श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
(आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.) – इथून पुढे—
यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखेच सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत. जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.
समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.
“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”
किंवा
“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।
‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”
आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!
म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध करुन दिले आहेत. मुळात मन प्रसन्न का करायचे? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. ? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि
*”पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.
आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.
सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.
आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.
१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते
२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.
३. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.
४. मी आजपासून दृढनिश्चय केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.
५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.
६. सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.
समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.
अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.
आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.
एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.”
हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे.
म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’
– क्रमशः भाग दुसरा
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Very Nice