सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
विविधा
⭐ जो आवडतो सर्वाना तोचि—- ⭐सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐
” चि.नथू , वाढदिवसाच्या —अरे मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा काय देते ? कसला वाढदिवस? आज तर तुझी जयंती तू आम्हाला सोडून गेलास हे मन मानतच नाही.”
नथू, हे व्यक्तिमत्व असचं होतं ना त्याचं माझं काही नातं ना गोतं. माझ्या बॅकेत एक साधा शिपाई .पण तो माणूस म्हणून फार चांगला. त्याचं आणि माझं नातच वेगळंच.त्या नात्याला काही लेबल नव्हते.
सतत हसतमुख ,कामसू कोणतेही काम करण्याची तयारी .कोणत्याही कामाबद्ल कमीपणा नाही.सगळ्यांशी आपुलकीने बोलणं मग तो स्टाफ असो की कस्टमर . कोणाशी कधी भांडणं साधा वाद पण घातलेला आठवत नाही.
फार कष्टाळू एका लहानशा खेड्यातून आलेला.नौशीर सारख्या देवमाणसाची गाठ पडली.आणि आयुष्यच बदलून गेले.
नौशीरची ,त्याच्या पत्नीची खूप सेवा केली .बँकेची इमाने इतबारे वयाच्या 60 वर्षापर्यंत सेवा केली.लायकी,क्षमता असूनही का कोणास ठाऊक पण प्रमोशन घेतलं नाही.काय वाघासारखं काम करायचा?मोदीजीच्या नोटा प्रकरणाच्या काळात एखाद्या हेडकॅशियरला लाजवेल असं काम त्यानी केलं.कुठे त्याचा गवगवा नाही की कौतुकाची अपेक्षा नाही.
मधल्या काळात मला रिक्शाचा अपघात झाला.माझ्या घराकडून बॅकेत जायला एकच सोयीचे वाहन रिक्शा.पण अपघातामुळे मला रिक्शाचा धस्का, मनांत भिती बसली होती. तेव्हा हे महाशय मला स्कूटर वरुन घरी सोडायचे.”तू अजिबात घाबरू नकोस मी स्लो चालवतो जेव्हा तुला भिती वाटेल .तेव्हा सांग मी पाय टेकवून स्कूटर थांबवीन. इतकं माझ्यासाठी करुन त्याबद्दल कशाची ,साध्या कौतुकाची आशा ,अपेक्षा पण नाही.26जुलै2005 च्या त्या भयानक पावसांत पण त्यानी आम्हाला तीन लेडीज स्टाफला हळूहळू चालत घरी सोडले.???
फार मेहनती. त्याला अर्धागिनीची कविताची साथ पण तशीच मिळाली. ती पण कायम हसतमुख प्रेमळ आतिथ्यशील. हौशी जोडपं दरवर्षी गणपती आणायचे. मोठी मूर्ती. भव्य आरास. गौरीच्या दिवशी जेवणं पंगती.आमच्या कुटुंबाला आग्रहाचे कवितांचे आमंत्रण. मला non veg आणि माझे मिस्टर गणपतीच्या दिवसात veg खातात म्हणून त्याना veg.माझा मुलगा नाही गेला तर कविता त्याच्या साठी डब्बा भरुन द्यायची. काय संबंध ? नाही नातंगोतं, नाही जातीचे पातीचे. पण संबंध जिव्हाळ्याचे आपुलकीचे.
कधी रविवारी सकाळी वरसोव्यावरुन फिश आणं .कधी d mart चं सामान. करोनाच्या काळात गेल्या वर्षी आंबे आणून आम्ही वाटून घ्यायचो.
सकाळी बॅकेतले काम करून दुपारी कवितांना केलेले टेलरिंगचं काम मोठ्या थैल्या भरुन टेलरला नेऊन देणं .परत दुस-या दिवशी साठीं त्याच्याकडून काम आणणं. सुपारीच्या खांडाच सुध्दा व्यसन नाही.म्हणून तर एक शिपाई असून गावाला घर बांधलं.मुलाला MBA केलं.मुलाला two bhk घ्यायला आर्थिक मदत केली.मुलगा पण हुशार,सुस्वभावी बापासारखाच गुणी.सून सुध्दा छान हुशार MBA आतिथ्यशील .एक गोड नातू.आणखी एक लहान मुलगा .सुंदर दृष्ट लागण्यासारखं. हो दृष्टीच लागली. आणि करोनाच्या भयानक एका सकाळी पुजाचा,सूनेचा मला फोन आला.
“मावशी, पप्पा इज नो मोर” मी अर्धवट झोपेत. मी फोन ठेवला. माझ्या डोक्यापर्यंत पोहोचलचं नाही. परत मी तिला फोन लावला. तर परत तीच न्यूज .
करोनाने त्याचा आठ दिवसाच्याच कालावधीत घास घेतला. मुलांनी सुनेने खूप धावपळ केली. पण शेवटी आलं देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना.
एक निर्व्यसनी,ना बी.पी., ना डायाबिटीस. धट्टाकट्टा माणूस. नुकताच रिटायर्ड झालेला,आता शांतपणे जगण्याची बायकोला घेऊन भारतभर फिरण्याची स्वप्न बघणारा .स्वतः एकटाच स्वर्गात फेरफटका मारायला गेला. गेला नाही नेला देवाने.
.!!जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला !!
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈