☆ विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक ☆
लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत..!
कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली,उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून…,
“अभिधा” शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती..!
ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी ‘अभिधा धुमटकर’ हिची.!
अभिधा आपल्या पार्ल्यातल्या… शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.!
पुढे पी.एच.डी.पर्यंत मजल मारली.!
सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत.!
ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही.!
ती जन्मतःच दृष्टीहीन आहे.!
या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.!
अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक.!
ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची.!
ही मात्र डोळे फिरवायची.!
त्यावरुन आईने डॉक्टरांना हे सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही.!
खरी कहाणी इथूनच सुरू होते.!
या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.!
त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.!
त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं.!
बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती.!
एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता.!
मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती.!
पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला.!
बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले.! प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच.!
जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची.! ‘कमळ’ शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते..! शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा ‘ब’ कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.!
अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती.! आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता.! शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, “पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार.!
पण मला खेळू द्या.!’ यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा.. तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता..!
आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं.!
अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली.! गणितात पैकीच्या पैकी मार्क… आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं.!
नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं.! त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची.! नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं.!
अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती.!
संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.!
याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली.! पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या.!
1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली.!
सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी.एच.डी चा विषय पक्का झाला.!
हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले.. शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात.! एम.ए.,बी.एड.,सेट,नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.!
पण अंध म्हणून नकार मिळत होते.! ती खूप खचून जायची.!
पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली.!
नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली.!
ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे.!
रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती.! पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी.एच.डी. मिळाली.!
पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली.! 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.!
श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं.!
फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं.! त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती.! अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती.!
पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं.!
लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्स App गृप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली.! सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे.!
ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते.!
सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे.!
दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं.! त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम.!
आभिधाचे 14 रिसर्च पेपर “इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली”, “इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स”, “इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग”, “इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च” अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.!
लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या अभिधाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!
© सुश्री संध्या ओक
मो 9833247387
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Grand Salute to the ladies mentioned in the article !!!
उत्तुंग व्यक्तीमत्वाला सलाम