डॉ अभिजीत सोनवणे
विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ आई—!!! भाग 4 ☆
(©️doctor for beggars )
( मी काय बोलणार यावर—-) इथून पुढे
मी स्तब्ध झालो…!
स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना, कटु अनुभव गाठीशी असतांना, पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते…!
हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा… ?
‘चला निघु मी डाॕक्टर ?
केळी घ्यायचीत मला…’ आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो.’आता केळी कशाला…? नाही म्हणजे कुणाला… ?’ ——मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो.
‘अहो, तो काल मला म्हणाला, केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय. मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला… पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात. आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु, केळी मिळाली नाहीत म्हणुन…!
मग आठवलं… मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी… जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात… !
म्हटलं बघू, पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ…! शिकरण करुन देईन हो, पोराचं मन तरी मोडणार नाही…!’
भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना, देव दिसेना… दिसत होती फक्त एक आई… !
रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई…!
निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई…!
हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई…!
याच बाईत मला दिसली आई !!!
भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो, तीने पाया पडु दिलं नाही… !
‘आज्जी, मी तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु…? दाटल्या गळ्यानं मी विचारलं.
यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,’पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची… ?’
‘नाही आज्जी, वृद्धाश्रमात तुमची सोय होईल, मुलाचं मग बघु काहीतरी… !’
माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली… ,’काय डाॕक्टर, मग काय फायदा…? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी… अजुन केळ्याची सोय करायचीय मला…’
असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला…! —–
मी इकडं तिकडं आसपास पाहिलं… सर्व बंद.
आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती…
मला दोघांचं भविष्य दिसत होतं… आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार…या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, ‘आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु…?’
यावर ती हसत म्हणाली होती, ‘अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी … आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता… ?
या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी…. आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहू दे…त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत …!
ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली…!
नव्यानंच पुन्हा आई झालेल्या, म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन … ?
आईला वय कुठं असतं…?
ती कधीच म्हातारी होत नाही, हेच खरं !
गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा, तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा, पैसे असण्याचा, पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी… !
ती फक्त आई असते !
पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागू शकते… !
पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात !
दोन्हीचं वजन सारखंच…!!!
यानंतर मी त्या जागेवर, केळी घेऊन ब-याचदा गेलो… पण ती दिसत नाही !
हातात केळी घेऊन माझी नजर तिला शोधत असते…
का कोण जाणे…तिला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो…!
का कोण जाणे…तिला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो…!
का कोण जाणे…तिला शोधतांना तिने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो…!
का कोण जाणे…तिला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो…!
का कोण जाणे…!!!
समाप्त
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈