सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆जागतिक पर्यावरण दिन निमित्त – पर्यावरण दिन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज ५ जून – जागतिक पर्यावरण दिन. जसे फादर्स डे, मदर्स डे तसाच … वर्षातून एकदा तरी आईवडील हे शब्द त्यानिमित्ताने नक्की आठवतात, ही आई-वडिलांसाठी समाधानकारक गोष्ट. पण ‘पर्यावरण दिन’? – म्हणजे पर्यावरणाची आठवणही अशीच फक्त एक दिवस काढायची?
“पर्यावरण”… केवढा व्यापक शब्द… हा सकल सजीवसृष्टीचा आधार. क्षणाक्षणाला घेतल्या जाणा-या श्वासाची प्रत ठरवणा-या या पर्यावरणाबद्दलची कृतज्ञता, वर्षातून फक्त एकदाच? तीही फक्त शाब्दिक ? एरवी त्याचे सर्रास हाल करायचे— किती कृतघ्नपणा आहे. निसर्गातल्या सर्व सजीव घटकांमधला, माणूस हा एकच प्राणी असा आहे, जो त्याच्या जीवनदात्याशी अतिशय बेपर्वाईने, निष्ठुरपणे वागतो. इतर सगळे घटक स्वत:च्या मर्यादा ओळखून जगतात आणि म्हणूनच कदाचित् माणसापेक्षा जास्त आनंदात जगतात. इथे एक कविता आठवते……
मुक्त विहरती कशी पाखरे
किलबिल किलबिल आकाश भरे
ऐकियला का कधी कुणी हो
कलरव त्यांचा उसासे भरे ….
वृक्ष-वेली अन् बागा फुलत्या
वा-यासंगे नितचि डोलत्या
पाहियल्या का कधी कुणी हो
वैतागती अन् हिरमुसती त्या…
… ही मुक्तपणे जगणारी पाखरं, मिळेल त्या अन्नपाण्यावर होता होईतो फुलून रहाणारी झाडं-वेली, कधीतरी ‘आणखी’ साठी हपापलेत, देणा-यालाच ओरबडताहेत, वेळप्रसंगी त्याला संपवायचा घाट घालताहेत, असं पुसटसं तरी जाणवतं का? अशक्यच. पण माणूस? तो या सगळ्यांपेक्षा अगदीच वेगळा. जन्माला येतानांच श्वासाबरोबरच हव्यासही घेऊन आलेला… ‘आणखी’ मध्ये जाणवणारा असंतुष्टपणा, हाव, हा तर त्याचा स्थायीभावच …
‘इवलीशी जरी चोच, तिने सतत काही टिपतांना, पोटापुरतंच घ्यावं…
हा पोच बघ आहे का?’
…… हा प्रश्न पक्ष्यांना, आणि मतितार्थाने प्राण्यांनाही विचारण्याची कधी गरज पडत नाही. पण माणूस?… स्वत:च्या पोटाची गरज तर लक्षात घेतच नाही, उलट त्याला एकट्यालाच वरदान म्हणून मिळालेल्या प्रतिभेचा वापर प्रगतीसाठी करण्याच्या नादात, ज्या पर्यावरणामुळे त्याचे जीवन सुरक्षित, सुखी रहाते, त्याचीच अनिर्बंध नासधूस करतो आहे…
खळखळ झरझर पाणी वाहे
समुद्री आणि नदी प्रवाहे,
पाहियले का कधी कुणी हो
वैतागून ते थांबून राहे …
असं अगदी निर्मळपणे पाण्याचं कौतुक करणा-या कवीचाही पूर्ण भ्रमनिरास व्हावा, असं वागत, आज माणूस काय करतो आहे? या नितळ पाण्यात असंख्य प्रकारचा कचरा, घाण, रासायनिक द्रव्यं, मृतदेहाच्या अस्थी, आणि प्रसंगी पूर्ण मृतदेहही टाकण्यात तो जराही कचरत नाहीये. पाणी म्हणजे जीवन म्हणत, तो स्वत:च ते जीवन निरूपयोगी करायला मागे-पुढे पहात नाहीये, हे फक्त पर्यावरणाचंच नाही, तर त्याचं स्वत:चंच दुर्दैव आहे, हे त्याच्या लक्षात येतच नाहीये, की लक्षात घ्यायचंच नाहीये? त्याची गुर्मी, माज, लोभ-मोह, सगळं इतकं वाढलंय, की स्वत:चं वागणं फक्त स्वत:वरच नाही, तर सगळ्या जगावर उलटू शकतं, हे कळत असूनही वळेनासे झालंय् त्याला … हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. या विचाराशी थबकल्यावर कवितेतल्या पुढच्या ओळी आठवताहेत…
वाटे मजला रोजच यांना
पहाटेच तो देव भेटतो
षड्रिपु त्यांचे बांधून ठेवून
मुक्त तयांना करून जातो ॥
आम्ही माणसे पाखंडी किती
सुखनिधान ते उरी गाडतो
षड्रिपु सारे मुक्त सोडुनी
सुख शोधत अन् वणवण फिरतो ॥ ….
—खरंच्, पशु-पक्षी, झाडं-वेली अशा निसर्गातल्या इतर गोष्टी लोभ-मोह-मत्सर –सगळ्यापासून दूर असतात, मुक्तपणे जगतात. माणसं मात्र या रिपूंच्या विळख्यात बहुतेक वेळा स्वत:च स्वत:ला अडकवून घेतात, आणि त्या निसर्गाच्या, पर्यायाने पर्यावरणाच्या बाबतीत ‘पाखंडी’पणे वागतात. जगतांना त्याच्या अस्तित्वावाचून पर्याय नाही या सत्याकडेही, स्वत:च्या स्वार्थासाठी सोयीस्कर दुर्लक्ष करतात. पर्यावरणाचा वाढता -हास बघता, ‘प्रगती’ हे नाव गोंडस असले, आणि प्रगती होणे गरजेचेही असले, तरी त्यात दडलेला स्वार्थ, त्या ‘प्रगती’लाच बदनाम करतो, हा विचार माणसाच्या मनात डोकावतही नसेल का? हा प्रश्न वारंवार पडावा, अशीच सध्या सगळीकडची परिस्थिती दिसते. म्हणजे माणसाची मानसिकताच आता अशी झाली आहे का … की …
‘निसर्ग जणू खेळणेच आम्हा, ओलिस त्याला आम्ही ठेवू ।
फुकट सापडे हाती तर त्या, बिगा-यास मुळी मोल न देवू ॥’
हे आता गृहीतच आहे का ? सिमेंटच्या जंगलांसाठी, आणि अल्पजीवी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रचंड वृक्षतोड, कधीही विघटन होऊ शकणार नाही अशा कच-याची अतोनात निर्मिती, स्वत:च्या गरजेनुसार, पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची, प्रवाहांची दिशा आणि गतीही बदलणे, सोय म्हणून नदीत कचरा टाकत पाणी प्रचंड प्रदूषित करणे, उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारे प्रचंड विषारी वायू, त्यांचे घातक परिणाम माहिती असूनही वातावरणात मुक्तपणे सोडणे… अशासारख्या, पर्यावरणाची पूर्णपणे वाट लावणा-या गोष्टी जगभर दिवसेंदिवस सर्रासपणे वाढत असतांना, वर्षातला एक दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करणे म्हणजे, पर्यावरणाचा घोर अपमान करणेच आहे. स्वत:च्या आईला निलाजरेपणाने कसेही वागवायचे आणि फक्त ‘मदर्स डे’ला, ‘मदर’ हा फार व्यापक अर्थाचा शब्द केवळ उच्चारायचा, तसंच वाटतं, आज ‘पर्यावरण दिन’ आहे म्हणतांना … हे अहितकारक चित्र बदलायलाच पाहिजे… स्वतःला बुद्धिमान ‘माणूस’ म्हणवणा-यांनीच बदलायला पाहिजे.
©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈