☆ विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे ☆
आज सन्कष्टी चतुर्थी! सान्गलीच्या गणपती मन्दिराची आठवण आली. ‘झुम्बर’ म्हन्टल की मला सान्गलीचे गणेश मन्दिर डोळ्यासमोर येते. त्या दगडी कमानीतून प्रवेश करून प्रत्यक्ष मन्दिरात गेलं की ते काचेचे झुम्बर लक्ष वेधू न घेत असे. गणेशाची सुबक, सुंदर मूर्ती, प्रसन्न वातावरण आणि मन्दिराचा प्रशस्त अन्तर्भाग !विविध रंगाच्या हन्ड्यानी आणि एका मोठया
काचेच्या झुम्बराने सजवलेले मन्दिर बघत बसावेसे वाटत असे. गणपतीत आणि सणासुदीला ही झुम्बरे दिवे लावल्यावर लखलखत असत. त्या मोठया झुम्बराचा प्रकाश मन्दिर उजळवून टाकत असे.
पूर्वी च्या काळी राजेरजवाड्याच्या महालान्ची, दरबाराची शोभा अशा झुम्बरानी खूपच वाढवली होती. बडोदा, म्हैसूर सारख्या ठिकाण चे राजवाडे पहाताना अशी झुम्बरे राजाच्या रसिकतेचे
आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून छताला टान्गलेले, दिसत असे. मोन्गलकालीन कथा असलेल्या सिनेमात सुध्दा अशी काचेची झुम्बरे कौशल्याने वापरलेली असत!
आता हा झुम्बर प्रकार फारसा दिसत नसला तरी दिवाळीत, सणासुदीला, गणपतीच्या सजावटीत अशी झुम्बरे वापरली जातात. झुम्बराचा आकार कधी गोल तर कधी निमुळता होत गेलेला दिसतो. असन्ख्य काचेच्या लोलकानी झुम्बर बनलेले असते. त्यात रन्गीत दिव्याची भर टाकून
ते अधिक सुशोभित केले जाते !
रोषणाईतला हा झुम्बर प्रकार निसर्गातही आपल्याला पहायला मिळतो. जाम्भळ्या, पिवळ्या रंगाची कँशियाची फुले झुबक्यातून झुम्बरासारखी लोम्बकळताना पाहिली की ती नैसर्गिक झुम्बरे मनाला लोभवतात. केशरी फुलांचे गुच्छ ही असेच दिसतात !
आणखी एका ठिकाणी मला हे झुम्बर आवडलं, ते म्हणजे द्राक्षेबागेत !द्राक्षाच्या बागेतत्या मान्डवाखालून फिरताना द्राक्षाचे घोस झुम्बरासारखे आणि ती टपोरी द्राक्षे मण्यासारखी बघून मन हरखून जाते !
निसर्गात अशी वेगवेगळ्या प्रकारची झुम्बरे पहाताना पौर्णिमेच्या रात्री आकाशाच्या छताला चान्दण्यान्ची असन्ख्य झुम्बरे टान्गलेली आणि त्यामध्ये चान्दोबा एखाद्या चांदव्यासारखा
दिसतो .त्यांच्या कडे बघता बघता माझ्या मनात विचारांची छोटी छोटी झुम्बरे साकार होऊ लागतात! आठवणीची आणि विचारांची अशी असन्ख्य झुम्बरे मनाच्या आकाशात लटकलेली
असतात. ती साकार, होऊ लागतात शब्दांच्या रूपात!
एक एक शब्दांची गुम्फण करतांना मनाच्या पटलावर अशा झुम्बरान्ची सुंदर आरास तयार होते. ही शब्द झुम्बरे शब्दात अशी काही उतरतात, की त्यांची एक सुंदर आरास तयार, होते आणि त्यातूनच एखादे कवितेचे किंवा लेखाचे ‘झुम्बर – शिल्प ‘कागदावर उतरते.
© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे
मो.नं . 8087974168
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈