डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ चहा – जपानी समारंभ ‘चाडो’ ☕ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
चहाची तल्लफ ? होय ना ? मग ऑफिस मध्ये. मीटिंग मध्ये ,कुणाच्याही भेटी दरम्यान ,प्रवासात आणि वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा या चहाची तल्लफ आपल्याला येतेच. काही वेळा तर चहा ची वेळ हे सासूबाई किंवा आज्जेसासूबाई यांचे घड्याळ असते. पण ही तल्लफ मोठी वाईट. ठरलेल्या वेळेला चहा नाही मिळाला तर काहींचे डोके चढते …म्हणजे दुखायला लागते. चिडचिड होते. काही कामाच्या ठिकाणी दिवसभरचा कामाचा ताण बाजूला ठेऊन जरा निवांत वेळ मिळण्यासाठी चहासाठी ब्रेक घेतात. टी-टाईम. (कुठल्याही ऑफिस मधले लोक १० मिनिटांच्या चहाला तास भराचा फेर फटका मारतात ही गोष्ट वेगळी.)
चहा सुद्धा ठराविक ब्रॅंड चा प्यायचा अशी सवय जडली असते. कोणाला भेटायला बोलवायचे तेंव्हा आपण म्हणतोच “चहाला या” यात लपलेला अर्थ म्हणजे ‘गप्पा मारायला या’.(चित्रपट गीतात “शायद मेरे शादी का खयाल दिल मे आया है, इसिलीये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है” हेच ते बोलणे या वेळी करायचे असते.)ते असो. पूर्वी आपल्याकडे चहा सुद्धा पित नसत. आमच्या लहानपणी आम्ही चहा मागितला की चहाची सवय लागू नये म्हणून ,आज्ज्या, मावश्या, काकू आम्हाला भीती दाखवायच्या. की, लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो ,कोणी म्हणायचे चहा प्यायला की काळे होतो. आज चहाचे आवडते ब्रॅंड आहेत. आता मात्र याला मोठेच सांस्कृतिक महत्व आलेले दिसते. सुर्रर्र….के पियो … अशा चहाच्या उत्पादनाच्या अनेक जाहिरातीतून चहा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला आहे हे कळते. म्हणून तर चहा प्रेमींसाठी ‘२१ मे’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे जाहीर केला आहे.
चहा म्हणजे चा या चीनी भाषेतून रूढ झालेला शब्द. तोच मग चीनी भाषेतून भारत, जपान, इराण, रशिया या देशातून सुद्धा थोड्या फार प्रकाराने रूढ झाला. डच लोकांनी हा शब्द जावा मार्गे युरोपात नेला असे म्हणतात.चहा चे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस. चहा ची ही वनस्पति झुडुपे या प्रकारात मोडते. याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्तेजक पेय तयार होते तोच चहा.चीनी दंतकथेत चहा हे उत्तेजक पेय म्हणून उल्लेखलेले असले तरी Erhya या चीनी शब्दकोशानुसार चहा ही औषधी वनस्पति म्हणून लोकांना परिचित होती. केवळ चहाच्या पानांच्या उत्पादनांसाठी याची लागवड केली जाते. हाच चहा आता जगातील निम्मे लोक पितात आणि हे पेय लोकप्रिय आहे. म्हणूनच चाय पे चर्चेला आणि दैनंदिन आहारामध्ये व आदरातिथ्यात ‘चहाला’ महत्व आहे. सातव्या आणि आठव्या शतकात म्हणे चीन मध्ये चहा इतका लोकप्रिय झाला होता की चहावर चीनी सरकराने कर बसवला होता . चीन मध्ये चहा वर ग्रंथ सुद्धा आहे. त्याचे नाव आहे ‘चा चिंग’,आठव्या शतकातील हा ग्रंथ, चहाचा इतिहास व चीन मधील ही मूळ वनस्पति याची माहिती देतो. असे म्हणतात की बौद्ध भिक्कुंमार्फत चहा पिण्याची ही सवय चीन मधून युरोपात पोहोचली. मग पुढे याचा प्रसार झाला. सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान जपान मध्ये प्रथम चहा गेला. आता तर चहापान विधी तिथे घराघरात महत्वाचा समजाला जातो. सर्व आशियाई देशात पण हा प्रसार झाला.
जपान मध्ये चहा समारंभ –
जपानी चहा समारंभ ‘चाडो’. द वे ऑफ टी, म्हणून ओळखला जाणारा हा समारंभ एक सांस्कृतिक परंपरा समजली जाते. १५०० च्या काळात सेन नो रिक्यु यांनी जपानी चहा संस्कृतीत क्रांति घडवून आणली आणि त्याला एक कला प्रकार म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. चीनी चहाचे पूर्णपणे जपानीकरण केले. तेंव्हा पासून चहाचे घर, चहाची बाग, चहाची भांडी, चहा समारंभाचे नियम असे लागू करून सौंदर्य पूर्ण चहा समारंभ होऊ लागले. सेन नो रिक्यु ने या समारंभाचे योगी नियोजन होण्यासाठी सात नियम घालून दिलेले आहेत. चहा समारंभासाठी म्हणजे चानोयू साठी हे जपानी परंपरेतले एक घर / वास्तू ‘चशीत्सू’ हे चहाघर म्हणून वापरले जाते. आपल्याकडे जशी अमृततुल्य चहा ची दुकाने अथवा चहा टपर्या ठिकठिकाणी आढळतात तशीच.यात चहा शिकविणारे असतात चाय मास्टर म्हणजे तज्ञ त्यांना ‘तेशू’ म्हणतात.
चहा घर – चशीत्सु
सेन नो रिक्यु यांच्या पतवंडांनी म्हणजे पुढच्या पिढिंनीही या संकल्पनेचा विकास करत आणला. या पद्धती शाळेच्या पाठ्यक्रमात लावल्या गेल्या आहेत. त्यांनी तर ओमोटेसेन्के , उरासेन्के आणि मुशाकोजिसेन्के या चहा शाळांची स्थापना केली.या तीन प्रमुख शैली आहेत. यातील शाळा आजही सुरू आहेत. पुढे चहा संमेलनाचे औपचारिक आणि अनौपचारिक वर्ग पडून वर्गीकरण झाले. तिथे शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठात चहाचे क्लब आहेत.
उरासेंके शाळेचे पंधरावे ग्रँड मास्टर सेन गेंशीत्सू यांनी केलेल चहा समारंभ
जसे आपल्याकडे पाककृतींचे वर्ग घेतले जातात तसे तिथे वेगवेगळ्या लोकांसाठी चहाच्या सशुल्क शाळा चालतात. हे विद्यार्थी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असे असतात.म्हणजे थोडक्यात क्लासेस.त्यात काय शिकायचे असा प्रश्न आपल्याला पडेल पण खरच हा एक समारंभ असा असतो की त्या शाळेत प्रवेश करण्यापासून चे नियम , शिस्त, प्रथा, मॅनर्स अगदी दार कसे उघडायचे,आत आल्यावर तातामी मॅट वर कसे चालायचे , इथपासून भांडी कोणती वापरायची, कशी वापरायची, कशी धुवायची, कशी मांडायची, आलेल्यांचे स्वागत कसे करायचे , कोणाला आधी नमन करायचे, यजमानाने चहा समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांशी कसे वागायचे आणि पाहुण्यांनी पण वागताना कोणते नियम पाळायचे असे एव्हढे संस्कार/पद्धती या शाळेत शिकविले जातात. पाहुण्यांनी चहा समारंभाला आल्यानंतर आत जाण्याआधी चपला बूट बाहेर काढून, हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच जायचे असते.तेही यजमानांनी आदरपूर्वक बोलवल्यानंतरच . तो पर्यन्त वेटिंग रूम मधेच थांबायचे असते. एक राऊंड झाल्यानंतर मध्यंतर असते, त्यात चहा च्या खोलीची स्वच्छता होते पुन्हा पाहुण्यांना आदराने आत बोलावले जाते. एका वेळी पाहुण्यांची संख्या साधारण ५ असते. असा हा समारंभ किमान अर्धा तास ते जास्तीत जास्त चार तास चालू असतो. हा, वेळ पाहुण्यांची संख्या ,चहा सादरीकरणाची पद्धती, जेवण व चहाचे प्रकार यावर अवलंबून असतो. अशी ही मोठी प्रक्रियाच असते.
चहाच्या या औपचारिक कार्यक्रमावेळी ताजे जेवण दिले जाते त्याला कैसेकी किंवा ‘चा- कैसेकी’ म्हणतात. या समारंभासाठी यजमान विशेष कपडे ‘किमोनो’ घालतात. किमोनो हा जपानचा राष्ट्रीय पोशाख आहे. शाळा, प्रसंग, त्या वेळचा ऋतु, उपकरणे अशा अनेक घटकांवर ही चाडो म्हणजे (the way of tea)पद्धत आधारित असते. म्हणजे चहा समारंभ केवळ चहा पुरताच मर्यादित नसतो तर या वेळी छोटेसे भोजन पण असते. याचे महत्व म्हणजे आस्वाद घेणे आणि आनंद देणे असते.
अशा शाळांतून चहा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळते. हे ऐकलं की आपल्याकडे सुद्धा संगीत, शिवण, कला याबरोबर पाककौशल्य किंवा चहा, कॉफी, सरबते शिकवण्यासाठी एखादा तास असायला हरकत नाही ,नाही का ? पण एक मात्र आहे , आपल्या मुलामुलींना चहा नक्कीच करता येतो.नव्हे यायलाच हवा त्यासाठी कशाला शाळा हव्यात ? हं चहा करून झाल्यावर तो सर्व्ह करतांना ,किंवा कपात चहा ओतताना हातावर कंट्रोल हवा ,तो ट्रे मध्ये, खाली जमिनीवर सांडू नये , कपातला चहा बशीत सुद्धा सांडू नये देताना, असे शिक्षण द्यायला हवे पालकांनी. हेच ते मॅनर्स, शिस्त जपानी चहा समारंभात शिकवले जातात.
पाहिलंत, हा जपानी चहा समारंभ म्हणजे नुसता एक सोहळा च नसतो तर तो सद्भाव, सन्मान, पवित्रता आणि शांतीचे प्रतीक असलेली, एक आध्यात्मिक अभ्यासाची पद्धत मानली जाते. त्यात इतिहास आहे, संस्कृती आहे, सौंदर्य शास्त्र आहे , सामाजिक एकोपा वाढवण्याचे साधन आहे. शिवाय त्यात कला आहे, स्वच्छता आहे , नीटनेटकेपणा आहे, आतिथ्य आहे. नम्रता आहे, शिष्टाचार आहे. विविध शैली आहेत.
मग काय कधीही जपान टूरवर जाल तेंव्हा नक्की या समारंभाला जाणीवपूर्वक हजर रहा. तिथला अमृततुल्य पिऊन या. आपल्या इथल्या आसाम – दार्जिलिंग सारखे चहाचे मळे पण बघून या. संस्कृतीतला फरक बघाल तेंव्हाच महत्व अनुभवाल, तर अशी ही जपानी चहा संस्कृती ! वाचली म्हणून सांगितली.
© डॉ. नयना कासखेडीकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈