श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! 🎲 शकुनी महिला मंडळ ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
चाळीतले “शकुनी” महिला मंडळ सकाळची काम आटपून, रोजच्या प्रमाणे दुपारी जिन्या जवळच्या मोकळ्या चौकात, चाळगोष्टी करायला जमले होते. प्रत्येकीच्या हातात काही ना काही निवड, टिपण, शिवण (स्वतःच्या घरचे) होतेच ! आता तुम्ही म्हणाल “शकुनी” महिला मंडळ म्हणजे ? शकुनी तर कपटी पुरुष होता आणि महिला मंडळाला “शकुनी” महिला मंडळ हे नांव कसे काय पडले ? मी तुम्हाला शकुनीच्या फाशांची शपथ घेवून सांगतो, की महिला मंडळाला हे असे नांव ठेवण्यात माझा फाशां प्रमाणे त्याच्या पटाचाही संबंध नाही ! पण तुमचा प्रश्न रास्तच आहे आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसण्याचा पण संभव आहे ! त्या महिला मंडळाला असे नांव सर्वानुमते त्यांच्याच मुला मुलींनी दिले होते, आता बोला ! त्या सगळ्यांनीच सध्या टीव्ही वर चालू असलेले महाभारत बघून त्यात दाखवलेल्या शकुनीच्या द्यूतामुळे महाभारताचे रामायण घडले, अशी आपल्या बाल मनांची समजूत करून घेतली असावी ! त्यामुळे चाळीत आपापल्या आयांमुळं, अगदी महाभारत होत नसले, तरी कायम शीतयुद्ध सुरूच असते, या समजुतीतून त्यांनी हे नांव महिला मंडळाला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही !
तशी “शकुनी” महिला मंडळाची सभासद संख्या जरी जास्त असली, तरी यंग टर्क्सच्या मते त्यांच्या पैकी शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकू, चाळीतल्या आतल्या बातम्या काढण्यात जेम्स बॉण्डवर मात करतील अशा ! त्यामुळे त्या तिघींच्या आडनावाचे आद्याक्षर वापरून “शकुनी” हे नांव त्यांनी मंडळाला बहाल केले होते असे पण काही लोक म्हणतात !
आज जरा बऱ्या पैकी ऑडियन्स जमलेला बघून जोशीणीने पहिला फासा टाकला ! “तळ मजल्यावरची चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली वाटत !” हे ऐकताच सगळ्या महिला मंडळाचे हात, जे काही निवड, टिपण करत होते, ते एकदमच कोणीतरी स्टॅचू केल्यागत थिजल्या सारखे झाले ! पण स्वतः जोशीण मात्र काहीच झालं नाही अशा अविर्भावात पुन्हा तांदूळ निवडायला लागली. हा धक्का पचवायला सकल महिला मंडळाला साधारण सारखाच वेळ लागला आणि सगळ्यांनी एकदमच बोलायला सुरवात केली. “काय सांगतेस काय? कुणाबरोबर गं?” “माझा तर बाई विश्वासच बसत नाहीये” “नेहमी खाली मान घालून जाणारी, साधी राहणारी असं काही…. ” “हो ना, तिच्या वयाच्या मुली नको नको ती फॅशन करत असतांना, ही अजून साडीत…. ” “म्हणजे अगदी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली…. ” तो गलका ऐकून जोशी काकू म्हणाल्या “माझं जरा ऐका, मी म्हटलं ‘चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली !’ अजून तशी खात्रीलाय बातमी यायची…. ” तिला मधेच तोडत साने काकू म्हणाल्या “म्हणजे अजून तुला नक्की माहित नाही, तर कशाला उगाच तीच नांव खराब करतेस ? अशांन तीच लग्नतरी होईल का ?” यावर साठे काकूंनी पण जोशी काकुंवरचा आपला राग व्यक्त केला आणि म्हणाल्या “तुला ना त्या टीव्ही वरच्या बातम्या देणाऱ्यांसारखी घाई असते, बघा आमच्याच चॅनेलने ही बातमी प्रथम तुमच्या पर्यंत आणली….” तेवढ्याच ठसक्यात जोशीण म्हणाली “अग बरेच दिवसात दिसली नाही म्हणून म्हटलं पळून गेली की काय, कारण तीच्या प्रेम
प्रकरणाची बातमी तूच तर आम्हाला दिली होतीस !” हे ऐकताच साठे काकू परत खाली मान घालून गहू निवडायला लागल्या. ते बघून जोशीणीला मनोमन आनंद झाला आणि तिने आपला मोर्चा साने काकूंकडे वळवला “आणि साने काकू लग्न न व्हायला काय झालंय नलूच, हिरा कितीही लपवला तरी चमकायचा राहतो का ?” हे ऐकताच सावंत काकू म्हणाल्या “आता ही हिरा कोण ?” त्यांच हे बोलण ऐकून मंडळात एक हास्याची लहर उठली. सावंत काकूना काही कळेना, पण आपल्या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाहीत हे बघितल्यावर त्या पुन्हा हातातली गोधडी शिवायला लागल्या.
त्या हास्य लहरीत वातावरण थोडं निवळत असतानांच, हातात दोन मेथीच्या जुड्या घेवून स्वतः चितळे काकू हजर ! त्यांना पाहताच जणू काहीच झाले नाही, या थाटात साने काकू त्यांना म्हणाल्या “छान दिसत्ये मेथी, कुठून आणलीस गं ?” “अग यांच्या ओळखीचा एक भाजीवाला आहे नाशिकचा, त्याच्या कडून हे घेवून आले !” “पुढच्या वेळेस मला पण दोन जुड्या सांग हं, आमच्यकडे पण मेथी फार आवडते सगळ्यांना.” “हो सांगीन ना, त्यात काय एवढं आणि हो आणखी कोणाकोणाला हवी असेल तर आत्ताच सांगा म्हणजे एकदम आणायला बरी.” मग प्रत्येकीनं आपआपली ऑर्डर दिली पण जोशीण काही बोलायला तयार नव्हती.
ते बघून साठीणीला पण चेव आला आणि ती मुद्दामच तिला म्हणते कशी “काय गं, तुला नको का नाशिकची मेथी ?” “नको हो, आमच्याकडे माझ्याशिवाय कोणीच खात नाही. पण तुम्ही एक कामं करा, तुम्ही भाजी केलीत की द्या वाटीभर पाठवून, कडू असली तरी गोड मानून खाईन हो !” हे ऐकताच साठीणीचा चेहरा पाहण्या सारखा झाला. पण ती खमकी तशी जोशीणीची पाठ सोडायला तयार नव्हती. वरकरणी हसत म्हणाली “हो देईन की त्यात काय एवढं !” पण मनांतून जोशीणीच्या बातमीची खात्री करायला, स्वतः चितळे काकू हजर असल्याचा फायदा घेण्याचे ठरवून, तिने जोशीणीकडे पहात चितळे काकूंना डायरेक्ट सवाल केला, “काय हो काकू, हल्ली तुमची नलू दिसली नाही बरेच दिवसात. तब्बेत वगैरे बरी आहे ना तिची ?” “हो अगदी मजेत आहे, तिला काय होतंय !” “तसं नाही पण जोशी काकू म्हणत होत्या….. ” साठीणीला मधेच थांबवत जोशीण म्हणाली “हो बरेच दिवसात दिसली नाही ना, म्हणून जरा काळजी पोटी विचारत होते की नलूला कुणी बघितलीत का !” जोशी काकूंच्या या बोलण्यावर साठे काकूंनी बोलायला तोंड उघडले, पण त्या आधीच चितळीण बोलती झाली, “नाही तुमच सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे, पण तिची तब्येत अगदी ठणठणीत आहे, काळजी करायच काहीच कारण नाही.” “ते चांगलंच आहे, पण चाळीत कुठे दिसली नाही…. ” “अहो साठे काकू ती घरात असेल तर दिसेल ना?” “म्हणजे मग आम्ही जे ऐकलं ते खरच…” “हो खरच आहे ते, ती सध्या ओबेरॉय मध्ये राहते आहे !” “म्हणजे ?” “अहो ती गेल्याच महिन्यात US वरून आली आणि सेल्फ क्वारंटाईन साठी म्हणून एअरपोर्ट वरून डायरेक्ट ओबेरॉयला अठ्ठावीस दिवसासाठी !” चितळे काकूंचे बोलणे ऐकून तमाम महिला मंडळ जोशीणीकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागले आणि जोशीण खाली मान घालून परत तांदूळ निवडायला लागली. आणि एकीकडे मंडळाच्या तीन आधारस्तंभानी म्हणजे शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला !
© श्री प्रमोद वामन वर्तक
१७-०१-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈