श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ डाॅ. एस्. आर. रंगनाथन् ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
विज्ञानाचे किंवा शास्त्राचे अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत.पण असेही एक शास्त्र आहे की आपण त्याचा उपभोग घेतो,पण ते शास्त्र आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येत नाही.हे शास्त्र म्हणजे ग्रंथालय शास्त्र.
आज 12ऑगस्ट.हा दिवस रंगनाथन यांचा जन्मदिवस.हा दिवस भारतात रंगनाथन् दिन म्हणून साजरा होतो. कारण त्यांना भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते.
शियाली राममृत रंगनाथन् यांचा जन्म 12/08/1892 ला तामिळनाडूत झाला. त्यांनी गणित विषयात एम्.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कोईमतूर, वाराणसी, उज्जैन, दिल्ली विश्वविद्यालय अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. 1924मध्ये त्यांना मद्रास विश्वविद्यालय पहिले ग्रंथपाल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. 1945 ते 1947 या काळात त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात ग्रंथालय अध्यक्ष व ग्रंथालय शास्त्र अध्यापक या पदावर काम केले. 1962 साली बंगलोर येथे त्यांनी प्रलेखन अनुसंधान व प्रशिक्षण केंद्र या संस्थेची स्थापना केली व अखेरपर्यंत तेथे कार्यरत राहिले. 1965 साली भारत सरकारने त्यांना ग्रंथालय शास्त्रातील राष्ट्रीय शोध प्राध्यापक या पदवीने सन्मानित केले.
ग्रंथशास्त्राविषयी त्यांनी केलेले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. ग्रंथांचे वर्गीकरण करणे, ते सूचीबद्ध करणे हे आज सोपे वाटत असले तरी त्याची सुरुवात रंगनाथन् यांनी केली. पुस्तक शास्त्राविषयी त्यांनी 50 कारणेअधिक पुस्तके लिहिली आहेत. शिवाय एक हजार हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथालय प्रशासन, ग्रंथालय शास्त्र, पुस्तकांविषयी कायदे अशा विषयांशी संबंधित पंचवीसहून अधिक समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे व पदाधिकारी म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ग्रंथालयासाठी धोरण ठरवण्यातही त्यांचा सहभाग होता. या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना ग्रंथालय शास्त्राचे जनक असे म्हटले जाते. 1957 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री ने सन्मानित केले. तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या सल्लागार समितीतही त्यांना स्थान देण्यात आले होते.
ग्रंथाना गुरू मानण्याची आपली परंपरा आहे. पण या गुरूची सेवा कशी करावी याचेही एक शास्त्र आहे. ते आजच्या रंगनाथन् दिनामुळे आपल्याला समजले आहे. आता हे शास्त्र समजून घेऊन ते आत्मसात करण्याने रंगनाथन् यांचा खरा गौरव होणार आहे.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈