सौ. सुचित्रा पवार

??

☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे (म्हणजे आता होती म्हणावी लागेल.)आपल्या सुदृढ,सुसंस्कृत भारतीय समाजात ही म्हण अगदी तंतोतंत चपखल होती.जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ असा की जिला मातृत्व लाभलेय तिने आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊन त्याला सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी बनवू शकते.असा सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी तेजस्वी युवक पुढं राष्ट्र मजबूत बनवेल आणि आपल्या राष्ट्राचा उद्धार करेल.स्वामी विवेकानंदासारखा एखादा युवक जग सुद्धा उद्घारेल.

पूर्वी स्त्रिया अशिक्षित होत्या,कदाचित त्यावेळची ही जाहिरातही असेल किंवा देश पारतंत्र्यात असल्यामुळे देशाला अशा तेजस्वी,सुदृढ सशक्त तरुणांची आवश्यकता असेल म्हणूनही कदाचित कुणी विचारवंताने आपल्या या विचाराला समाजासमोर ठेवले असेल.तसेही हा विचार सर्वच काळासाठी लागू आहे कारण ज्या देशातील तरुण  सुदृढ,तेजस्वी,संस्कारी आणि तगडे असतील तर देश सुद्धा तितकाच बलवान व सूनसंस्कृत होईल

“बलसागर भारत होवो

विश्वात शोभूनी राहो..”

अशी प्रार्थना म्हणून तर साने गुरुजी करत असतील.

आपले मूल आपले असले तरीही तो समाजाचा एक घटक असतो न पर्यायाने तो उद्याच्या देशाचा एक सुविद्य, सुसंस्कृत नागरिक असतो आणि हीच खरी आपल्या राष्ट्राची संपत्ती असते पर्यायाने उज्वल देश.त्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या बालकाला त्या दृष्टिकोनातून घडवायचे असते आणि आपले मूल राष्ट्राला अर्पण करायचे असते.शिवरायांच्या काळात,पारतंत्र्याच्या काळात असे अनेक युवक आपल्या मातेने राष्ट्रार्पण केले म्हणूनच देश स्वतंत्र झाला,शिवरायांनी अशाच मूठभर तगड्या मावळ्यांच्या साथीने आपले स्वराज्य उभे केले.

अगदी नवजात शिशूपासून ते बालक सज्ञान होईतो ते आईच्या सहवासात जास्त असते.त्यामुळं आईच्या संस्कारांचा प्रभाव मुलावर पडत असतोच पण बालकाच्या सशक्ततेसाठी ,त्याच्या सदृढ ,संपन्न,निरोगी आरोग्य पूर्ण जीवनाची पण जबाबदारी मातेवरच येत असते,त्या दृष्टीने मुलाचा आहार विहार,खेळ,व्यायाम याकडेही तिचे जाणीवपूर्वक लक्ष असेल तरच ते बालक उद्याचा सशक्त युवक आणि सुसंस्कारी नागरिक बनेल.असे नागरिक मग देशावर प्रेम करतील, स्वच्छता व सामाजिक आरोग्य जपतील व आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करतील.देशातील कायदा सुव्यवस्थेचे पालन करतील,कर प्रणाली मजबूत करतील आणि देश प्रगतीपथावर नेतील.यासाठी प्रथम लोकसंख्या नियंत्रण हवे जेणेकरून मर्यादित लोकसंख्येमुळे आपल्याला हवे तसे सुनिश्चित आणि चांगले बदल घडवता येतील.

पण आज आपल्या देशातील युवकांची स्थिती बघता काय दिसते?कुटुंबे विभक्त झालीत,आर्थिक बाजू मजबूत करत असताना घरातील बालकांच्या आरोग्याकडे, संगोपणाकडे दुर्लक्ष होत आहे,शहरात सुशिक्षित जोडप्यांच्या मुलांचे बालपण पाळणा घरात संपत आहे.बरेचदा रविवारी सुद्धा आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून काही आया मुलाला पाळणा घरात सोडतात.एका बाजूला हे चित्र आहे,दुसऱ्या बाजूला अति सजग आया थोडक्यात माता पिता पालक अगदी नर्सरी /बालवाडी पासून मुलाला करिअरच्या  चक्कीत ढकलतात की ते मूल मोकळा श्वास सुद्धा घेऊ शकत नाही.स्पर्धेचे युग आहे म्हणून त्याला तीन वर्षापासूनच स्पर्धेच्या शर्यतीत ढकलले जाते त्यामुळं ते तिशीतच थकते,म्हातारे होते.अभ्यास,वेगवेगळे क्लास ,वेगवेगळ्या स्पर्धात त्याचे बाल्य करपतेआणि तारुण्य कोमेजते,उमलायच्या,फुलायच्या वयातच त्यांचे निर्माल्य होते.

बदललेली सामाजिक स्थिती,अत्याधुनिक मनोरंजनाची साधने,मोबाईल यामुळं ७०%तरुणाई भरकटत चालली आहे म्हणलं तरी वावगे ठरणार नाही.पूर्वी घरात पाच पन्नास माणसे असत त्यामुळं मोठ्यांच्या वागण्या बोलण्यातील शिस्त,आदर्श, सुसंस्कार आपोआपच मुलांच्या अंगी येत.घरातील सर्वच स्त्रियांचे सर्व मुलांकडे लक्ष असायचं,त्यामुळं मुलं सुरक्षित वातावरणात वाढत,त्यांना आपसूकच कुटुंबाचा भक्कम आधार मिळायचा,आणि सगळे प्रेमळ पालकही.आज उलट चित्र आहे,घरा घरात कलह वाढत आहे,संयुक्त कुटुंबाकडून  विभक्ता कुटुंबाकडे आपण गेलोच आहोत पण भविष्यात आई किंवा वडील यापैकी एकच पालक मुलाला असेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.मुले दिशाहीन होत आहेत.नैराश्य आणि गुन्हेगारी वाढत आहे,चंगळवाद फोपावल्याने सामाजिक अस्थिरता आणि विषमता वाढीस लागली आहे.

पूर्वी स्त्रिया अर्थार्जन करत नसत त्यामुळं चोवीस तास आपल्या मुलांसोबत असल्याने मुलांच्या सवयी,मुलांचे खेळ,आरोग्य,अभ्यास याकडे लक्ष देता येत असे.आज अर्थार्जन ही काळाची गरज आहे,गरज असली न नसली तरीही स्त्रिया अर्थार्जन करत आहेत आणि अर्थातच मुलांकडे दुर्लक्ष होते,बरेचदा आयुष्यात पैसा खूप असतो पण मुले बिघडलेली असतात,वाया गेलेली असतात.याउलट मध्यम आर्थिक स्थिती असणारे,किंवा ग्रामीण भागातील मुले तुलनेत जास्त समंजस आणि जबाबदार असतात.

असो, ज्यावेळी देशातील स्त्री पुरुष दोन्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात,तेव्हा सरकारने बालकांची काळजी घेणारी व्यवस्था उभी करायला हवी असते,कामाच्या ठिकाणीच त्या त्या कम्पन्यांनी सुद्धा अशा व्यवस्था उभ्या करायला हव्यात.अण्णाभाऊ साठेंच्या एका लेखात मी वाचलं होतं की एक रशियन माता रेल्वेतून प्रवास करत आहे आणि तिचे बाळ (अर्थातच भावी रशियन नागरिक) तिथंच पाळण्यात शांतपणे झोपले आहे.)समाजातील अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरावरील मुलांची अशी सोय होणे गरजेचे आहे. तिथल्या सरकारने सरकारने तिथल्या रेल्वेतून अशी सोय केली आहे.असे चित्र मला आपल्या देशात कुठं दिसलं नाही,आता या चार दोन वर्षात झाली असेल सोय तर माहीत नाही.

काळाची चाके चालत राहतात कधी हळू तर कधी जलद पण फिरून पुन्हा तिथंच कधीतरी येतो त्याला बराच कालावधी लागतो पण या कालावधीत बरेच काही निसटते, हरवते. आज आपल्या देशातील कुमारांची/कुमारीची,तरुण/तरुणींची स्थिती खरेच चिंतनीय आहे.

आपली मुले प्रथम आपली संपत्ती आहे त्यानंतर समाजाची व पर्यायाने देशाची,तिची जपणूक व्यवस्थित रित्या झाली तरच एका सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments