श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😂 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे तुम्ही काय चालवलं आहे ?”

“अरे मोऱ्या मी काय चालवलं आहे ते नंतर, आधी मला सांग, किती दिवस झाले आपल्याला भेटून, काय पत्ता काय तुझा?”

“माझा पत्ता तोच आहे, जो गेली पाच वर्ष आहे तो. पंत तुम्हीच सासू सुनेच्या गोष्टीत रमला होतात गेले काही महिने, त्याच काय ?”

“ते जाऊदे रे ! पण आता इतक्या दिवसांनी आलास ते बरंच झाले.”

“का ?”

“हा प्रसाद घे, कालच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा केली होती, घरातल्या घरात.”

“मी प्रसाद घ्यायला नंतर येतो पंत, माझी अजून अंघोळ व्हायची आहे.”

“मोऱ्या गाढवा, दुपारची जेवायची वेळ झाली तरी अजून तुझी अंघोळ नाही झाली ?”

“हॊ !”

“कारण कळेल मला मोऱ्या ?”

“तुम्ही !”

“अरे मी काय तुला रोज अंघोळ घालायला घरी येतो की काय तुझ्या ?आणि आज आलो नाही म्हणून अजून पारोसा राहिलायस ते ?”

“तसं नाही पंत, पण सकाळ पासून आम्ही नवरा बायको भांडतोय नुसते, त्यामुळे वेळच नाही मिळाला मला अंघोळीला.”

“अरे मोऱ्या पण तुमच्या भांडणाचं कारण काय ?”

“तुम्ही !”

“परत तुम्ही ! अरे काय सारखं तुम्ही, तुम्ही लावलंयस, नीट काय सविस्तर सांगशील की नाही ? आणि असा नुसती लुंगी लावून कसा आलास ? पावसामुळे कपडे वाळले नाही का तुझे ?”

“पंत इथे माझं लग्न मोडायची वेळ आल्ये आणि तुम्ही मला माझ्या कपड्याबद्दल विचारताय ?”

“बरं बाबा नाही विचारात, आता मला सांग तुझं लग्न मोडायची वेळ कुणी आणली बाबा तुझ्यावर ?”

“तुम्ही !”

“मी ? आणि ती कशी काय बुवा ?”

“सांगतो, आपल्या सोसायटीची पावसाळी पिकनिक जाणार आहे १२ सप्टेंबरला, बरोबर ?”

“हॊ, मीच सगळी व्यवस्था करतोय त्याची, जवळ जवळ ६० लोकांचे प्रत्येकी १,५००/- रुपये पण जमा झालेत ! आणि तुमच्या दोघांचे पैसे सुद्धा आलेत बरं का पावसाळी पिकनिकचे.”

” हॊ ना, मग हे सगळं शालनला सांगा !”

“मी कशाला सांगू सुनबाईला, तू नाही  सांगितलंस ?”

“सांगितलं ना ! पण तिचा विश्वास बसायला तयार नाही.”

“का ?”

“अहो आज सकाळी उठल्या उठल्या  मला म्हणते १,५००/- रुपये द्या आधी, मला सोसायटीच्या पावसाळी पिकनिकला जायचं आहे !”

“अरे पण तू तर सुनबाईचे आणि तुझे पिकनिकचे पैसे कधीच भरलेस, हे मी तुला आत्ताच सांगितलं ना ?”

“हॊ पंत, पण ती मला म्हणाली, तुम्ही माझे कुठे पैसे भरलेत पिकनिकचे ? तुम्ही तर त्या सटविला घेवून जाणार आहात ना पिकनिकला आणि लागली भांडायला.”

“आता ही सटवि कोण मोऱ्या ?”

“मालन !”

“कोण मालन ?”

“मला काय ठाऊक ?”

“अरे तू आत्ताच तीच नांव सांगितलंस ना मला मालन म्हणून ?”

“हॊ पंत, पण तुम्ही ते मला सांगितलंत म्हणून, मी ते नांव तुम्हाला सांगितलं.”

“असं कोड्यात बोलू नकोस मोऱ्या गधडया. मी कधी तुला सांगितलं मोऱ्या?”

“अहो पंत, तुम्ही या पावसाळी पिकनिकसाठी व्हाट्स अपचा एक वेगळा ग्रुप बनवला आहे आपल्या सोसायटीचा, हॊ की नाही ?”

“हॊ !”

“त्यात ज्या, ज्या लोकांनी पावसाळी पिकनिकसाठी पैसे दिलेत त्यांची नांव आणि इतर माहिती दिली आहे, बरोबर ?”

“अगदी बरोब्बर मोऱ्या !”

“इथंच लफड झालं पंत !”

“कसलं लफड ?”

“अहो पंत, तुम्ही माझ्या नावापुढे माझ्या बायकोच नांव म्हणून मालन असं टाकलं आहे, शालनच्या ऐवजी!”

“अच्छा, अच्छा असा घोळ झालाय तर !”

“पंत नुसता घोळ नाही, महाघोळ घातलाय तुम्ही. तुमच्या एका ‘शा’च्या ऐवजी ‘मा’मुळे ध चा मा करणाऱ्या आंनदीबाईच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात आणि मला आता ‘पंत मला वाचवा वाचवा’ असं गार्द्याऐवजी, शालन माझ्या मागे लाटण घेवून लागल्यामुळे ओरडायची वेळ आल्ये माझ्यावर, त्याच काय ?”

“त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे मोऱ्या.”

“कोणता पंत ?”

“मी एक काम करतो, सुनबाईला फोन करून माझी चूक कबूल करतो आणि तू दुसरं एक काम कर.”

“काय ?”

“बायकांचा वीक पॉईंट काय सांग बघू.”

“नवीन साडी खरेदी, दुसरं काय.”

“बरोब्बर, म्हणून तू माझ्या चुकीमुळे तुला झालेला त्रास कमी करायला सुनबाईला नवीन साडीच प्रॉमिस करून टाक, म्हणजे बघ तिचा राग कुठल्या कुठे पळून जाईल ते !”

“म्हणजे हे बरं आहे पंत, चूक तुम्ही करायची आणि माझ्या खिशाला खड्डा !”

“खड्डा ? कसला खड्डा ?”

“अहो आता नवीन साडी घ्यायची म्हणजे तीन चार हजार गेले ना.”

“मोऱ्या, मी तुला काय सांगितलं ते तू नीट ऐकलं नाहीस.”

“अहो तुम्हीच सांगितलंत ना शालनचा राग घालवायला तिला नवीन साडी घे म्हणून ?”

“बघ तू परत चूक करयोयस.”

“कसली चूक पंत ?”

“मोऱ्या मी म्हटलं तिला नवीन साडी घ्यायच ‘प्रॉमिस’ कर, नवीन साडी कुठे घे म्हटलं ?”

“म्हणजे ?”

“अरे फक्त प्रॉमिस करायच, आपल्या नेत्यां सारखं ! त्याने सुद्धा सुनबाईचा राग जावून ती खूष होते की नाही बघ.”

“कमाल झाली तुमची पंत, आत्ताच घरी जातो आणि तुमचा उपाय अंमलात आणतो. येतो मी पंत. “

“जा वत्सा, तुजप्रत कल्याण असो !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments