सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
परवाच आमच्या ऑफिसने निवृत्त स्टाफसाठी स्पेशल पिकनिक ठरवली होती……त्याबद्दल..
एखादा दिवस असाही असेल… याची कधी कल्पनाही केली नव्हती. असा विचार करताना मन मागच्या 25 वर्षे मागे धावलं. खूप खूप आठवणी ” मी आधी, मी आधी ” करत धावू लागल्या.
आपल्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा कोट घालून, दर्जेदार पोस्टचा काटेरी मुकुट स्वीकारलेले सर्वेसर्वा ऑफिसर्स.
जबाबदारीची जागा सांभाळताना त्यांची होणारी तारेवरची कसरत त्यांच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होत होती. बिनचूकपणा, शिस्त, आणि वक्तशीरपणा यांचा परिपाठ स्वतः कृतीत आणून इतरांना मार्गदर्शन करणारे वरच्या श्रेणीचे ऑफिसर्स ही काॅर्पोरेशनची दर्जेदार संपत्ती होती. तसेच
त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे काम करणारे कर्मचारी ह्या सर्वांचा एकसंध परिवार म्हणजे आपले काॅर्पोरेशन. हा परिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र एका छताखाली नांदत होता.
लहान लहान कामापासून मोठ्या मोठ्या कामात येणा-या अडचणी एकमेकांच्या सहाय्याने, सल्लामसलतीने सोडवल्याही जात होत्या. काम करताना अनेकदा चुकाही होतच होत्या, पण त्यात सुधारणा करून आपला परफाॅर्मन्स चांगला होण्यासाठी धडपडही होती.
व्यक्तिगत आयुष्यातले चढ-उतार, आनंदाचे-दुःखाचे प्रसंग , एकमेकांना मानसिक आधार देणे, अशी वाटचाल चालू होती.
प्रमोशन मिळालेले खुशीत, तर न मिळालेले नाराज! अशा संमिश्र घटना 3-4 वर्षात घडायच्या.
त्यावेळी काम करताना ऑफिस फाईल्स हे महत्वाचं आणि एकमेव माध्यम होतं. जेव्हा आपल्या प्रपोजल नोटवर APPROVED असा शेरा मिळून ठसठशीत, वळणदार सही दिसली की खूप मस्त वाटायचं.
कित्येकदा अनेक शासकीय, बिन शासकीय आस्थापनातून, विभागातून ( गोव्यातच नव्हे तर देशभरात ) लेडीज स्टाफवरती होणारे नकोसे अनुभव कानावर यायचे. त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये मिळणारी मानसिक, भावनिक आणि शारिरीक सुरक्षितता प्रकर्षाने जाणवायची.
ऑफिसमधले असलेलं वातावरण अतिशय सौजन्यपूर्ण होतं. साधेपणा, शालीनता , आदर, नम्रता ह्या शब्दांना मान होता. तो प्रत्येकाच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत होता. माझ्याकडे जर कुणी काही विचारायला आले तर नकळत उभी राहून त्यांचे बोलणे ऐकणे, ही न सांगता होणारी प्रतिक्रिया होती. आवाज मोठा करून बोलणे, मोठमोठ्याने हसणे ह्यावर स्वतःच घातलेली बंधने होती.
हा
ऑफिसमधल्या आधीच्या लोकांनी घालून दिलेला संस्कार- ठेवा होता.
वर्षामागून वर्षे गेली. हळूहळू एक एक जण 58-60 वयाला येवून निवृत्तीला पोचले. आणि गेल्या दहा पंधरा वर्षात बघता बघता एक पिढीच निवृत्त झाली.
काल पहिल्यांदाच कितीतरी वर्षांनी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि पूर्वीचे राग-लोभ, रुसवे-फुगवे सर्व विसरून एकमेकांना भेटताना, बोलताना, क्षेमकुशल विचारताना होणारा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वहात होता. जे कुणी हे जग सोडून गेले, त्यांच्या आठवणींनी मन भरून येत होते. कालचा दिवस एक अलौकिक, अकल्पनीय आनंदाने भारलेला होता. . काहीतरी हरवलेलं सापडल्याचा अनुभव होता.
इतक्या वर्षांनी एकत्र भेटून झालेला आनंद एक अनामिक आत्मिक सुखदायी होता. हे मात्र नक्की.
तरूण पिढीच्या शिलेदारांनीही भरभरून , आपुलकीने आणि आतिथ्यपूर्वक सरबराई केली, पाहुणचार केला.
PICNIC EVENT
WELL PLANNED
WELL ORGANISED
WELL MANAGED
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈