सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ झपूर्झा म्युझियम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(एक सुंदर सहल….)
“झपूर्झा “म्हणजे काय हे प्रथम खरोखरच माहिती नव्हतं! आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी केशवसुत यांची”झपूर्झा “ही लोकप्रिय व गाजलेली कविता!
‘झपूर्झा ‘ म्हणजे ‘झपाटले पणाने जगणे’ असा अर्थ घेतला जातो.
‘जा पोरी जा’ हे वाक्य झपाट्याने उच्चारल्यास ‘झपूर्झा’ असा शब्द ऐकल्याचा भास होतो, तसा ध्वनी होतो असे ट्रान्स लिटरेशन फाउंडेशन शब्दकोश नमूद करते.
अर्थाचे असे काही वाद असले तरी ‘झपूर्झा’ खरोखरच आपल्याला ‘जगणे कसे असावे’ हे तेथील प्रदर्शनीतून दाखवून देते. पुण्याजवळ कुडजे, या गावाजवळ हे म्युझियम आहे. प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अजित गाडगीळ यांनी जुन्या गोष्टींचा संग्रह करून हे म्युझियम उभे केले आहे. राजा रविवर्म्याची चित्रं ,१००/१५० वर्षांपूर्वीचे दागिने, साड्या, पैठण्या यांचे आठ वेगवेगळ्या गॅलरींमध्ये प्रदर्शन आहे. पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे कला, चित्र, नाट्य, शिल्प या सर्वांशी इथे मैत्री जोडली जाते….
७ जानेवारीला योगा सेंटर ची *झपूर्झा*ला ट्रिप नेण्याचे ठरले आणि आम्ही दोघे त्यांंत सहभागी झालो.१७/१८ जणांची ट्रॅव्हलर गाडी बुक केली होती.. सकाळी १० वाजता निघालो.साधारणपणे पाऊण तासात आम्ही तिथे पोचलो.सकाळचे प्रसन्न वातावरण होते.घरून नाश्ता करून निघालो होतो, तरी वाटेत छोटे छोटेखाद्य पदार्थ खाणे चालूच होते.
‘झपूर्झा’ च्या गेटवर पोहोचल्यावर तिकिटे काढली आणि आत प्रवेश केला.( शनिवार/ रविवार रेट जास्त असतो) आत प्रवेश केल्यावर प्रथमच नटराजाच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन झाले. केशवसुतांची एक कविता आपले स्वागत करताना दिसली. आणि लक्षात आले की हे नुसतेच प्रदर्शन नाही तर इथे चांगल्या वाचनीय अशाही बऱ्याच गोष्टी आहेत.
शिरीष बेरी या प्रसिद्ध आर्किटेक्टने साडेसात एकर जागेत हे संग्रहालय उभे केले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण तिथे आहे. खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर जवळ हे ठिकाण असल्यामुळे हवेमध्ये चांगला गारवा असतो!
म्युझियमचा एकूण नकाशा पाहता तिथे आठ गॅलरीज्, ॲम्फी थिएटर, कॅफेटेरिया, ऑडिटोरिअम,सुवेनिअर शाॅप अशी सर्व दालने आहेत.
हे सर्व पाहण्यासाठी तीन-चार तास वेळ लागतो. तसेच इथे” पूना गेस्ट हाऊस”चे नाश्ता आणि भोजन यासाठी चांगले उपहारगृह असल्याने बरोबर खाद्यपदार्थ न्यावे लागत नाहीत आणि तशी परवानगीही नाही.
‘लाईट ॲन्ड लाइफ’ या पहिल्या दालनात सर्व प्रकारचे दिवे बघायला मिळतात. पितळ्याचे, चांदीचे, देवापुढील दिवे, समया, असे विविध प्रकारचे दिवे तेथे बघायला मिळतात.
दुसऱ्या दालनास’ ‘प्रिंट अँड इन प्रिंट ‘असे म्हणतात. तेथे छपाई तंत्राचा शंभर वर्षाचा इतिहास तसेच प्रिंटिंग संबंधी सर्व माहिती आहे. राजा रविवर्म्याची पेंटिंग्ज आहेत. चॉकलेटचे डबे, ट्रे,फ्रेम्स अशा जुन्या वस्तूंचे असंख्य नमुने आहेत.
तिसऱ्या दालना मध्ये 1832 च्या दरम्यान असणाऱ्या चांदी सोन्याच्या वस्तू, दागिने, भातुकली, विविध प्रकारच्या फण्या, सौंदर्य प्रसाधनांचे डबे, अत्तर दाण्या, गुलाब दाण्या इत्यादींचे प्रकार पाहायला मिळतात.
चौथ्या दालनात दुर्मिळ पैठण्यांचा संग्रह आहे. तिथे प्रवेश करताच इंदिरा संत यांची “पैठणी” कविता वाचायला मिळते. पेशवाईतील विविध पैठण्या तेथे संग्रहित केल्या आहेत.
स्थापत्य कलेशी संबंधित निसर्गाशी मेळ घालणारे असे पाचवे दालन आहे. तिथून जवळच कॅफेटेरिया आहे. इथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच उकडीचे मोदक, पुरणपोळी, खास पुणेरी अळू यासह असणारे जेवण मिळते ,त्यामुळे अशा सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊन पुन्हा फिरायला आणि फोटोग्राफी करायला उत्साह येतो.
बसण्यासाठी सुंदर जागा, समोर दिसणारे धरणाचे पाणी, वाटेत असणारे कमळाचे पाॅड्स आणि शेवटी असणारे शंकराचे मंदिर असा सर्व परिसर बघता बघता वेळ कसा जातो ते कळतच नाही!
साॅव्हनेअर शॉप हे बायकांच्या खरेदीचे आवडते ठिकाण! तिथे विविध प्रकारच्या पिशव्या, टी-शर्टस्, मग्ज्, पेंटिंग्ज, अशा विविध प्रकारच्या वस्तू आहेत. विंडो शॉपिंग आणि थोडीशी खरेदी तेथे होतेच!
एक दिवस निसर्गरम्य परिसरात आनंदात घालवण्यासाठी हे ठिकाण खरोखरच अप्रतिम आहे! अजित गाडगीळ यांनी ‘झपाटलेपणाने जगणे’ हा अर्थ खरोखरच सार्थ केला आहे हे म्युझियम उभारताना!
आमचा सहलीचा दिवस असाच अविस्मरणीय झाला.जेवण आणि फिरणे करून येताना ३ च्या दरम्यान आम्ही सर्वजण योगा सेंटर मधील मनीषा मॅडमच्या घरी चहा, बिस्किटे घेऊन फ्रेश झालो.
लहानशा खेड्यातील त्यांचे घर खूपच छान वाटले. घराभोवती फुलांची झाडे , शेवग्याचे झाड तसेच छोटी छोटी वांग्याची झाडे पाहून आनंद वाटला.. येताना ताजे ताजे मुळे,पालक, चाकवत, शेवगा अशा खास गावाकडच्या ताज्या भाज्या घेतल्या.
निसर्गाचे हे रूप पाहून वाटत होते की, शहराच्या कृत्रिम जीवनापेक्षा हे किती आकर्षक आहे आणि निसर्ग आपल्याला किती देत असतो!
“देता किती घेशील तो कराने..”
अशी आपली अवस्था होते!
संध्याकाळी एकमेकांचा निरोप घेऊन घरी आलो. कालचा संस्मरणीय दिवस मनामध्ये कायमचा घर करून राहीला!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈