श्री अरविंद लिमये
विविधा
☆ जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे… ☆ श्री अरविंद लिमये ☆
प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ,रंग,भाव असतात.तसेच परस्पर भिन्न अर्थ असणारे पण वरवर एकच भासणारे अपवादात्मक शब्दही असतात.
‘वसा’ हा अशा अपवादात्मक शब्दांपैकीच एक. अक्षरे तीच.शब्दही तेच.पण अर्थ मात्र भिन्न. व्रत,नेमधर्म या अर्थाचा असतो तो ‘ वसा ‘ हा एक शब्द आणि स्निग्ध पदार्थ या अर्थाचाही ‘वसा’ हाच दुसरा शब्द.दोघांमधली अक्षरे तीच म्हणून चेहरामोहराही सारखा तरी DNA पूर्णत: वेगळा. स्निग्ध पदार्थ म्हंटले की तेल,लोणी,तूप,वंगण,मेण या सारखे पदार्थ चटकन् नजरेसमोर येतात पण या अर्थाने ‘वसा’ शब्दाकडे पाहिले की असा एखादा विशिष्ट पदार्थ नजरेसमोर मात्र येणार नाही.’मेदयुक्त पदार्थ’ या व्यापक अर्थाच्या वसा या शब्दात अशा सर्वच स्निग्ध पदार्थांचा समावेश होत असला तरी त्या अर्थाने वसा हा शब्द फारसा प्रचारात मात्र आढळून येत नाही.
वसा हा शब्द व्रत या अर्थाने मात्र सर्रास वापरला जातो.निदान वरवर तरी व्रत आणि वसा हे दोन्ही शब्द समानार्थी वाटतात आणि कांही अंशी ते तसे आहेतही. व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांचा समान अर्थ म्हणजे ‘नेम’ !’नेम’ हा शब्द मला तरी ‘नियम’ या शब्दाचा बोलीभाषेत रूढ झालेला अपभ्रंश असावा असेच वाटते. कारण व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांना ‘नियम’ या शब्दात असणारा नियमितपणाच अपेक्षित आहे हे लक्षात घ्यायला हवे.’नेम’ या शब्दाचे मात्र लक्ष्य, उद्दिष्ट ,रोख,शरसंधान असे व्रत किंवा वसाशी काही देणेघेणे नसणारेही अर्थ आहेत. त्यामुळे स्वतः साठी एखादा ‘नेम’ म्हणजेच ‘नियम’ ठरवून घेणे आणि तो सातत्याने पाळणे हेच व्रत किंवा वसा दोन्हींनाही अपेक्षित आहे.
व्रत या शब्दाचे संकल्प, उपवास हे अर्थ वसा या शब्दालाही अभिप्रेत आहेत.तथापी व्रत हे सदाचरण, ईशसेवा, भक्ती, आराधना यास पूरक असेच असते.पण वसा या शब्दाचा अवकाश यापेक्षा अधिक आहे. व्रत आणि वसा या दोन्हीमध्येही अध्यात्मिक उन्नतीसाठी स्वीकारलेले नेमधर्म गृहीत आहेतच पण वसा या शब्दात त्याहीपेक्षा अधिक व्यापक अर्थ सामावलेला आहे.
या व्यापक अर्थाला स्वतःचे जन्मभराचे उद्दिष्ट ठामपणे ठरवून स्वीकारलेला आचारधर्म अपेक्षित असतो.
कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात अडकून न पडता दीनदुबळ्यांची,वंचितांची सेवा करण्यासाठी, सामाजिक उन्नतीचा ध्यास घेत अनिष्ट प्रथा ,रूढी ,परंपरा यातल्या तथ्यहीन गोष्टी कालबाह्य ठरवून समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन तन-मन-धनाने स्वतःचे आयुष्य राष्ट्राला अर्पण करून
राष्ट्रहिताला वाहून घेत ज्या थोर स्त्री-पुरुष महात्म्यांनी स्वतःची उभी आयुष्ये वेचलेली आहेत, स्वतःच्या स्वास्थ्याचा, सर्वसुखांचा त्याग करून, असह्य हालअपेष्टा सहन करुन आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्या त्या प्रत्येकाने अतिशय निष्ठेने तरीही डोळसपणे स्वीकारलेला जीवन मार्ग हा त्यांच्यासाठी त्यांनी घेतलेला आयुष्यभरासाठीचा ‘वसा’च होता ! यातील ‘डोळसपणे’ या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यायला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे खालील प्रसिद्ध काव्य उचित ठरेल ! की घेतले न हे व्रत अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग
माने
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे
बुध्दयाची वाण धरिले करी हे सतीचे!
‘एखादे दिव्य कार्य दाहक हे असणारच. त्याचे चटके बसणारच. पण सतीचे वाण घ्यावे तसे आम्ही स्वखुशीने हे स्वीकारलेले आहे. अंधतेने नव्हे !’
स्वातंत्र्यवीरांची या काव्यामधे व्यक्त झालेली निष्ठा आणि निर्धार ‘वसा’ या शब्दाचा पैस किती अमर्याद आहे याची यथोचित जाणिव करुन देणारा आहे !!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈