशी लाकडाची वखार आता मुंबईत शोधायची म्हणजे…… “
“सुनबाई कळली बरं तुझी अक्कल आणि तुझं गणित पक्क आहे ते !”
“आहेच मुळी! मग आई आता कसं करायच म्हणता तुमच्या वाढदिवसाचं ?”
“काही नाही, माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि सांग या वेळचा केक पण शुगरलेसच आण हॊ आणि त्यावर एकही मेणबत्ती नको म्हणावं !”
© प्रमोद वामन वर्तक
२२-०७-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈