श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘जाणिवा’.. मनाच्या मार्गदर्शिका! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

विविध अनुभवांनी मनाला केलेल्या स्पर्शातूनच निर्माण होत असतात जाणिवा. विचार म्हणजे जाणिवा नव्हेत.विचारांची ये जा सुरुच असते अखंड, अव्याहत मनात. विचार कधीकधी आले तसे निघून जाणारे नसतातही. कांही रेंगाळतही रहातात. कांही ठाण मांडून बसणारे असतात. कांही रुतणारे, सलणारेही असतात काट्यांसारखे. अशा विचारांना अलगद काढून दूर भिरकावत असतात त्या जाणिवाच. त्या विचारांना शिस्त लावतात. योग्य दिशा देतात आणि अयोग्य विचारांना अटकावही करतात. मनाला योग्य विचारांचा मार्ग दाखविणाऱ्या मार्गदर्शिकाच असतात त्या मनाच्या..!

जाणिवा म्हणजे भावना नव्हेत. भावनांना लगडलेली भावफुले असतात जाणिवा आणि त्या फुलांमधले मधुघट परागकणही..!

जाणिवा अनेकरंगी असतात. त्या ‘जबाबदारीच्या’ असतात.’कर्तव्याच्या’असतात. कृतज्ञतेने भारलेल्या जशा, तशाच जगणं कृतार्थ करणाऱ्या असतात जाणिवाच!

नेणिवेतल्या गूढ अंधारकणांना प्रकाशाचा स्पर्श करतात जाणिवा. योग्य अयोग्याचा सद् असत् विवेक जागवतात जाणिवाच.

त्या तीव्र असतात तेव्हाच आपण जबाबदारीने वागतो, कर्तव्याचे महत्त्वही जाणतो. समाजाकडून या ना रुपात कांहीतरी घेत असणाऱ्या आपल्याला समाजाला आपण लागत असलेल्या देण्याची आठवण करुन देत असतात त्या या जाणिवाच.जाणिवा अलगद जागत्या ठेवणाऱ्यांचं आयुष्य कृतार्थ तर होतंच आणि तेच आनंददायीही होत रहातात इतरांसाठीही. ज्यांच्या जाणिवा अशा प्रगल्भ नसतात ते मात्र जगत रहातात स्वत:पुरतंच फक्त स्वतःसाठी. प्रकाशाचा स्पर्शच न झालेलं त्यांचं एकेरी जगणं ओझंच बनून रहातं त्यांच्या स्वतःच्याच शिरावरचं. जाणिवा अलगद जाणिवपूर्वक जपायला हव्यात ते यासाठीच. कारण क्षणभर थांबून स्वतःचा मार्ग योग्य दिशेचा आहे ना हे पहायला प्रवृत्त करीत असतात त्या निगुतीने जपलेल्या या मनाच्या मार्गदर्शिकाच..!!

 

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments