सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

आजची सकाळ नेहमीप्रमाणे खूप प्रसन्न होती. सोनेरी किरणांनी गुलमोहोर( तांबट) आणि शिरिषांच्या(जांभ्या आणि किऱ्या) दोन्ही झाडांना हलकेच कुरवाळले. तशी उंच फांद्यांवरील पोपटकंची पाने हसून उघडली. काल सुर्यास्तानंतर ती निद्राधीन झाली होती. त्यांच्या हसण्याची खसखस खालच्या फांद्यांवरील पानांनी ऐकली आणि तीही झोपाळू डोळे किलकिले करून बघू लागली. अजून रविकिरणे त्यांच्या पर्यंत पोहोचली नव्हती ना! उन्हं वर आली तरी डोक्यावरून चादर ओढून झोपणाऱ्या नाठाळ मुलांप्रमाणे त्यांनी आपले डोळे बंद केले.?? तरीही एक गोडसे स्मित पानापानांवर रेंगाळलेच. पलीकडील गल्लीतल्या आंब्याच्या झाडानेही आपली पाने किंचित हलवून दव शिंपडले आणि जागे होण्याची खटाटोप करु लागले.

जांभ्या आणि किऱ्या समोरासमोरच तर रहात होते. जांभ्याने त्याच्या लगतच्या घराचा टेरेस थोडा झाकूनच टाकला होता. त्या घराची मालकीण थोडी नाराज होती.हं….. जांभ्याच्या सावलीत तिच्या  छोट्या कुंड्यांमधील झाडे पुरेशी वाढत नसत ना!? पण जांभ्या काही ऐकत नसे.तो फांद्या विस्तारुन, हलवून तिच्या गुलांबांबरोबर गप्पा मारे, शेवंतीला गुदगुल्या करे आणि मधुमालतीला निवांत आपल्या

कडेखांद्यावर चढू देई. जांभ्या हळूहळू जागा होऊ लागला आणि फांद्या हलवून थोडी थोडी सूर्यकिरणे या सवंगड्यांना देऊ लागला.

किऱ्याचा पानपिसारा सगळीकडे छान पसरला होता. जांभ्या सारखी त्याच्याजवळ कोणती लतिका फुले वा फळंबाळं नव्हती. तोही तसा प्रेमळच होता. परंतु बिच्चारा! किऱ्या जवळच्या घरातील एक १७-१८ वर्षांची नवयौवना रोज बाल्कनीत येई. गुलमोहोर (तांबट)आणि शिरीष (जांभ्या आणि किऱ्या) यांच्या कडं प्रेमानं बघे.गालातच हसे. आज अचानक किऱ्याची फुलांनी बहरलेली एक फांदी तिच्या बाल्कनीत घुसली होती.किऱ्याला तिचेही गाल आरक्त झाल्यासारखे वाटले. फांदीला प्रेमानं कुरवाळून तिनं एक गिरकी मारली.

किऱ्या रोजच त्याच्यापासून काही फूटांवर असलेल्या तांबटा बरोबर गप्पा मारे. त्याच्या मोरपंखी पिसाऱ्याबरोबर खेळे. हं..  पण आता ग्रीष्म ऋतू सुरू झाला होता. त्याचा मोरपिसारा केंव्हाच गळून पडला होता. केवळ काड्यांचा किरीट. प्रकाशसंश्लेषण नाही. तांबट्याची चूल पेटत नसे ग्रीष्मात. नुसत्या साठवलेल्या अन्नावर तो पोट भरत असे. तसंही पर्णसंभार नसल्याने त्याला ऊर्जाही कमीच लागे.परंतु आत कुठेतरी काहीतरी धडपड चालू असावी बहुधा! ? तांबटाच्या एकाच फांदीला लालचुटुक फूल उमलले. जांभ्या आणि किऱ्या मान तिरकी करून त्याच्याकडं बघत राहिले.किऱ्यानं पानं हलवून दवबिंदूंचं अत्तर वाऱ्याबरोबर फवारलं. एक पिवळी पाकळी लाजत लाजत खाली झुकली आणि तिनं किऱ्याचं अत्तर आवडल्याचं सांगितलं. जांभ्या तांबटापासून थोडा लांब होता. काय बरं करावं? हो!हो!! त्यानं फांद्या हलवून शीतल हवेची झुळूक पाठवली. तांबट मनोमन हरखला आणि बघताबघता नावाप्रमाणेच तामस पिसाऱ्यानं फुलून गेला. काही दिवसातच त्याला पोपटी नाजूक पानंही फुटली. आपल्या छोट्या पर्णतलांच्या टाळ्या वाजवून. तो आनंद व्यक्त करु लागला. बघता बघता हिरव्या चपट्या शेंगांनी तो तरारला. गर्भार स्त्री सारखा जडावला. डोहाळे जेवणाच्या वेळी दिसणाऱ्या मातेसमान सजला. लाल, केशरी, पिवळ्या फुलांचे मोहोर; नाजूक मोरपिसांसारख्या पानांचे नृत्य!! जांभ्या आणि किऱ्या त्याच्याकडं बघतच रहात.

तिन्ही झाडांवर अनेक पक्षी विसाव्याला येत. अगदी पहाटे पहाटे दयाल शीळ घालून सगळ्यांसाठी भूपाळी म्हणे. कावळा, चिमण्या,मैना हळूहळू हजेरी लावत. बुलबूलाच्या जोडीनं बांधलेल्या घरट्यातून त्यांची पिल्लं चोची बाहेर काढून डोकावत. राघूंचा थवा विठू विठू चे भजन करे. थोडासा लांब असलेला, आता मोहरलेला अंबाही कोकीळकूजनात सामील होई. शेजारपाजारच्या खिडक्यांमधून, बाल्कनीतून छोटुले चेहरे डोकावत. त्यांच्या टाळ्या आणि हसरे चेहरे बघून तो झाडोरा कृतकृत्य होई.

पण…

पण….

…. पण हे काय? सूर्यदेव थोडेसे वर आले. माणसांची वर्दळ वाढली. ऑफिसला जाणारे टू व्हीलर वरुन पळू लागले. आणि झाडाखाली गर्दी जमू लागली. प्रथम खूष होत किऱ्यानं फांद्या हलवून गार वाऱ्याची झुळूक सोडली. सावली जास्त दाट केली. वाराही लकेर देत शीतलता पसरवू लागला. पण मग करवत, कुऱ्हाड, फावडी दिसू लागली.. भले मोठे जेसीबी आ वासून पुढं सरसावले. तसा किऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. जांभ्याही भेदरलेला दिसत होता. तांबट तर भितीनं कापायलाच लागला. खाली माणसांची वर्दळ वाढली. आवाज चढले. जेसीबी चा स्टार्टर दाबला गेला आणि तांबटाच्या पायाखालची ज मी न हादरली. भूकंप झाल्याप्रमाणे सगळेच थरथरु लागले. जेसीबी नं चांगलंच सात-आठ फूट खणून काढले आणि….. आणि तांबट मुळासकट आडवा झाला..करवती, कुऱ्हाडीनं तांबटाच्या फांद्या तोडण्यात आल्या. खोडाचे मध्ये कापून तीन चार तुकडे केले गेले. तांबटाचे आक्रंदन जांभ्या आणि किऱ्या पर्यंत पोहोचत होते. पण त्यांची भाषा माणसांना कळत नव्हती.

फुललेल्या तांबटाची एक फांदी हातात धरून ती नवयुवती बाल्कनीत ऊभी होती. दोन्ही डोळ्यातून पाणी पाझरत होते.. तिचा मूक साथी पिसारा मिटून, जागीच जमीनदोस्त झाला होता.तांबटाचे रस्ताभर विखुरलेले अवयव गोळा करून टेंपो धूर ओकत निघून गेला…..

…… रस्ता मात्र लाल, पिवळ्या, केशरी गालिच्यानं आणि पोपटी पिसांनी मखमली झाला.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments