सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ चंद्रभागेतीरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

आषाढी कार्तिकी भक्तजन येती

(कार्तिकी एकादशी निमित्ताने एक छोटासा लेख)

चंद्रभागेतीरी। भक्तांची ही दाटी।

चालतसे वाटी । पंढरीची ।।

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता स्त्रिया, पुरूष, आबालवृद्ध सर्व भक्तगण माथ्यावर तुळस घेऊन आणि मुखाने हरिनाम घेत पंढरीची वाट चालत असतात.

वारी म्हणजे भक्तीचा उत्सव!भक्ताचा परमेश्वराशी संवाद!अनन्यसाधारण भक्ती!

चौर्‍यांशीलक्ष योनीतून फिरत फिरत हा मानवाचा जन्म लाभलेला आहे.आता ओढ लागली आहे ती मोक्षाची.ह्या मोक्षाप्रती जाण्यासाठी एकच मार्ग म्हणजे भक्तीयोग!परमेश्वराला कुठेही शोधत फिरण्याची गरज नाही.तो जीवात्मा आहे.त्या ह्रदयस्थ परमेशाशी एकरूपता होणे म्हणजेच परमेश्वराशी मीलन होणे.

पांडुरंग हा दासांचा दास आहे.आपल्या भक्तांसाठी तो प्रगट होतो व त्याचे रक्षण करतो.म्हणून विठूमाऊलीचे अखंड भजन करावे असे संत तुकाराम त्यांच्या कित्येक अभंगांतून साधकांना सांगत असतात.ते म्हणतात,

दास करी दासांचे । उणे न साहे तयाचे ।

वाढिले ठायीचे । भाणे टाकोनिया द्यावे ।।

ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर ।

सर्वस्वे उदार । भक्तालागी प्रगटे ।।

वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला ही पांडुरंगाच्या भेटीची तळमळ लागून राहीली आहे. विठूच्या दर्शनाच्या ह्या तळमळीने त्यांच्या शरीराला कोणतेही क्लेश जाणवत नाहीत कारण प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना आश्रय दिला आहे.

साधकाने चिंता कशाची करावी?भार वहाण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर ठाकला आहे.तेव्हा पांडुरंगाशी समर्पण केले की योगक्षेम  वहाण्यासाठी भगवंत सतत भक्ताच्या पाठीशी उभा आहे.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments