श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
😂 चं म त ग ! 😅 🥪 नवकोट नारायणाचे सँडविच ! 🥪 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“घ्या पंत, तुम्हाला आवडत म्हणून कोपऱ्यावरच्या सँडविचवाल्या कडून मस्त बटर आणि चटणी जादा मारके असं सँडविच आणले आहे, घ्या खाऊन घ्या.”
“मी सँडविच सोडल आहे.”
“काय झालं, तुमच्या नात्यात कोणी गेल…. “
“काहीतरी बोलू नकोस. माझे सगळे नातेवाईक अगदी ठणठणीत आहेत.”
“नाही, तुम्ही सँडविच सोडल असं म्हणालात आणि कोणीतरी गेल्यावरच त्याच्या आवडीचा एक…… “
“तू मला अक्कल शिकवू नकोस. तुला एकदा सांगितले ना की माझे सगळे नातेवाईक ठणठणीत आहेत म्हणून.”
“मग सँडविच सोडल असं का म्हणालात आणि कधी पासून सोडलंत ?”
“आत्ता पासून.”
“पण मग सँडविच सोडायला काही वेगळे कारण घडले का ?”
“होय, अरे ती बातमी वाचली आणि मी या पुढे सँडविचला आजन्म हात लावणार नाही अशी बटर आणि चटणीच्या देखत शपथ घेतली.”
“कोणती बातमी ?”
“अरे भारतीय वंशाच्या एका नवकोट नारायणाने ज्या बँकेत तो काम करतो, त्याच बँकेच्या कॅन्टीन मधून सॅन्डविच चोरले आणि…. “
“काय सांगता काय पंत ? आणि नवकोट नारायण हे…. “
“त्याचे नांव अजिबात नाही. त्याला वर्षाला ती बँके नऊ कोटी वीस लाख रुपये पगार देत होती म्हणून मी त्याला नवकोट नारायण म्हटले. त्याचे खरे नांव…. “
“बापरे, काय सांगता काय पंत? ही बातमी तुम्हाला…. “
“कोणी दिली असच ना ? अरे नेट बिट बघतोस ना? मग तुला अजून ही बातमी कळली नाही म्हणजे नवलच आहे. अरे खरं तर तूच मला ही बातमी….. “
“अहो वाचलीच नाही तर काय सांगणार आणि तुम्ही त्याला पगार मिळायचा असं का म्हणालात …… “
“अरे बँकेने त्याला ताबडतोब निलंबित केले आहे म्हणून पगार मिळायचा असे मी म्हटले.”
“माझा अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाहीये. पण तुम्ही म्हणता…. “
“मी म्हणतो म्हणजे काय? मी माझ्या मनांत येतील तशा बातम्या तयार करतो, असे तर तुला… “
“नाही पंत, पण तुम्ही मला खरं खरं अगदी मनापासून सांगा, तुमचा या बातमीवर, वाचल्या वाचल्या लगेच विश्वास बसला, का तुमच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली ?”
“अरे सुरवातीला खरच वाटेना, पण बातमी नावानिशी, अगदी बँकेचे नांव, तो कुठल्या पदावर होता, आधी कुठल्या बँकेत किती वर्ष होता, हा सगळा तपशील वाचल्यावर मला…. “
“विश्वास ठेवणे भाग पडले, असच ना?”
“हो, नाहीतर त्या नवकोट नारायणाने अब्रुनुकसानीचा दावा नसता का ठोकला त्या बातमी देणाऱ्यावर ?”
“पंत, पण मी तुम्हाला सांगतो हा गडी त्या आरोपातून सहीसलामत सुटणार बघा.”
“हे कसं काय बुवा तू छातीठोकपणे सांगतोस ?”
“सांगतो, सांगतो. काही काही लोक खरच सज्जन असतात, पण त्यांना आपल्या मनांत नसतांना, उगीचच एखाद्या गोष्टीची चोरी करावी असे वाटते आणि ते आपल्याच नकळत ती चोरी करतात त्याला….. “
“क्लेप्टोमनिया म्हणतात हे मला ठाऊक आहे रे, पण अशी गोष्ट खरच अस्तित्वात आहे यावरच माझा विश्वास नाही, त्याचे काय ?”
“तुम्हाला मेगन फॉक्स ही हाँलिवुडची प्रसिद्ध नटी माहित्ये ?”
“इथे मला बॉलिवूडच्या नट नट्यांची नावे माहित नाहीत, तिथे तू हॉलिवूडच्या त्या मेगन का फेगन च्या काय गोष्टी करतोयस !”
“बर, बर कळलं. तर या मेगनला पण तिकडे अनेक वेळा असे हस्तलाघव करतांना कितीतरी मॉलमधे रंगे हात पकडले होते. एव्हढेच कशाला, वॉलमार्ट या जगप्रसिद्ध स्टोरने तर तिच्यावर आजन्म बंदी घातली आहे, आता बोला.”
“मी काय बोलणार, पण ही बंदी का आणि कशासाठी ?”
“अहो या अब्जाधीश बयेला त्या मार्ट मधे लीप ग्लॉसची चोरी करतांना पकडले, ज्याची किंमत होती फक्त सात डॉलर.”
“काय सांगतोस काय ?”
“अहो पंत खरे तेच सांगतोय. पण नंतर ती या रोगाची शिकार आहे असा बचाव तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता तिच्या सुटकेसाठी.”
“कळलं, कळलं मला तुला काय म्हणायचे आहे ते. दे आता ते सँडविच मला. “
“पण पंत तुम्ही तर सँडविच सोडल…. “
“होत आत्ता आत्ता पर्यंत, पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकून मी ते सँडविच कधी एकदा फस्त करतोय असे झाले आहे मला.”
© प्रमोद वामन वर्तक
स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.
मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈