सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ जागतिक चिमणी दिन… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

चिमणी म्हटलं की मला वि. स. खांडेकर यांच्या एका कादंबरीतील, बहुतेक ‘अमृतवेल’ या कादंबरीतील वाक्य आठवते, ‘मुली म्हणजे माहेरच्या अंगणातील दाणे टिपणाऱ्या चिमण्या! कधी भुरकन उडून जातील सांगता येत नाही!’लग्न झालं की मुली दुसऱ्या घरी जातात. खरंच, मुलीचा लहान असल्यापासून चिमणीसारखा चिवचिवाट, नाजूकपणा, अंगणात खेळणं बागडणं डोळ्यासमोर येतं! मुलं मात्र पोपटासारखी वाटतात असं मला उगीचच वाटतं! पण मुलगी मात्र चिमणी सारखीच असते. छोट्या चणीच्या मुलीला लहानपणी ‘चिऊ’म्हटलं जातं, मग ती चाळीशीची झाली तरी आपल्यासाठीच ‘चिऊ’च रहाते!

साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी अशा करड्या रंगाच्या छोट्या दिसणाऱ्या चिमण्या खूप होत्या. अंगणात काही धान्याचं वाळवण घातलं की या चिमण्यांचे ‘ चिमण घास’ चालू असायचे पण त्यांना हाकलायला नको वाटायचं! माझी मुलगी लहान असताना आम्ही शिरपूरला होतो. तिथे इतक्या चिमण्या असत की त्या चिमण्यांसाठी म्हणून आम्ही खास बाजरी आणून ठेवली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात मुलांना बसवायचं आणि समोर बाजरी फेकायची! की तेथे चिमण्या गोळा होत असत, माझी छोटी त्या चिमण्या बघत आनंदाने तिच्या चिमण्या हाताने टाळ्या पिटायची! आता त्या चिमण्या गेल्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या! शहरात सिमेंटच्या घराच्या जंगलात चिमण्या आता दिसतच नाहीत. चिमणीच्या आकाराचे, चॉकलेटी रंगाचे, ऐटबाज पंखांचे, छोटे पक्षी दिसतात पण त्या खऱ्या चिमणीची सर काही त्यांना येत नाही!

कावळा चिमणीच्या गोष्टीतील चिमणी हुशार असे, ती नेहमीच कावळ्या पेक्षा अधिक समंजस आणि शहाणी, त्यामुळे कावळ्याचे शेणा चे घर वाहून गेले तरी चिमणी आपल्या मेणाच्या मऊ मुलायम, न भिजणार्या घरट्यात राही!’घर माझं शेणाचं पावसानं मोडलं, मेणाचं घर तुझं छान छान राहिलं’ म्हणणाऱ्या कावळ्याला चिमणी तात्पुरता आसरा सुद्धा देत असे. देवाण-घेवाणीचं हे प्रेम निसर्गातील पक्षी आणि प्राण्यात सुद्धा असं दिसतं! पूर्वी पहाटे जाग येई ती चिमण्यांच्या कलकलाटाने! लहान गावातून निसर्ग हा सखा असे. शहरात येऊन या निसर्गाच्या मैत्री ला आपण मुकलो असंच मला वाटतं! सकाळ होते तीच मुळी गाड्यांचा खडखडाट ऐकत आणि कामाची गडबड मागे लावून घेत.. स्वच्छंदी आयुष्य जगायचंच विसरलो जणू!

कोरोना च्या काळात माणसं बंदिस्त झाली पण पक्षी थोडे मुक्त झाले. सकाळचा पक्षांचा किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. निसर्गात असणार्‍या प्रत्येक जिवाचे काहीतरी वेगळेपण असते! तसेच या चिमणीचे! चिमणीचा एवढासा जीव थोड्याशा पाण्यात पंख फडफडवून स्वच्छ आंघोळ करताना दिसतो तेव्हा मन कसं प्रसन्न होतं तिला बघून! कोणत्याही गोष्टीला छोटी किंवा लहान सांगताना आपण चिमणीची उपमा देतो. नोकरीवरून येणाऱ्या आईची वाट बघत असणारी मुलं चिमणी एवढं तोंड करून बसलेली असतात तर या छोट्यांच्या तोंडचे बोल हे ‘ चिमणे बोल ‘ असतात. लहान बाळाचे पहिले बोल, चिमखडे, चिमणीच्या चिवचिवाटासारखे वाटतात. नव्याने अन्न खाणाऱ्या

बाळाला आपण ‘हा घास काऊचा, हा घास *चिऊचा म्हणून’ भरवतो आणि बाळ मटामटा जेऊ लागते!

कोणत्याही छोट्या गोष्टीचं प्रतीक म्हणजे चिमणी! रानात एक नाजूक गवत असतं त्याला आपण ‘ चिमणचारा’ म्हणतो.

लहान बाळाचे लाहया, चुरमुर्याचे छोटे घास म्हणजे चिमणचाराच असतो.

पूर्वी वीज नसायच्या काळात कंदीला बरोबर चिमणी असायची. छोट्या आकारातील हा दिवा म्हणजे चिमणीसारखा!

आज जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी ही छोटीशी चिमणी विविध रुपात आठवणीत आली. आपल्या साहित्यरुपी प्रचंड विश्वात मी दिलेला हा छोटासा चिमणाघास !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments