श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ चरैवती चरैवती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ‘ रामम रमेशम भजे ‘ असे शब्द यायचे. लहानपणी ‘ भजे ‘ म्हणजे भजणे किंवा आळवणे हा अर्थ माहितीच नव्हता. पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.
तसेच कधीतरी ‘ चरैवती चरैवती ‘ हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ‘ सारखा चरत असतोस ‘ त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ‘ चरैवती चरैवती ‘ शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता.
नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील ‘श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं
यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥’
यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका) अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला.
पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते.
झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ‘ दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ‘ चरत जा ‘ ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ‘ बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ‘ डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ‘ यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,’ अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ‘
मग काय पुन्हा ‘ चरैवती चरैवती ‘ आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू.
लेखक – श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈