सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ चंदू चॅम्पियन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
प्रत्येक दिवशी सूर्य एकाच दिशेला आणि साधारण सकाळीं त्याचं वेळेला उगवतो तरीही गंमत बघा प्रत्येक दिवस हा रोज अगदीं निराळाच असतो. कधी खूप आशा एकवटल्या असताना हवे तसे मनासारखे घडत नाही आणि कित्येकदा ध्यानीमनी नसताना परमेश्वराने लीला केल्यागत खूप काही आपल्या कल्पनेपेक्षाही आपल्या पदरात घालतो की आपली ओंजळ भरगच्च भरते.
मागील सोमवार असाच माझ्यासाठी काहीही कल्पना नसतांना खूप काही देणारा असा उजाडला. अमरावतीला मनापासुन तळमळीने समाजासाठी भरघोस काम करणारे सुप्रसिद्ध गोविंद काका कासट आणि सुदर्शनजी गांग ह्यांनी भरीव प्रेरणा मिळवून देणारा “चंदू चॅम्पियन” ह्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन सरोज टॉकीज मधे केले होते. त्या चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठीच्या निमंत्रक यादीत माझे नाव असल्याने मला एक सुखद धक्का दिला. आणि त्यामुळेच मी एक खूप जास्त सकारात्मक आणि शब्दात वर्णन करता येणार नाही असा सुंदर चित्रपट बघण्याचे भाग्य मला लाभले. आता ह्या चित्रपटाविषयी माझ्या शब्दात.
त्यासाठी आधी आपल्याला हे मुरलीधर पेटकर कोण, त्यांचे कार्य काय हे जाणून घ्यावे लागेल. मुरलीकांत पेटकर हे स्वतः एक अत्यंत विलक्षण जीवन जगले आहेत. पेटकर म्हणजे एक नम्र , अत्यंत प्रामाणिक, आणि समर्पित जीवन जगणार अफलातून व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. त्यांनी कठोर परिश्रमाने विलक्षण सिद्धी प्राप्त केली.
त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1944 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथील पेठ इस्लामपूर भागात झाला. त्यांनी भारतीय सैन्यात कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) मध्ये जवान म्हणून काम केले. सिकंदराबादमध्ये असताना त्यांनी बॉक्सर म्हणून लढा दिला. १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात नऊ गोळ्या लागल्याने पेटकर अपंग झाले होते. त्याच्या दुखापती बऱ्या झाल्यावर त्यानी हार न मानण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा पोहणे आणि इतर खेळांमध्ये भाग घेऊ लागले.
अखेरीस, त्यांनी भारताला पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. पेटकरांनी 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा जिंकून 37.33 सेकंदाचा नवा विश्वविक्रम केला. फक्त पोहणेच नाही तर स्लॅलम, भालाफेक आणि अचूक भालाफेक यातही ते निपुण होते.
चंदू चॅम्पियन हा बायोपिक भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे. “मुरलीकांत पेटकर यांची कथा ही मुक्त भारताची कथा आहे”, ट्रेलरमध्ये म्हटले आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, मुरलीचा प्रवास देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रतिबिंबित करतो, कारण तो निर्धाराने महानता मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात करतो.
1965 च्या भारत-पाक युद्धात नऊ गोळ्या लागल्याने मुरलीकांत पेटकर ऑलिम्पिक मेडल च्या ध्यासाने पोहण्याकडे वळले. मूलतः भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र आणि सेवा शाखेतील बॉक्सर, त्याने इतर खेळांमध्येही प्रावीण्य मिळवले, 1968 पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक स्लॅलममध्ये अंतिम फेरी गाठली, चार वर्षांनंतर (1972, जर्मनी गेम्स) पोहण्यात सुवर्णपदक मिळवण्याआधी.
त्याच्या नावावर ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा विश्वविक्रम आहे. त्यांच्या कामगिरीच्या 46 वर्षांनंतर भारताने 2018 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्याच्या जिद्द आणि कर्तृत्वामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने खास अपंग खेळाडूंवरील पुस्तकात पेटकरचा उल्लेख करण्यास प्रवृत्त केले.
सुशांत सिंग राजपूतचा एमएस धोनी, फरहान अख्तरचा भाग मिल्खा भाग आणि विनीत कुमार सिंगचा मुक्काबाज यांसारख्या चित्रपटांची आठवण हा चित्रपट बघताना होते. खुप दिवसांनी टॉकीज मधे बघितलेला अतिशय चांगला सिनेमा खुप काही शिकवून कायम आठवणीत राहील.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈