श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! जालीम इलाज ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गुडमॉर्निंग पंत !”
“नमस्कार, नमस्कार कसा आहेस ?”
“बरा आहे.”
“अरे पण तुझ्या आवाजावरून आणि मरगळलेल्या हालचाली वरून, नुकताच एव्हरेस्ट वगैरे चढून आल्या इतका दमलेला वाटतोयस.”
“हो, दमलोय खरा, कारण सध्या वर्क फॉर होम चालू आहे ना माझ !”
“काय ?”
“वर्क फॉर होम म्हटलं मी, काही चुकलं का ?”
“चुकलं म्हणजे काय चुकलंच, अरे आमचा मुलगा वर्क फ्रॉम होम करतोय आणि…. “
“मी वर्क फॉर होम.”
“म्हणजे चुकलं की नाही तुझं ?”
“पण पंत, मी वर्क फॉर होमच करतोय, म्हणजे घरची सगळी काम, स्वयंपाक सोडून एकट्याने करतोय.”
“अरे पण माझा मुलगा…. ?”
“अहो पंत, तो वर्क फ्रॉम होम करतोय, म्हणजे ऑफिसच काम घरून करतोय आणि मी… “
“वर्क फॉर होम म्हणजे घरची काम, बरोबर ?”
“आता कसं बोललात पंत ! सध्या कामवाल्या मावशी येऊ शकत नाहीत कारण…..”
“मला कारण माहिती आहे, पण तुला तुझ्या या वर्क फॉर होम मधे तुझी बायको काही मदत करीत असेलच ना ?”
“अजिबात नाही, ती म्हणते मी तुम्हाला मदत केली तर स्वयंपाकाचे काय, तुमची उपाशी रहायची तयारी असेल तर करते मदत, आता बोला !”
“म्हणजे कठीणच आहे तुझं आता मावशी कामाला येई पर्यंत.”
“हो ना, म्हणूनच माझा आवाज तुम्हाला जरा दमल्या सारखा वाटला असेल.”
“असेल असेल, पण काय रे तुझे कान….. “
“कान ? कान आहेत जाग्यावर पंत आणि मला ऐकायला सुद्धा नीट…. “
“अरे त्या बद्दल नाही मी बोलत पण तुझे कान नेहमी पेक्षा… “
“पंत माझ्या कानाचे काय ते स्पष्ट बोला, उगाच मला कोड्यात टाकू नका.”
“अरे हो हो, किती घाई करशील. जरा मला नीट जवळून पाहू दे बरं तुझे दोन्ही कान.”
“बघा बघा पंत, नीट जवळून बघा पण सकाळी मी दाढी केली तेव्हा ते आपापल्या जागीच होते. मला नाही त्यांच्यात काही फरक… “
“फरक पडला आहे, हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो.”
“फरक आणि माझ्या कानात? मग मला तो सकाळी कसा… “
“दिसला नाही, असंच ना ?”
“बरोबर.”
“अरे त्याच काय असतं, एखादा माणूस बारीक झाला आहे किंवा जाड झाला आहे, ते दुसऱ्याने त्याला बरेच दिवसांनी बघितलं तर… “
“कळत हे मला माहित आहे. पण ते सगळे सोडा आणि माझ्या कानाचे काय ते… “
“ते थोडे मोठे झाल्या सारखे वाटतायत मला.”
“काहीतरीच काय पंत, कान कसे मोठे होतील ?”
“का नाही होणार? अरे जिथे माणसाची उंची सुद्धा जसजसे वय वाढते तसतशी कमी होते, तर तुझ्या कानांचे काय घेऊन बसलास !”
“आता ही तुमची नवी थियरी वाटत ?”
“माझी कसली नवी थियरी? मी काय शास्त्रज्ञ थोडाच आहे माझी स्वतःची अशी थियरी मांडायला.”
“मग कशावरून तुम्ही म्हणताय की…. “
“तुझे कान मोठे झालेत म्हणून ?”
“ते नाही हो पंत, माणसाची उंची वय वाढत चालल की कमी कमी होते म्हणून.”
“अरे तुमचं प्रगत विज्ञानच म्हणतय तस, मी कशाला म्हणायला हवंय.”
“काय सांगताय काय पंत, खरच असं…. “
“होत, तुला खोटं वाटत असेल तर गुगल मारून बघ.”
“ते तर मी बघिनच पण….”
“अरे त्या गुगलवरच मी हे कधीतरी वाचल होत, ते आठवलं आणि म्हणून तस म्हणालो मी.”
“हो, पण पंत वय वाढतांना उंची कमी होण्याची काही कारण दिली असतील ना त्यात ती… “
“अरे उंची कमी होते म्हणजे वय वाढते तसतशी माणसाची हाडं काही प्रमाणात आकुंचन पावतात आणि… “
“त्याचाच परिणाम माणसाच्या उंची कमी होण्यावर होत असणार, बरोबर ?”
“बरोबर, अगदी फ्रॅक्शन ऑफ इंचेस मधे हा उंचीच्या बाबतीत फरक पडतो, पण त्यामुळे तो डोळयाला तसा जाणवत नाही इतकंच.”
“ते सगळे खरच असेल म्हणा, पण माझे कान मोठे होण्याचे कारण काय ?”
“मला वाटत तो तुझ्या वर्क फॉर होमचा परिणाम असावा !”
“काहीतरीच काय पंत, कसं शक्य आहे ते ?”
“हां, इथे मी माझी थियरी सांगतो तुला, बघ तुला पटते का ती.”
“बोला पंत, बोला, मी अगदी उत्सुक आहे तुमची थियरी ऐकायला.”
“आता असं बघ, हल्ली तू चौवीस तास घरीच असतोस वर्क फॉर होम करत, तेव्हा बायको तुला आता हे करा, ते करा, हे आत्ता नका करू असं सारखं कामाच्या बाबतीत सुनावत असेल ना, त्याचाच परिणाम होऊन तुझे कान… “
“खरच मोठे झाले असतील ?”
“अगदी गर्दभा एव्हढे नाही, पण फ्रॅक्शन ऑफ इंचेसने नक्कीच मोठे झाले आहेत.”
“असेल, असेल तसही असेल कदाचित. पण पंत आता मी निघतो, नाहीतर बायकोचा तोफखाना सुरु व्हायचा माझ्या नावाने.”
“जा, जा आणि कानाची जास्त काळजी करू नकोस, तुझं वर्क फॉर होम संपल की येतील ते जाग्यावर. पण जाण्या आधी माझ एक काम सांगतोय ते जरा करशील का?”
“का नाही पंत, सांगा ना काय काम आहे ते तुमचे.”
“अरे काल माझ्या डोंबिवलीला राहणाऱ्या करव्याचा फोन आला होता.”
“हां, म्हणजे डोंबिवलीला स्टेशनं जवळच ज्यांची सोसायटी आहे तेच कर्वे काका ना ?”
“हो, त्याला सध्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, झोप लागत नाही रात्री.”
“मग डॉक्टरकडे जा म्हणावं त्यांना.”
“अरे तो गेला होता, डॉक्टरने त्याला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला, पण त्या घेऊन सुद्धा त्याची झोप उडालेली ती उडलेलीच, म्हणून त्यानं मला फोन केला, काही उपाय आहे का विचारायला.”
“मग तुम्हाला उपाय सापडला की काय त्यांच्या झोपेवर ? “
“हो अगदी जालीम इलाज सापडला आहे आणि त्या साठीच मला तुझी मदत हवी आहे.”
“बोला पंत काय मदत करू मी तुम्हाला.”
“अरे तुझ्याकडे टेपरेकॉर्डर आहे ना त्यावर मला, एका कॅसेटवर ट्रेन धावल्याचा आवाज रेकॉर्ड करून देशील का ? “
“हो, पण त्यानं कर्वे काकांचा झोपेचा प्रॉब्लेम…. “
“नक्कीच सॉल्व होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे !”
“तो कसा काय पंत ?”
“अरे असं बघ, त्याची सोसायटी ट्रॅकला लागून आहे आणि सध्या सगळ्या ट्रेन बंद म्हटल्यावर या पठ्याला झोप कशी लागणार, रोजचा ट्रेनचा खडखडाट ऐकल्या शिवाय, काय खरं ना ?”
“मानलं तुम्हाला पंत !”
“मानलंस ना, मग आता लाग सांगितलेल्या कामाला आणि मला ती रेकॉर्डेड कॅसेट आणून दे लवकर. एकदा ती करव्याला कुरिअर केली की मी निवांत झोपायला मोकळा.”
“धन्य, धन्य आहे तुमची पंत !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
२७-१२-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈