सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्या तीन चार दिवस झालेय विदर्भातील हवामान एकदम बदललयं.दिवसभर ऊनं असतं आणि अचानक संध्याकाळ झाली की जणू पूर्ण आभाळ घेरुन येतयं.अंधार पसरतो.सगळीकडे मळभ दाटल्यागतं उदास वाटू लागतं.मार्च एंडिंगच्या कामामुळे तसही संध्याकाळी सहा वाजतातच बँकेतून निघायला.

अशाच कालच्या संध्याकाळी स्कुटरवरुन परत येत असतांना अंधारुन आलं, सगळीकडे गच्च झालेल्या आभाळानं उदासलेलं वाटू लागलं. गार वारं वाहू लागलं. हवामान आणि वातावरणात सुध्दा एक प्रकारची नैराश्येची चादर पसरल्यागतं वाटतं होतं.

तेवढ्यात पावसाच्या पाण्याचे अलगद टपटप दोन तीन थेंब अंगावर पडले आणि काय सांगू ह्या अगदी इटुकल्या पिटुकल्या दोनचार पाण्याच्या थेबांनी वातावरणातील एकदम नूरच पालटला. गाडीने मस्त आपोआप स्पिड घेतला. हिंदी गाणे आठवायला लागले. आतापर्यंत गाडी चालवणे कंटाळवाणं वाटतं होतं ते अचानकच हवहवसं वाटू लागलं.अगदी “ए हँसी वादियाँ, ये खुला आसमाँ” गत फील आला बघा. ह्या पाण्याच्या दोनचार थेंबांनी अगदी जादूच करुन टाकली.आणि त्या क्षणी पाण्याला “जीवन” ह्या अर्थपूर्ण शब्दानी का संबोधतात हे परत एकदा नव्याने कळलं.

22 मार्च .”जागतिक जलदिन”

संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युएनओ च्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 साली “फर्स्ट वर्ल्ड वाँटर डे” घोषित केला.ह्याचं सगळं श्रेय डॉ. माधवराव चितळे ह्यांना जातं. त्यामुळेच 2015 साली जलदिनाच्या रौप्य महोत्सवाच्या निमीत्ताने त्यांना “स्टाँक होम” ह्या जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

मी एक शेतकरी पण असल्याकारणाने माझ्यालेखी खरोखरच पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.कारण शेतीचा श्रीगणेशा करतांना आधी ह्या पाण्याशिवाय,जीवनाशिवाय एक पाऊलही पुढे  टाकता येत नाही. आधी पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि मगच ह्या पाण्याचे स्त्रोत तयार होऊन शेतीला,पिण्यासाठी ह्याचा उपयोग होईल.

दुर्दैवाची गोष्ट तर अशी आहे की दिवसेंदिवस जंगल आणि रिकाम्या जमीनी कमीकमी होतात आहे आणि त्याची जागा अजस्त्र इमारती, सिमेंटची जंगल ह्यांनी घेतलीयं. लोकांना व सरकारला पाण्याचा व शेतात पिकणाऱ्या पिकापेक्षा निवा-याचा,घरांचा प्रश्न खूप मोठा वाटतोय. माझ्या बघण्यात असे कितीतरी लोकं आहेत की ज्यांच्याकडे राहत्या घराशिवाय दोन चार घरं,फ्लँट गुंतवणूक म्हणून रिकामी घेऊन पडलीय.मध्यंतरी एक छान आर्टीकल वाचायला मिळालं होतं. त्यात लिहीलं होतं राहण्यासाठी प्रत्येकाला एक घरच फक्त घेता येईल बाकी सगळी जमीन जंगलं, शेती, वेगवेगळी पिके ह्यासाठी वहिवाटीत आणता आली तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित.

अर्थात हे कोण्या एकट्याचे काम नव्हे. हे सरकार आणि त्यांना बरोबरीने साथ देणारी जनता असेल तरच हे शक्य आहे.कुठल्याही सरकारच्या आणि जनतेतील प्रत्येकाच्या मनात स्वार्थ, बुभूक्षिता सारखी हावरी वृत्ती ह्याबद्दल चीड निर्माण होऊन फक्त आणि फक्त देशप्रेमाची ज्योत मनात तेवत राहील तेव्हाच हे शक्य होईल. त्यामुळे सध्याची सगळी अवतीभवती ची परिस्थिती बघता आपण ह्या चांगल्या दिवसांचा,चांगल्या वृत्तीचा विचारही करु शकत नाही.

पाण्याचा स्त्रोत प्रदुषित न करणे,योग्य व आवश्यक तितकाच पाण्याचा वापर ह्या किमान गोष्टी तरी प्रत्येकाने पाळल्या तरच ठीक अन्यथा पाणी पाणी करीत सगळा -हास होण्याचा दिवस काही दूर नाही.

सरकारने चांगल्याचांगल्या योजनांसाठी प्रामाणिकपणे फंड उपलब्ध करून द्यावा, अधिकारी वर्गांनी प्रामाणिकपणे पणे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्या फंडाचा त्याच लोकोपयोगी कामासाठी विनीयोग करावा व जनता जनार्दनाने त्या दिलेल्या गोष्टींना जागून आपल्या देशाचा विकास व उन्नती कशी होईल ह्याकडे लक्ष पुरवावं. अशी त्रिमूर्ती ची एकजुट आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करेल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments