☆ विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प.. ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆
थोड्या दिवसांपूर्वी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होते, तेव्हा सहज विषय चालला होता, त्या ओघात ती म्हणाली “नवरा बायकोच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त
अंतर नसावं. पाच-सहा वर्षे तर नाहीच. कारण मग विचार करण्याचा पद्धतीत जनरेशन गॅप राहतो “.
हल्ली हल्ली “जनरेशन गॅप “हा शब्दप्रयोग खूप कानांवर येतोय. म्हणजे ” दोन पिढ्यांमधलं अंतर. ” हा त्यांचा शब्दश: अर्थ होतो, पण व्यक्ती व्यक्तीप्रमाणे त्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे देवाच्या बाबतीत आहे तसं, मानलं तर. तो आहे ..च आणि तो वेगवेगळ्या रूपात आहे. तसेच.. काहीसे. काही वेगवेगळ्या वयोगटातील किंवा वेगवेगळा अनुभव घेतलेल्या काही लोकांचे म्हणणे ऐकून हे लक्षात येते.
वीस वर्षाची तरुणी : ” हो.. मला तर माझ्याहून पांच वर्ष लहान बहिणीच्यात आणि माझ्यात जनरेशन गॅप जाणवतो, ती माझ्या पेक्षा स्मार्टली ही टेक्नोलॉजी हाताळू शकते
85 वर्षांचे आजोबा : ” अंतर तर आहेच, आमची पिढी एकदम धीरगंभीर, ही पिढी म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि धूडगूस. सगळे आपले वरवरचे. कुठे ही खोलपणा नाही, की गांभीर्य नाहीच..”.
चाळीशीच्या बाई: ” हो..खरंच ही पिढी हुशार आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अजून माहित नाहीत. ह्यांना त्या कधीच शिकवायला लागल्या नाहीत…”
तर हे असे मतमतांतर ऐकायला मिळते.. हे तर ठीक.. पण प्रत्येकाच्या त्याबद्दलच्या भावना वेगवेगळ्या. कोणाला त्याचे कौतुक, तर कोणाला कुतूहल, कोणाला हेवा आणि काही जणांना तर भारी रागच आहे.
आता हेच पहा ना एक गृहस्थांचे म्हणणे असे की “पुढच्या पिढीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, ही मुले एकदम ध्येयनिष्ठ आहेत॰ एकदा मनांत आणलं तर ते करणारच “. तर एका आजोबांना त्यांचे खूप कुतूहल. म्हणाले की ” मी तर माझ्या नातवाशी सतत संवाद करत असतो, नवीन यंत्रणा त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मला ह्या पिढीचा कधी कधी हेवाच वाटतो. ” एक जण जरा त्रासिक आवाजात म्हणाले “काही नाही हो… कुठलेही प्रयोजन नाही पुढच्या आयुष्याचे. मजूरा सारखं राबायचं आणि पैश्याची उधळपट्टी करायची.”
स्वतःचा अनुभव, वय, परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाचे पिढीतील अंतराविषयीचे म्हणणे असते.
मला असे वाटते की दोन पिढ्यांमधे काळाचे अंतर हे असणारच आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. आधीच्या पिढीने अंतर ठेवून न रहाता त्याचा स्वीकार करून पुढच्या पिढीशी एकरूप व्हावे. बाकी आधीच्या पिढीनेच पुढच्या पिढीवर संस्कार केलेले असतात आणि शिकवणही दिलेली असते. म्हणजेच त्यांचात असणारे गुण व दोषही काही प्रमाणात…या गोष्टी पिढीजात असणार नाही का?
© सौ. स्मिता माहुलीकर
अहमदाबाद
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈