श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
ज्याचा त्याचा देव… श्री प्रमोद वामन वर्तक
? ज्याचा त्याचा देव्हारा ! ?
परवा एका उद्योजक मित्राच्या, तुम्ही बरोबर वाचलेत, उद्योजक मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जाण्याचा योग आला ! उद्योगपती मित्र असायला मी कोणी नेता थोडाच आहे ? असो ! तर त्याने दिलेले त्याच्या बंगल्याचे “ध्यान” हे नांव वाचून, खाली घसरणारी ढगळ हाप पॅन्ट, त्यातून अर्धवट बाहेर आलेला मळलेला शर्ट आणि नाकातून गळणारे मोती, असे शाळेत असतांनाचे त्याचे त्या वेळचे ध्यान डोळ्यासमोर आले आणि मी मनांतल्या मनांत हसलो ! पण पठ्याने पुढे मोठ्या मेहनतीने पैसा कमवला आणि त्याच्या बरोबर थोडं फार नांव !
बंगल्यात शिरल्या शिरल्या उजव्या हाताला एक मोठ देवघर होतं. अनेक देवादिकांच्या मोठ मोठ्या तसबीरींनी त्याची भिंत भरून गेली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या जवळ जवळ माझ्या उंचीच्या शिसवी देव्हाऱ्याने ! मित्राची आई त्या प्रचंड देव्हाऱ्या समोर आतील असंख्य देवांच्या लहान मोठ्या मूर्तिची, स्वतः एका चौरंगावर बसून पूजा करत होती ! मला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण माझा मित्र पक्का नास्तिक आहे हे मला ठाऊक होतं. म्हणून तो देव्हारा बघून मी त्याला म्हटलं, “अरे तू एवढा देव देव कधी पासून करायला लागलास ?” “कोण म्हणत ?” “अरे मग हे एवढ मोठ देवघर त्यात तो भला मोठा देव्हारा, हे कशाचं लक्षण आहे ?” “तुला खोटं वाटेल, पण आजतागायत मी आपणहून या देवघरात पाऊल ठेवून त्यांच्या पुढे कधीच हात जोडलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे काहीच मागितलेले नाही ! माझा माझ्या मनगटावर पूर्ण भरोसा आहे !” “मग हे सगळं….” “आई साठी ! त्या देव्हाऱ्यात अनेक देव देवता आहेत, पण मी त्या देव्हाऱ्या समोर डोळे मिटून जेव्हा केव्हा उभा राहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यात माझ्या आईची मूर्ती दिसते, जिला मी मनोमन नमस्कार करतो, जी माझ्यासाठी सार काही आहे !” त्याच्या त्या उत्तराने मी अंतर्मुख झालो हे नक्की !
मध्यन्तरी बऱ्याच वर्षांनी सुट्टीत गावाला गेलो होतो. एकदा सकाळी गावातून फिरता फिरता, माझ्या लहानपणीच्या शाळेवरून जायची वेळ आली. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि सगळी चिल्ली पिल्ली आपापल्याला वर्गातून शाळेच्या अंगणात, कोणी खेळायला, कोणी डबा खायला बाहेर उधळली ! मी गेट समोर उभा राहून माझे बालपण आठवत उभा राहिलो ! आताही शाळेत डोळ्यात भरेल असा कुठलाच बदल झालेला जाणवला नाही मला ! नाही म्हणायला, शाळेच्या अंगणातलं पारावरच एक छोटंस मंदिर मला कुठे दिसेना. त्या क्षणी मला काय झालं, ते माझं मला कळलच नाही, मी बेधडक शाळेत शिरून हेडमास्टरची रूम गाठली. तर त्यांच्या त्या खुर्चीत एक चाळीशीची स्मार्ट मॅडम बसली होती.
ओळख पाळख वगैरे झाल्यावर मी त्यांना म्हटलं “माझ्या आठवणी प्रमाणे आपल्या शाळेच्या अंगणात पारावर एक छोटस मंदिर होतं, ते दिसलं नाही कुठे ?” “त्याच काय आहे ना जोशी साहेब, ते मंदिर ना मी इथे बदली होऊन आल्यावर फक्त मागच्या अंगणात शिफ्ट केलंय !” “ओके ! मॅडम, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलो तरी मला विचारायचा तसा अधिकार नाही, पण आपल्याला एक प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?” “अवश्य विचारा जोशी साहेब, त्यात राग कसला !” “नाही म्हणजे मला तुम्ही तसं करायच कारण कळेल का ?” “जोशी साहेब मी जेंव्हा इथे चार्ज घेतला, तेंव्हा पहिल्याच दिवशी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, की मी मंदिर मागे शिफ्ट करणार आहे आणि त्या वेळेस सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्नच बहुतेकानी मला विचारला !” “मग तुम्ही त्यांना काय सांगितलंत ?” “मी त्यांना म्हणाले, माझी देवावर श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्ध नाही किंवा त्याचे अवडंबर पण माजवत नाही ! मला असं वाटतं की आज पासून तुम्ही आपापला वर्ग, हाच एक ‘देव्हारा’ मानून, त्यात असलेल्या प्रत्येक विद्यार्थीरुपी नाजूक, ठिसूळ दगडातून सगळ्यांना हवी हवीशी सुबक छान, मूर्ती घडवायच अवघड काम करायच आहे ! तीच त्या प्रभूची सेवा होईल असं मला वाटतं. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्या प्रमाणे वागून, कामं करून गेली सतत पाच वर्ष ‘तालुक्यातील उत्कृष्ट शाळा’ हे बक्षीस आपल्या शाळेला मिळवून दिलं आहे जोशी साहेब !” मॅडमच ते बोलणं ऐकून काय बोलावे ते मला कळेना ! मी त्यांना फक्त नमस्कार केला आणि शाळे बाहेर पडलो ! घरी जातांना, त्या चिमुकल्यांचा चिवचिवाट बराच वेळ कानावर पडत होता !
डिसेंबरचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. कशी कुणास ठाऊक, पण पहाटे पाच वाजताच जाग आली आणि या अशा थंडीत मस्त आल्याचा, गरमा गरम चहा प्यायची इच्छा झाली ! बायकोला उठवायचं जीवावर आलं, म्हटलं बघूया स्टेशनं पर्यंत जाऊन कुठली टपरी उघडी आहे का. कपडे करून खाली उतरलो. रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. एरवी भुकणारी कुत्री पण दुकानांच्या वळचणीला गप गुमान झोपली होती. लांबून एका रस्त्यावरच्या चहाच्या टपरीचा दिवा पेटलेला दिसला आणि माझा जीव जणू चहात पडला म्हणा नां ! जवळ जाऊन बघितलं तर तो सामानाची मांडा मांडच करत होता. “अरे एक कडक स्पेशल मिळेल का ?” “साहेब पाच मिनिट बसा. आत्ताच धंदा खोलतोय बघा.” मी बरं म्हणून त्याच्या टपरीच्या बाकडयावर बसलो. थोडयाच वेळात त्याने रोजच्या सवयी प्रमाणे, चहा उकळल्याचा अंदाज घेवून, तो चहा दुसऱ्या भांड्यात एका फडक्याने गाळला. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणि ते पृथ्वीवरचे अमृत माझ्या ओठी लागणार होतं ! त्याने मग दोन ग्लास घेवून एका ग्लासात पाणी ओतलं आणि एका ग्लासात चहा. ते पाहून मी आधाशा सारखा हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून, ते दोन ग्लास आपल्या हातात घेतले आणि मेन रोड वर जाऊन काहीतरी मंत्र म्हणून, पहिल्यांदा पाण्याचा आणि नंतर चहाचा ग्लास असे दोन्ही रस्त्यावर ओतले ! मला काहीच कळेना ! इथे त्याच पहिल बोहनीच गिऱ्हाईक चहासाठी तळमळतय आणि त्याने तो चहाचा पहिला ग्लास चक्क रस्त्यावर ओतला ! मी काही विचारायच्या आतच त्याने दुसरा चहाचा ग्लास भरून माझ्या पुढे केला. मी चहा पिता पिता त्याला म्हटलं “अरे तो ताजा चहा आणि पाणी रस्त्यावर कशाला टाकलंस?” “साहेब मी रोजचा पहिला चहा देवाला अर्पण करतो बघा !” “देवाला ? अरे पण मला त्या मेन रोडवर तुझा कुठला मुदलातला ‘देव्हाराच’ दिसत नाही आणि तुला त्यातला देव दिसून त्याला तू तुझा पहिला चहा अर्पण पण केलास ! खरच कमाल आहे तुझी !” “साहेब कमाल वगैरे काही नाही. माझ्या बापाने सुरु केलेली ही टपरी आता मी चालवतोय, पण त्याने शिकवल्या प्रमाणे हा रोजचा रीती रिवाज मी न चुकता पाळतोय बघा ! साहेब शेवटी देव सगळीकडे असतो असं म्हणतातच नां ? प्रश्न फक्त श्रद्धेचा असतो, खरं का नाही ?” त्याच्या या प्रश्नावर मी फक्त हसून मान डोलावली आणि त्याला पैसे देऊन सकाळी सकाळी मिळालेल्या सुविचाराचा विचार करत घरचा रस्ता पकडला !
मंडळी, शेवटी कोणाचा ‘देव्हारा’ कुठे असेल आणि त्यात तो किंवा ती कुठल्या देव देवतांची पूजा अर्चा करत असतील, हे सांगणे तसे कठीणच ! शेवटी, तो चहावाला मला म्हणाला तसं, प्रश्न शेवटी श्रद्धेचा असतो, हेच त्रिकाल बाधित सत्य, नाही का ?
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈