सुश्री मानसी विजय चिटणीस
विविधा
☆ “चैत्रांगण…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा आसनावर किंवा झोक्यावर बसवली जाते. रेशमी वस्त्रे, मोगरीची फुलं, चंदनगंधाचे विलेपन यांनी तिला सजवले जाते..माहेरपणाला आलेली लाडाची लेकच जणू.. त्या झोक्यात बसलेल्या गौरीला पाहून मला इंदिराबाईंची, ‘आली माहेरपणाला’ ही कविता आठवते नेहमी..
“आली माहेरपणाला
आणा शेवंतीची वेणी
पाचू मरव्याचे तुरे
जरी कुसर देखणी “
सासरी राबून थकलेल्या लेकीला विसाव्याचे चार क्षण मिळावेत, तिला आनंद व्हावा, तिच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून आईची कोण धडपड..लेक माहेरपणाला आलीय, कुठे तिच्यासाठी शेवंतीची वेणी कर, कुठे तिच्या पोलक्यावर पाचू जडव तर तिला सुगंध आवडतो म्हणून तिच्यासाठी मरव्याचे अत्तर बनव..आईची ही सारी धडपड संसारीक वैशाखाने रणरणलेल्या लेकीच्या मनाला थोडा तरी गारवा मिळावा..
चैत्र, चांद्रवर्षाचा पहिला महिना. या महिन्यातल्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र अवकाशात असते म्हणून हा चैत्र महिना. ऋतूराज वसंताचा लाडका महिना..आणि म्हणूनच या काळात येणाऱ्या नव्या तांबूस पोपटी पालवीला चैत्रपालवी म्हणतात. साऱ्या सृष्टीचे सृजन या काळात होते. म्हणूनच आदिशक्ती आणि शिव या सृष्टीच्या उगमकर्त्यांचे पूजन या महिन्यात करण्याचा प्रघात पडला असावा. भारतात अनेक ठिकाणी या काळात गणगौरी पुजन युवती आणि विवाहित स्त्रीया करतात. आपल्या घरी हळदीकुंकू करतात. मनाला आणि शरीराला गारवा देणारे मोगरीची फुले, ओले हरभरे, विड्याचे पान-सुपारी, कलिंगड, आंंब्याची डाळ आणि पन्हे यांचे वाण दिले जाते. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने माय-लेकी, बहिणी-बहिणी, मैत्रीणी एकमेकांना भेटतात..एकमेकींची सुखदुःख निगूतीने ऐकतात..त्यावर फुंकर घालताना आपल्या डोळ्यांतील पाणी लपवतात.
मला आठवतंय..लहानपणी, जेव्हा गौरीला झोक्यात बसवलं जायचं तेव्हा मी ही आईकडे झोक्यासाठी, गौरीसारखं नटवण्यासाठी हट्ट करायचे तेव्हा कधी आई गालातल्या गालात हसायची तर कधी डोळ्यांत पाणी आणायची. आज तिच्या त्या वागण्याचा अर्थ कळतोय. स्त्रीचे भावविश्व अशा सणवार व्रतवैकल्य यांच्याशी जोडलं गेलयं. चैत्रगौर ही सृजनदेवता आणि स्त्री देखील..हे मांडलं जाणारं चैत्रांगण किंवा हळदीकुंकू हे याच सृजनाचं संक्रमण असावं. एका उर्जेचा एकीकडून दुसरीकडे चालणारा प्रवास असावा. चैत्र हा ही सृजनसखाच..तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या चैत्र महिन्यात अंगणात; मग ते अंगण ग्रामिण असो की शहरी.. चैत्रांगण रेखाटले जाते. ६४ शुभचिह्नांनी युक्त अशा या रांगोळीत चैत्रगौर, तिचे पती शंभू महादेव, तिचे सौभाग्यालंकार, मोरपीस, बासरी, ती जगत्जननी असल्याने सूर्य चंद्रापासून साप-हत्तीपर्यंतचा तिचा संसार रेखला जातो. तिची पावले, तिच्या अस्तित्वाचे प्रतिक असलेले स्वस्तिक आणि तिचे आवडते कमळ, तिच्या पुजेसाठीचे शंख, घंटा, ध्वज असे सारे ऐवज रेखले जातात. ते चैत्रांगण बघताना वाटते की कुणा चिमुकलीची भातुकलीच मांडली आहे की काय? या साऱ्या रांगोळीचे रेखाटन चैत्र महिना संपेपर्यंत केले जाते.
माहेरपणाला आलेल्या गौरीला पाळण्यात बसवले जाते. पाळण्यात बसवण्यापूर्वी देवीच्या मुर्तीला अंघोळ घालून, पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. फुलांची सजावट केली जाते. देवीसमोर वेगवेगळे पदार्थ, देखावे यांची आरास मांडली जाते. खिरापत म्हणून सुके खोबरे व साखर दिली जाते. छोट्या तांब्यात देवीसाठी पाणी भरून ठेवले जाते.बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे, पन्हे आदी पदार्थ देवीसाठी केले जातात व नंतर हळदी कुंकू करून वाण म्हणून दिले जातात. सुगीच्या हंगामात केल्या जाणाऱ्या या व्रतात आपली मुले-बाळे, घर-दार यांच्या सुखसमृद्धी ची मनोकामना केली जाते.
अशा या माहेरपणासाठी आलेल्या लेकीचे कौतुक करण्यासोबतच सृजनाचीही पूजा केली जाते. लेकीचे कोडकौतुक करताना लेकीने आईपासून लपवलेले अश्रू असोत की मनातले सल.. चैत्रांगण टिपतेच असे स्त्रीभावनांचे गूढ पदर..
डोळ्यांत आसू अन् ओठांवर हसू
सुखाच्या ओंजळीत दुःखाचे पसू…
या आणि अशा अनेक झळांवर गारव्याचे लिंपण म्हणून तर झोक्यातले झुलणे आणि चैत्रातले रेखाटन असेल का?
चैत्रांगण
© सुश्री मानसी विजय चिटणीस
केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈