सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जरा विसावू या वळणावर☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

असं म्हणतात की संधी आपल्या दाराबाहेरच उभी असते. दार उघडता क्षणी ती आत येते अन्यथा ती दुसरेच दार ठोठावते. संधीच सोनं करणं हा प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षेचा भाग ठरू शकतो.

बालपण तारुण्य आणि वार्धक्य अशा वळणांवरून जाणाऱ्या जीवन प्रवासात अनेक विसाव्याचे क्षण येतात. तसेच अनेक संधीही उपलब्ध होतात. दूरदृष्टी असलेला त्या संधीचं सोनं करतो. म्हणजेच त्या वळणावर तो जरा विसावतो. या गोष्टीचा झालेला फायदा त्याच्या जीवनपटावर प्रतिबिंबित होतं.

आज संपूर्ण मानव जातीला एकत्र या वळणावर थोडसं थांबायची वेळ आली आहे. एरवी आपण वैयक्तिक रित्या या वळणांवर आपापले निर्णय घेत असतो पण आता एकत्रित चिंतन करण्याची वेळ आली आहे.

करोना नावाच्या अस्मानी संकटाने गेले कित्येक महिने आपण सारेजण सैरभैर झालआहोत .सर्व थरातील, सर्व वयातील, सर्व व्यवसायातील लोकांना एकाच वेळी वेठीस धरले गेले आहे.इतकेच नव्हे तर सर्व देशांवर आणि सर्व जाती धर्मावर एकाच वेळी संकट ओढवण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. लहानापासून थोरापर्यंत रावा पासून रंका पर्यंत सामान्यांपासून ते शास्त्रज्ञ प्रंतप्रधान यासारख्या असामान्यांपर्यंत सर्वांना आव्हानात्मक असेच हे आहे .

हे अवघड आव्हान आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे आणि या संधीचं स्वागत आपण आपली मनाची कवाडं उघडी ठेवून केलं पाहिजे

सध्या आपण सर्वजण जणू स्टॅच्यू झालो आहोत. आर्थिक गती चक्र थांबले आहे. प्रत्येकाचं मन लॉक झालंय .आता आपण अनलॉक व्हायला हवं. करोनाने दिलेल्या या तथाकथित विसाव्याच्या क्षणी काही गोष्टीचा परामर्श घ्यायला हवा.

आत्मनिर्भर भारताची हाक आपल्या रोमारोमात पोचली आहे. त्याची आता आपण कास धरायला हवी .कोणावरही अवलंबून असणे ही अगतिकता आहे हे विसरून चालणार नाही. महात्मा गांधींनी स्वावलंबनाची शिकवण आपणास दिली आहे तिचे विस्मरण होता कामा नये. कोणतेही काम हे मानव निर्मित असतं त्यामुळं ते मानवाला सहज साध्य असंच असतं. याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी.

गृहिणी पासून व्यावसायिकांपर्यंत लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनी हातात हात घालून ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही भावना स्वतःत रुजवून भारत विकसनशील कसा होईल हे सामाजिक भान राखले पाहिजे.

‘मेक इन इंडिया, मेड इन इंडिया’ यावर खूप सखोल विचार केला पाहिजे. परदेशी कंपन्यांच्या वस्तूंवर अवलंबून राहता कामा नये. आपल्या देशातील कुटिरोद्योग लघुउद्योग आणि मोठ्या इंडस्ट्रीज यांना लागणारा कच्चामाल आणि त्यातून तयार होणारे सामान याची व्यवस्था आपणच करू शकतो.आपल्या देशातील खेळणी ही आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करणारी अशी आहेत मग चीनवर अवलंबून का ?

करोनाने आपल्याला आरोग्यम् धनसंपदा हा मूलमंत्र दिला आहे.’ सर सलामत तो पगडी पचास’ हे आता सर्वांना पटलेलं आहे .आपल्या शरीरावर प्रेम करायचं करोनाने आपल्याला शिकवलं आहे. आपल्या देशातील पूर्व परंपरागत योग साधना त्याचे अनुकरण इतर देशातील मंडळी करत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशातील आयुर्वेद हे महत्त्वाचे ठरत आहे.’चरक संहिता’ आता पुन्हा आठवू लागली आहे.

इतर देशांच्या लाईफ स्टाईल चे अनुकरण करता करता आपण आपल्या देशातील आपल्या हक्काच्या सर्व गोष्टी विसरत चाललो आहोत हे जाणवतयं .आपल्या पूर्वजांनी आपल्यावर घडवलेले संस्कार आणि वागण्याच्या पद्धती स्वच्छतेचे नियम आपण धाब्यावर बसून इतरांचं अनुकरण करायला शिकलो. ही आपल्याकडून मोठी घोडचूक झालेली आहे.

आपलाच नमस्कार आपलं स्वागत करतयं. हस्तांदोलन करणं किंवा गळाभेट घेणं या गोष्टी चुकीच्या ठरू लागल्या आहेत. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आज आपण या वळणावर क्षणभर विसावा घेऊन आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं असं वाटतयं .

आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागलोयं असे नाही का वाटत?…….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments