विविधा
☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
माणूस आजारी पडला, की त्याला दहा दवाखाने फिरायला लागतात. दहा डॉक्टरांच्या दहा तर्हा. एकाच एक मत, तर दुसर्याचं बरोबर त्याच्या विरुद्ध. प्रत्येक जण वेगवेगळ्या चाचण्या करून घ्यायला सांगतो. एकाचा रिपोर्ट दुसर्याला चालत नाही. खरं तर दोन दिवसांपूर्वी सुद्धा रक्त आपलेच असते बरं का! पण तरीही त्याचे आलेले रिपोर्ट दोन दिवसांनंतर दुसर्या डॉक्टरांना चालत नाहीत. तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं आणि मला अनेक डॉक्टरांच्या तसेच तिथे असणार्या वेटिंग रूमच्या अनेक तर्हा अनुभवायला मिळाल्या.
मी माझ्या नेहमीच्या डॉक्टर काकांच्या क्लिनिक मधे माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. नेहमी प्रमाणे दवाखाना खचाखच भरलेला होता. काहींना टेस्टचे रिपोर्ट दाखवायचे होते तर काहींना तपासून घ्यायचे होते. काहीजण आपल्या पेशंट बरोबर आले होते.
जे बरोबर आले होते ते उगीचच इकडून तिकडे कर नाहीतर मोबाईल बघ, ओळखीचे कोण असेल तर इकडच्या तिकडच्या गप्पा मार असं काहीतरी करत बसले होते. एका लहान आजारी मुलाला घेऊन त्याची आई आली होती, तिच्या मात्र जिवाची घालमेल चाललेली होती.
सारखं, त्याच्या डोक्याला हात लावून किती ताप आहे पहात होती. एक आजी खूप अस्वस्थ वाटत होती ती सारखी आपल्या नवऱ्याला काय आला असेल हो रिपोर्ट असं विचारतं होती.
एक गृहस्थ मात्र उगीचच केबिन च्या आत डोकावून डॉक्टर दिसतात का ते पहात होते. त्यांना एकदाचे ते दिसले आणि त्यांनी चक्क उठून त्यांना नमस्कार केला आणि आपल्या सौ ला म्हणाले बरीच वर्ष झाली ओळखतो मी ह्यांना अगदी देव माणूस.
दोन आज्या एकमेकांना आपापली व्यथा सांगून आपला आजार दुसरी पेक्षा किती सौम्य किंवा गंभीर आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. त्यातलं फारस दोघींना ही कळत नव्हते ही गोष्ट वेगळी.
एका कोपर्यात दोघी मैत्रिणी आजार आणि त्यावरचे घरगुती उपाय ह्यावर चर्चा करत होत्या, तर दुसरीकडे दोघी जणी कोणत्यातरी भाजीची रेसीपी सांगण्यात गर्क होत्या. इतक्या की त्यांचा नंबर आलेला ही त्यांना कळले नाही. थोडक्यात काय दवाखाना असला तरी वातावरण गंभीर नव्हते.
मी ही तशी इथे रिलॅक्स असते. भीती नसते मनात ना दडपण असते. कारण हे माझे डॉ काका म्हणजेच डॉ शिवानंद कुलकर्णी खूप शांत आणि प्रेमळ आहेत. विनाकारण एखाद्या आजाराचं खूप मोठं चित्र उभ करत नाहीत, ना टेंशन देतात. चेहर्यावर नेहमी हास्य असते मग तुम्ही अगदी दवाखाना उघडल्या उघडल्या जा किंवा बंद व्हायच्या वेळी. काही होत नाहीगं एवढ्या गोळ्या घे, बरी होशील… एवढ्या त्यांच्या वाक्यांनेच निम्मे बरे व्हायला होते.
मला नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे ते एकाच वेळी सहा, सहा पेशंट आत घेतात. त्या पेशंटची बडबड, गलका चालू असतो तरीही ते एवढे शांत कसे काय राहू शकतात ? प्रत्येकाचा आजार वेगळा, कोण खोकत असतो, कोण कण्हत असतो कोणाचे इंजेक्शन असते, कोणाचे ड्रेसिंग, तर कोणाचे आणि काय. तरी काका आपले प्रत्येकाशी तितक्याच आपुलकीने चौकशी करत असतात. म्हणून तर ते प्रत्येकाला आपले वाटतात…
असो इथली तपासणी करून मी orthopedic दवाखान्यात गेले. तिथे तर पेशंटचा समुद्रच होता. समुद्र म्हणल्यावर ओळखले असलेच तुम्ही. हा समुद्र म्हणजे मिरजेचे नामांकित आणि तज्ञ डॉक्टर G. S. कुलकर्णी. आता आपल्याला किती वेळ वाट पहावी लागेल ह्या विचारानेच निम्मे दमायला झाले. मनात आले कशाला लोकं इतकी धडपडून आपली हाडं मोडून घेतात काय माहीत.
आधीच टेंशन आलेलं त्यात आजूबाजूला सगळेच पेशंट मोडक्या अवस्थेत. कोणाचा हात बांधला होता तर कोणाचा पाय फ्रॅक्चर होता .कोणाच्या मानेला पट्टा, तर कोणाच्या कंबरेला.
एकीकडे एक्सरे साठी गर्दी होती तर दुसरीकडे MRI साठी. कोण ड्रेसिंग साठी आले होते तर कोणाचे प्लास्टर घालणे चालू होते. थोडक्यात काय तर दवाखान्याचे वातावरण गंभीर होते. इथे कोणीच relaxed नव्हते.
मी एका कोपर्यात माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले. तिथेच बाजूला एक लहान मुलगा आपल्या प्लास्टरवर चित्र काढत बसला होता. ते पाहून मला खूप छान वाटले आणि माझ टेंशन कुठल्या कुठे पळून गेलं. मोठी माणसं विनाकारण एखाद्या गोष्टीचा जास्त बाऊ करतात असं मला वाटलं.
तिथला नंबर माझा झाला आणि मला काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला गेला. नशिबाने मला मानेचा दागिना लागला नव्हता. म्हणुन तिथून मी physiotherapist कडे गेले.
तिथे ही बाहेर बरेचजण बसले होते आपला नंबर कधी येणार ह्याची वाटं बघत. मीही वाट पाहू लागले. तिथे एक गृहस्थ त्यांचे व्यायाम दुसर्या गृहस्थांना शिकवत होते जणू त्यांची आता त्यात पीएचडी झाली होती. मला तर हे बघून हसूच येत होते. तेवढ्यात तिथे एक आई आपल्या तान्हुल्याला घेऊन आली. त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला होता. बाळाला मानही वर करता येत नव्हती. हातात ही काहीतरी दोष होता. आईच्या चेहर्यावर काळजी दाटली होती. ते पाहून मात्र मला खूप वाईट वाटले. देवाकडे मनोमन प्रार्थना केली की ह्या बाळाचा आजार लवकर बरा होऊदे रे बाबा.
शेवटी एकदाचा नंबर आला माझा.
बरेच व्यायाम आणि सूचना घेऊन मी बाहेर पडले. मला जरा शंका जास्त असतात, त्यामुळे मी खूप शंका त्या डॉक्टरांना विचारल्या. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक शंकेचे निरसन जितक्या वेळा मी विचारेन तितक्या वेळा न चिडता सांगत होते. त्यांनी मला शांत पणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हे म्हणजे माझे physiotherapist डॉक्टर सुनील होळकर. प्रत्येक व्यायाम दोन दोनदा दाखवला आणि माझ्याकडून तो करून ही घेतला. त्यामुळे मनातली भीती नाहीशी झाली, आणि आपण लवकरच बरे होऊ ह्याची खात्री पटली.
अश्या तर्हेने अनेक दवाखाने फिरून मी घरी पोहोचले. घरी पोचले तेव्हा खूप दमून गेले होते. पण आज मला अनेकांची आजारपणे, तक्रारी, हाल, वेदना पहायला, अनुभवायला मिळाल्या होत्या. अनेक प्रश्न होते लोकांचे, ज्याची उत्तर शोधण्यासाठी ते दवाखाने फिरत होते. काहींना उत्तर मिळाली होती तर काही उत्तर मिळायच्या प्रतिक्षेत होते.
ह्या सगळ्यात आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जितक्या व्यक्ति तितक्या तक्रारी असतात. प्रत्येकांचे डॉक्टर वेगवेगळे असतात.
काही डॉक्टर उग्र, गंभीर, तर काही शांत, प्रेमळ असतात.
प्रत्येक डाॅक्टरांना रोज तेच तेच आजार आणि असंख्य पेशंट तपासायचे असतात. तेच तेच निदान अणि त्याच त्याच टेस्ट सांगायच्या असतात, रोज तेच प्लास्टर आणि रोज तेच तेच व्यायाम शिकवायचे असतात.
त्यांना तेच तेच असतं पण पेशंट साठी मात्र प्रत्येक गोष्ट नवीन असते. कारण ती त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत असते. जे डॉक्टर हे लक्षात ठेऊन पेशंटशी न दमता, न थकता आपुलकीने बोलतात ते आपलेसे वाटून जातात. आपल्या मनात त्यांच्या बद्दल एक आदर, एक विश्वास निर्माण करतात आणि नकळत मनात एक वेगळं घर बनवून जातात.
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈