सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
प्रसंग साधेच. सर्व सामान्यांच्या घरात घडणारे. पण त्यातल्या डोळ्यातल्या पाण्यानं भावनांचं गहिरेपण कळतं.
40वर्षापूर्वी ची गोष्ट. रमण 18 वर्षाचा, BSc पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतली होती. सुशिक्षित आणि सुसंस्कृत आईवडील. समाजात त्यांना खूप मान. पण हा सामाजिक मान आणि त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे एका काठीची दोन टोकं. कधीच एकमेकांना न मिळणारी. काॅलेजला जायचे म्हणजे पुरेसे कपडे तरी पाहिजेत. अगदी छानछोकी नाही तरी जेमतैम दोन पॅन्ट आणि शर्ट! भाऊ भाऊ एकमेकांचे कपडे वापरायचे. होती जी पॅन्ट, ती पण जुनी झालेली. त्यादिवशी रमणची रोजची बस चुकली. प्रॅक्टिकल चुकले म्हणून प्रोफेसर रागावले. घरातून निघताना काही खाल्लं नव्हतं, म्हणून कॅन्टीनमध्ये गेला तर खिशात पैसे नव्हते. तसाच काॅलेजवर परतला, दुस-या तासाला उशीर नको म्हणून गेटवरून उडी मारून शाॅर्टकट घ्यायला गेला, तर पॅन्ट खिशापासून गुडघ्यापर्यत टर्रकन फाटली. रमणच्या डोळ्यांसमोर अक्षरशः अंधार झाला. तडक निघाला आणि पॅन्टचा तुकडा सावरत घरी आला. सकाळ पासून घडलेल्या घटनांनी तो अस्वस्थ झालाच होता. त्यात हे संकट! अचानक घरी आलेला बघून आणि त्याचा गोरापान चेहरा तांबडा लाल झालेला बघून ताईनं जवळ जाऊन विचारलं, काय झालं रे? तेव्हा पॅन्ट दाखवून ताईला मिठी मारून रडायला लागला. त्या रडण्यात दुःख होतं, ते त्याच्या आवाक्यात नसणा-या आर्थिक परिस्थिती चं. प्रोफेसरांच्या सर्वांसमोर रागावण्याचं, वडिलांच्या धाकाचं, आणि उद्या काय? या नैराश्यपूर्ण प्रश्नाचं. असे अनेक तरूण आहेत रमणसारखे, अगतिक, आणि परिस्थितीनं गांजलेले..त्यांच्या डोळ्यातले पाणी नैराश्याचं, असहाय्यतेचं!
जर रमण त्यावेळी रडला नसता, त्यानं स्वतःच्या भावना रडून मुक्त केल्या नसत्या तर त्याच्या मनात चीड, राग, अशा वैफल्यग्रस्त वृत्ती निर्माण झाल्या असत्या. त्यातून आईवडिलांना रागाने बोलणे, अपमान करणे, त्यांच्या पासून दूर जाणे हे घडलं असतं. पण रडून मोकळा झाल्यामुळे त्याचं मन त्या क्षणी तरी शांत झालं. नंतर तो परिस्थिती चा समजूतदारपणे विचार करेल, जे घडलं ते स्वीकारून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल.आणि तेच योग्य असेल ना?
डोळ्यातल्या पाण्याचं योग्य वेळी उतरणं माणसाला सद्सद्विवेक बुद्धी स्थिर ठेवायला मदत करते.
(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈