सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ जसे अन्न तसे मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
खूप लहानपणी एक म्हण ऐकली होती. माणसाच्या मनातला मार्ग त्याच्या पोटातून जातो याचा अर्थ काहींनी सांगितला होता व तोच अर्थ मनात खोलवर बसला होता.तो असा होता की चांगले खाल्ले की लोक चांगले वागतात, खाणाऱ्याचे मिंधे होतात.आपल्या विषयी त्यांचे मन चांगले होते इत्यादी….
खरे तर हे फारसे पटत नव्हते.कारण ज्या व्यक्तीच्या हातचे छान छान खातात त्यांनाच नावे ठेवताना व त्यांच्या विरुद्ध कारस्थाने करताना बघितले आहे. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या म्हणी,सुविचार मांडले आहेत त्याचा फार गहन अर्थ असतो.काही वाचन,थोडी समज व अनुभव यातून पुढील निष्कर्ष निघाले.
स्वयंपाक करणाऱ्याचे विचार त्या पदार्थांमध्ये उतरतात.
अन्न, पाणी याला भावना देऊ शकतो.
मग हे प्रयोग घरातच केले. खूप त्रागा, राग राग, चिडचिड करत स्वयंपाक केला. सलग ७ दिवस असे केले. आणि निष्कर्ष समोर आले. घरातील सगळी माणसे उगीचच वाद घालू लागली, भांडू लागली, आरोप प्रत्यारोप करू लागली.मी काहीही न बोलता अन्नाला देण्याच्या भावना बदलल्या व हळूहळू परिस्थिती बदलली.
आपणा सर्वांना काही ना काही चिंता, काळजी, आजार अशा काहीतरी समस्या असतातच. त्याच घेऊन स्वयंपाक केला तर तेच अन्न घरातील खाणार आणि त्या भावनांचे त्यांच्या मनात प्रोग्रॅमिंग होणार व ते शरीर, मन या द्वारे प्रगट होणार. हे आपणच बदलू शकतो.
आपल्याला जसे हवे आहे तसे विचार स्वयंपाक करताना मनात ठेवायचे.उदाहरण म्हणून काही वाक्ये देत आहे.
१) घरात सुख, समाधान, शांतता, समृद्धी, आनंद आहे.
२) सर्वजण एकमेकांशी मैत्री भावनेने वागत आहेत.
३) मी आनंदी आहे. सुखी आहे.
४) घरातील सगळे जण आपापली कर्तव्ये मनापासून व आनंदाने,जबाबदारीने पार पाडत आहेत.
हे जरूर करावे किंवा स्वयंपाक करताना
कोणताही जप करावा
एखादे स्तोत्र म्हणावे स्वयंपाक करतांना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे.
मन आनंदी ठेवावे.विचार सकारात्मक ठेवावेत.
उत्तम संगीत किंवा गाणी लावावीत
आपल्याकडे जेवताना श्लोक म्हणण्याची पद्धत सर्वात उत्तम आहे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈