सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे’माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसलं की मन असे स्वैर पणे फिरत असते! सध्या बाहेर फिरणे कमी झाले आहे,पण या बाल्कनीतल्या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येते! दिवसभराच्या उन्हाच्या काहिलीनंतर येणारी संध्याकाळची वार्याची झुळुक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते!थंडी किंवा पावसाळ्यात या झुळुकेचे तितके महत्त्व नाही,
पण उन्हाळ्यात ही झुळुक खूपच छान वाटते. दु:खानंतर येणारं सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!सतत सुखाच्या झुल्यावर झुलणार्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्या नंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला आनंद देतात आणि गार वार्याच्या झुळुकीचा आनंद देतात!
हीच झुळुक कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही, पण दुसऱ्या कुणाकडून तरी,अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र मैत्रिणींकडून मिळते.
तो प्रेमाचा सुखद ओलावा त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळुक असते.
कधीं कधीं साध्या साध्या गोष्टीतून ही आपण आनंद घेतो.
गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते तेव्हा खिडकीतून येणारी वार्याची झुळुक आपल्याला ‘हुश्श् ‘ करायला लावते! कधीं अशी झुळुक एखाद्या बातमी तून मिळते! अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळूक च असते. माणसाचे आयुष्य सतत बदलते असते. कधी एका पाठोपाठ एक इतकी संकटे येतात की या सर्वाला कसे तोंड द्यावे कळत नाही, पण अशावेळी अचानक पणे एखादी चांगली गोष्ट घडते की त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते.
माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवर्या चा अॅक्सिडेंट झाला. जीव बचावला, पण हाॅस्पिटलमध्ये दोन महिने पडून रहावे लागले. दोन लहान मुलं होती तिला, नवर्याचा व्यवसाय बंद पडलेला,रहायला घर होते, पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरी चा काॅल आला,ट्रेनिंगसाठी एक महिना जावं लागणार होतं,मुलांना कुणाजवळ तरी सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली. नोकरी कायम स्वरुपी झाली. आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.
वादळवार्यात झाडं, घरं, माणसं सारीच कोलमडतात. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात
असतेच असे नाही, पण झुळुक ही सौम्य असते. ती मनाला शांति देते.
लहानपणी अशी झुळुक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा,आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळुकीसारखा वाटायचा. रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकंफुलकं पीस व्हायचं आणि वार्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळुक अनुभवायला मिळायची!
वेगवेगळ्या काळात,वेगवेगळ्या रूपात ही ‘झुळुक’ आपल्या ला साथ देते. कधी कधी
आपण संकटाच्या कल्पनेनेही टेंशन घेतो. प्रत्यक्ष संकट रहातं दूर, पण आपलं मन मात्र जड झालेले असते. अचानक कुणीतरी सहाय्य करतं,संकट जाते आणि एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.
मध्यंतरी कोरोनाच्या काळात आपण कठीण काळातून जात होतो. मन साशंक झाले होते., अस्थिर होते.
जीविताची काळजी तर होतीच, पण भविष्याची होती. अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देताना लोक अगदी हवालदिल झाले होते. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! रोजच्या बातम्या आपल्या ला आशा – निराशेवर झुलवत होत्या. लवकरच हे ‘कोरोना’ चे संकट दूर होईल असं ऐकलं की समाधानाची झुळुक येत होती तर पुढील दहा दिवस धोकादायक आहेत ऐकलं की मनात ्वादळ उठतं होतं!आता हे रोगाचं उच्चाटन हळूहळू होत जाईल ही आशा आपल्या मनी होती. निसर्गाने हिरावून घेतलेलं आपलं स्वातंत्र्य परत मिळवून आपण जर जाणीवपूर्वक वापरले तरंच आपल्याला ही सुखाची झुळूक मिळणार! याची जाणीव माणसाला होत होती.
संध्याकाळी येणारी वाऱ्याची झुळूक ही अशीच सौम्य,आनंद देणारी आहे. तिच्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्यांचे थैमान नसते. ती हळूहळू अंगात भिनते. तिचा आस्वाद घेता आला पाहिजे.
कोरोनाचे वादळ घोंघावत होतं ते हळूहळू शांत होत गेले. लोकांनी संयमाने आणि धीराने तोंड दिले.
अशावेळी कुठून तरी आशादायी स्वर येतात, ‘दिस येतील, दिस जातील. . . गाण्याचे! हे संकटाचे वादळ जाऊन झुळुक येईल आशेची, आनंदाची!
वादळ जेव्हा परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधी तरी ते लयाला जाणारच असते!
ते वादळ जाऊन शांत झुळूक येईल या आशेवर प्रत्येक भारतीय आलेल्या वादळाला धीराने,संयमाने तोंड देऊन त्या शीतल झुळुकीचे सर्वांत करण्यास तयार होता! सुदैवाने त्या कोरोनाच्या वादळाला आपण धैर्याने तोंड दिले आणि ती जीवनातील शीतल झुळूक अनुभवता आली हे आपले भाग्यच!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈