श्री मयुरेश उमाकांत डंके
विविधा
☆ “जिथे राबती हात तेथे हरी” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
” काय मग राजाभाऊ, यंदा किती केल्यात पणत्या?”
” फार नाही केल्या. पावसाचा अंदाज येईना, म्हणून कमीच केल्या.”
” पण तरीही किती?”
” दोन लाख असतील.”
” आं? दोन लाख?”
” होय. सत्तर हजार रंगवलेल्या अन् बाकीच्या बिन रंगवलेल्या.”
” खर्च सुटणार का?”
” सुटणार तर ओ.. रंगवलेली पणती होलसेल भावात पाच रुपयाला एक अन् बिन रंगवलेली तीन रुपयाला एक.”
” पण घेतात का लोकं?”
” अहो दादा, आता आमच्या पणत्या वर्षभर जातात बघा. त्यामुळं विकलं जाण्याचं टेन्शन फार घ्यायचं नाही. वस्तू एकदम चांगली टॉप क्लास असली ना, मग लोकं कुठून कुठून शोधत येतात अन् घेऊन जातात.”
” वर्षभर म्हणजे?”
” अहो, आता समाज बदललाय. सगळ्या सणाच्या दिवशी लोकं आता दीपोत्सव करतात. शिवजयंती ला करतात, राम नवमी ला करतात, दसऱ्याला करतात, पंधरा ऑगस्ट – सहवीस जानेवारी ला करतात. आता दसऱ्याला चार पाच गणपती मंडळवाले हजार-हजार पणत्या घेऊन गेले. कोजागिरी पौर्णिमेला प्रतापगडावर दीपोत्सव होतो, तसा आता बाकीच्या गडांवर पण तिथल्या मंदिरासमोर करतात लोकं. तशा आमच्या वर्षभरात लाखभर पणत्या जातातच.”
– – – एक साधी मातीची पणती. आपल्याला तिची आठवण साधारण दिवाळीतच येते. पण तिच्या व्यवसायात किती दम आहे, हे राजाभाऊ मला सांगत होते.
” आमच्याकडून घेऊन रस्त्यावर विकणारे पण डझनामागं वीस-तीस रुपये कमावतात. मातीची पणती म्हणजे एकदम मोठं मार्केट आहे.”
राजाभाऊंनी चहा मागवला. तेवढ्यात तिथं एक बाई आल्या आणि नुसत्याच उभ्या राहिल्या. राजाभाऊंनी त्यांच्यासाठी चहा मागवला. अन् मुलाला हाक मारुन बोलावलं. मुलगा वही घेऊन आला. त्या बाईंनी त्याला पैसै दिले, वहीत नोंद केली. मुलानं त्यांना चार बॉक्स दिले. त्या गेल्या….
” आता ह्या वैनी.. बरीच वर्षं आपल्याकडं येतात. दिवाळी सिझन ला रोज हजार पणत्या विकायला नेतात. दुसऱ्या दिवशी हिशोब देतात आणि पुन्हा एक हजार पणत्या घेऊन जातात. आतापर्यंत किती विकल्या रे?” त्यांनी मुलाला हाक मारुन विचारलं.
” कालपर्यंत आठशे डझन विकल्या.” मुलानं सांगितलं.
” आता आठशे डझनाला पंधरा रुपयांनी नफा काढून बघा.”
.. .. मी गणित घालून पाहिलं. बारा हजार रुपये..
” आता मागच्या दहा दिवसांत बारा हजार रुपये नफा मिळविला. अजून दिवाळीला दहा दिवस आहेत. म्हणजे ते साधारण बारा हजार रुपये धरा.”
” चोवीस हजार ” मी आपसूक उत्तरलो.
” आता वीस पंचवीस दिवसांत बिन भांडवली चोवीस हजार रुपये कमावले की नई?” राजाभाऊ हसत म्हणाले. आता चकित होण्याची पाळी माझी होती..!
” तुमचा विश्वास बसणार नाही, पण गेल्या दहा वर्षांपासून तेलाच्या पणत्या लावणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. लोक आता मेणाच्या पणत्या फारशा लावत नाहीत.”
” कारण? ”
” कारण एकच – युट्यूब व्हिडिओ.”
” म्हणजे? ”
” मेणाच्या पणत्या आपल्या तब्येतीला चांगल्या नाहीत, असं बऱ्याच युट्यूब व्हिडिओवर सांगतात. पण तेलाच्या पणतीनं आरोग्याला त्रास होत नाही. उलट, ही आपली पणती तर कंप्लीट स्वदेशी आहे. तेल पण स्वदेशी अन् वात पण स्वदेशी.” राजाभाऊ लॉजिक सांगत होते.
” अहो,पण तेलाची पणती फार खर्चिक.”
” कशी काय खर्चिक? एका तेल पिशवीत तुम्ही आठ दिवस डझन भर पणत्या लावू शकाल. सरकीचं तेल वापरा, साधं कुठलं पण तेल वापरा, ती पणती जास्त वेळ जळणार बघा.” .. ते खात्रीनं सांगत होते, मलाही पटत होतं.
” नवरात्रीतल्या घटासाठीची काळी माती विकून लोकं पंचवीस हजार रुपये कमावतात हो. आपल्याला ते सहसा लक्षात येत नाही. शेवटी तो पण बिझनेसच आहे ना. फक्त फरक एवढाच आहे की, तो एसी ऑफिसमध्ये बसून करता येत नाही.” .. राजाभाऊंचा मुलगा म्हणाला.
” खरंय. पण वर्षभर तुमचं पक्कं खात्रीचं उत्पन्न हवं ना. सिझनल गोष्टींवर अवलंबून कसं राहणार? ” मी विचारलं.
” इथंच तर तुमचं चुकतंय दादा. आम्हीं सिझनल गोष्टी विकतच नाही. दिवाळी दरवर्षी येतीच. गणपती दरवर्षी येतातच. राखी पौर्णिमा दरवर्षी असतीच. संक्रांत असतीच. ते कायम राहणारच आहे. पण एखादी कंपनी कायम राहणारच आहे, याची खात्री काय? कसंय दादा, ती आपली हजारों वर्षांची संस्कृती आहे. ती सिझनल कशी होईल? ” पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेला त्यांचा मुलगा मला सांगत होता.
– – खरोखरच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. वर्षभरात आपल्याला आपल्या संस्कृतीनुसार आवर्जून खरेदी करावी लागते अशा जवळपास पंचवीस गोष्टी त्यांच्या मुलानं मला कॅलेंडर घेऊन दाखवून दिल्या. एकदम बिनतोड..!
” फक्त गणपती अन् नवरात्रातच आमची सात आठ लाखाची उलाढाल होती. नंतर पणत्या, दिवे, किल्ले आणि किल्ल्यांवर मांडायची चित्रं, लक्ष्मीच्या मूर्ती यांचा सिझन असतो. ते होईस्तोवर झाडांच्या कुंड्या, संक्रांतीची सुगडं यांचा सिझन येतो. ते संपेपर्यंत पाण्याच्या माठांचा सिझन येतो. जानेवारीत तर गणपतीचं काम सुरु होतं. वर्षभर भरपूर काम असतं. कुठलं सिझनल? आमचा तर वर्षभराचा पक्का ठरलेला व्यवसाय आहे. हाताखाली आठ दहा माणसं कामाला ठेवावी लागतात. वर्षभरात आम्हीं पंधरा लाखांच्या वर उलाढाल करतो. व्यवस्थित नफा मिळवतो. आपण या गोष्टींना सिझनल म्हणणं म्हणजे आपल्या संस्कृतीलाच सिझनल म्हणण्यासारखं नाही का? ”
.. तो जे मांडत होता, ते योग्यच होतं. त्यात काहीच चुकीचं नव्हतं.
“दादा,उलट आमचं काम जास्त अवघड आहे. प्रत्येक पीस स्वतः लक्ष घालून तयार करावा लागतो, नीट पेंट करावा लागतो. जरासुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही. मालाची क्वालिटी जराही बदलून चालत नाही. स्कीम लावून आम्हाला आमचा माल विकता येत नाही. सेल लावता येत नाही. ऑफर देणं परवडत नाही. मार्केटचा अंदाज घेऊनच भांडवल गुंतवणूक करावी लागती. नाहीतर माल अंगावर पडतो. मग सांगा,आम्ही किती मोठी रिस्क घेतो ? ” त्यानं सत्य सांगितलं.
आपण सहसा असा विचारच करत नाही. कारण असा विचार करायला आपल्याला कुणी शिकवलेलंच नसतं. आपली बुध्दिमत्ता, आपली प्रतिभा, आपली कष्ट करण्याची क्षमता, आपली व्यावहारिक दृष्टी, आपण नवनव्या संधी कशा शोधतो, आपण चौकटीबाहेरचा विचार कसा करतो, आपण जोखमीचा आणि नुकसानाचा अंदाज कसा घेतो, या सगळ्या गोष्टी आयुष्यात चांगलं करिअर करण्यासाठी किती गरजेच्या असतात, हे मला त्या बावीस वर्षं वयाच्या मुलानं पटवून दिलं.
तुमचा दृष्टिकोन, तुमच्या उपजत क्षमता, तुम्ही अवगत केलेली कौशल्यं यांची सांगड योग्य त्या मार्गदर्शनानुसार घातली की, तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गावर धावायला लागता. यशस्वी होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकालाच टाकीचे घाव सोसावेच लागतात. कष्ट तर करावेच लागतात. पण निवांत बसून, कष्ट न करता, कसलीच रिस्क न घेता यश मिळवणं जवळपास अशक्य असतं.
हाताची सगळीच बोटं सारखी नसतात, तशी सगळ्याच व्यवसायांची रूपं एकसारखी नसतात. रद्दी मोजण्याचा तराजू, भाजी मोजण्याचा तराजू, माणसांची वजनं करण्याचा वजनकाटा आणि सोनं मोजण्याचा काटा यांच्यात फरक असतोच. त्यांच्यात सगळ्यात मोठं उच्चासन सोनं मोजण्याच्या तराजू ला मिळत असलं, तरी त्याच्यावरची जोखीमसुद्धा इतर तराजूंपेक्षा सगळ्यात जास्त असते. त्याचा परफॉर्मन्स अचूकच असावा लागतो. हे आपण स्वतःही समजून घ्यायला हवं आणि आपल्या मुलांनाही समजावून सांगायला हवं.
करिअरमधल्या यशाला गुंतवणूक हवीच. पण कशाची? तर ती हवी — तुमच्या वेळेची, बुद्धीची, कष्टांची, प्रामाणिकपणाची आणि उत्कृष्टतेची. मातीच्या पणत्या करुन विकणारा सुद्धा दिवाळीत काहीं लाखांची उलाढाल करु शकतो तर, त्याला आपल्या प्रेरणास्थानी ठेवायला हवं. ” मिळावं खाटल्यावरी ” ही वृत्ती समूळ उपटून काढल्याशिवाय खरं यश मिळणारच नाही.
जरा डोळे उघडून आपल्या आजूबाजूला बघा….. डोंगरभर कष्ट उपसून, तावून सुलाखून बाहेर पडलेली आणि खऱ्या अर्थानं सुख समृद्धीचा आनंद घेणारी शेकडो माणसं तुम्हालाही दिसायला लागतील. श्रीमंती न दाखवणारी,पण खरोखरच श्रीमंत असणारी माणसं शोधा, त्यांना भेटा, त्यांची आपल्या मुलामुलींना ओळख करुन द्या. ती आपल्या मुलांच्या देखण्या भवितव्यासाठीची ” ग्रेट भेट ” असेल..!
© श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈