सौ. अर्चना सुरेश देशपांडे
☆ विविधा ☆ झुंज ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
ही कथा आहे एका आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नीची, ज्योती जाधवची. शेजारच्या गावात राहणाऱ्या किसन लवांडेच्या लेकीची. दोन भावांच्या पाठीवर जन्मलेल्या ज्योतीला तिच्या वडिलांनी मुला प्रमाणे वाढविले, दहावीपर्यंत शिक्षण दिले आणि योग्य वेळ येताच शेतकरी कुटुंबातील गणपाशी लग्न लावून दिले. आई वडील, दोन भाऊ असलेल्या एकत्र कुटुंबात ज्योतीने पाऊल ठेवले ठेवले. सुखी संसारात किरकोळ कुरबुरी नंतर शेतीच्या वाटण्या झाल्या. शेतीसाठी सहकारी बँकेकडून कर्ज काढलं होतं, घराच्या डागडुजीसाठी नात लगा कडून उसने पैसे घेतले होते पण एक वर्षी कोरडा दुष्काळ दुसरे वर्षी अवकाळी पावसाचे थैमान आणि तिसऱ्या वर्षी गारपीट. त्यामुळे लागोपाठ तीन वर्षे हाती पिक आले नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. अशा भयंकर संकटाचा सामना करता करता प्रथम सासऱ्याने आत्महत्या केली आणि दोन महिन्यांनी नवऱ्याने गळफास लावून घेऊन जीवन संपविले. पतीच्या आत्महत्येनंतर ज्योतीच्या पायाखालची जमीन सरकली. उधारी उसनवारीची दारे बंद झाली. काय करावं कसे करावं काहीच सुचेना. ना शेती तंत्राची ची माहिती ना व्यवहाराची कल्पना. तिने बैलगाडी सावकाराकडे गहाण टाकली. त्यावेळी मातेसमान असणारी सासू आणि घरात काम करणारा राम काका तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राम काका म्हणाले “पोरी धीर धर हिंमतीने उभी उभी राहा आणि शेती सांभाळ”. पित्याप्रमाणे असलेल्या राम काकांच्या आज्ञेचे पालन करून ज्योती उभी राहिली. नव्याने जगायचं माणूस ठरवतो तेव्हा पहिलं पाऊल अवघड असतं पण निग्रहानं पाऊल ठेवलं की सर्व जमते. घरातल्या पुरुषांना जे जमले नाही ते करून दाखवायचं अशा निर्धाराने तिनं शेतात पाऊल ठेवलं. सोसायटी कडून मिळालेल्या कर्जाऊ पैशातून सोयाबीनचे बी बियाणे विकत आणले. राम काकांच्या मदतीने शेतात सोयाबीन पेरले. त्यावर्षी पावसाची कृपा झाल्यामुळे पिक चांगले आले. सोयाबीनची मळणी झाल्यावर सोयाबीनची पोती भाड्याच्या बैलगाडीतून गावात घेऊन गेली लोकांनी खूप नाव ठेवली, त्या वेळी प्रचंड मनस्ताप झाला अगदी आत्महत्येचा विचारही मनात तरळून गेला पण आपल्या मुलासाठी आणि सासु साठी ज्योतीने तो विचार दूर सारला. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याचे शेत मिळेल म्हणून भाऊबंदांनी तिला खूप त्रास दिला. घराची कौल फोडली शेतातली काम करायला येणाऱ्या मजुरांना शेतात पाय ठेवण्यास मज्जाव केला पण ज्योतीने ठरवले की शेतातल्या कोणत्याच कामासाठी इतरावर अवलंबून राहायचं नाही व स्वतः सर्व काम करायची. शेतातले तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकावर औषध फवारणी करणे ही काम ज्योतीने राम काकांच्या मार्गदर्शनाखाली केली. मुलाला सांभाळायची जबाबदारी सासुने स्वीकारली होती बांधावर लावलेला भाजीपाला बाजारात जाऊन विकण्यातही कमीपणा मानला नाही. सोयाबीनच्या विक्रीतून आलेल्या पैशातून तिनं बैलगाडी सोडवून आणली.दुसऱ्या वर्षी आलेले पीक स्वतःच्या बैलगाडीतून सोसायटीमध्ये विकून आली. शेती विषयक तंत्रज्ञान तिनं आत्मसात केलं अद्ययावत बी बियाणे खते यासंबंधी माहिती मिळवली व आपलं शेत पिकवलं. पण हिम्मत तिला एका रात्रीत आली नाही त्यासाठी तिला झुंजावे लागलं. आपल्या मुलासाठी व वृद्ध सासु साठी तिची दोन-तीन वर्षे झगडण्यात गेली. आज शेती विषयक सल्ला घेण्यासाठी इतर शेतकरी ज्योतीकडे येतात आणि ती सर्वांना सहाय्य करते. अशी शेतकऱ्याची एक असाह्य विधवा आज गावासाठी आधार बनली आहे. स्वतःचं उदाहरण देऊन इतर स्त्रियांना हिम्मत देत आहे आणि विनवत आहे “रडणं सोडा आणि हिमतीने उभ्या रहा…”
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈