विविधा
?⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग पहिला) ?⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(हृदयस्पर्शी अनुभव ) – जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!
प्रिय बाबा,
साष्टांग नमस्कार !
बाबा…. अहो बाबा… झोपलात की जागेच आहात ?
अहो, मी इकडुन बोलतीये आईच्या पोटातून….
मला माहितीये, रात्र खुप झालीये आणि आई आणि तुम्ही जागेच राहून विचार करताय, मला जन्माला घालायचं की… मला जन्माला न घालताच देवाघरी पाठवायचं… ?
बाबु…. बाबा मी तुम्हाला प्रेमानं बाबु म्हणु…. ?
म्हणुद्या की हो… बाबु… !
बाबु, खरं सांगू मला यायचंय हो तुम्हाला भेटायला…. इतके दिवस आईच्या पोटात झोपले आता बाबु, तुमच्या कुशीत झोपायचंय मला… मला ना, श्वास घ्यायचाय हो बाबा.. फक्त एक श्वास…. !
बाबा परवाचं आईबरोबरच तुमचं बोलणं मी ऐकलंय…. मुलगा जन्माला आला तर त्याच्यासाठी मऊ मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात तुम्ही…. आणि मुलगी जन्माला आली तर ?
बाबु… नकोय मला गादी… मी तुमच्या मांडीवरच झोपेन ना…. नवा फ्रॉक पण नको मला, खेळणी पण नकोत मला… मी खेळेन बाई तुमच्याशीच बाबा…
बाबड्या, मी कधीच तुमच्याशी गट्टी फू करणार नाही बरं… बाबु… तुम्ही गालावर पापी घेताना दाढी टोचेल बरं मला… पण दाढी टोचली तरी मी अज्जिबात रागावणार नाही…
बाबुड्या, संध्याकाळी तुम्ही कामावरुन घरी आलात ना, की दारामागुन मी भ्भ्वाँव करीन हां तुला… पण तुम्ही घाबरायचं हां बाई…
नायतर आमी नाय खेळणार ज्जा…
आई चहा करुन आणेस्तोवर मी तुमच्या कपाळाला बाम लावून देईन हां…
बाई गं… कपाळावरचे केस कुठं गेले बाबुड्या…. ?
टकलु हैवान झाले आहात नुसते… !
आँ… आईग्ग्ं…. गालगुच्चा नाही घ्यायचा हां आमचा… गाल दुखतात आमचे…. नाहीतर मी पण कान ओढेन तुझे ससोबासारखे…. बघा मग ह्हां… सांगुन ठेवते… !
आणि हो, बाबा… परवा माझ्या मैत्रिणींसमोर सारख्खं ठमाकाकु… ठमाकाकु म्हणुन चिडवत होतात ना मला…. ?
थांबाच आता, तुमच्या आॕफिसातले लोक घरी आले ना की, त्यांच्यासमोर मी पण तुम्हाला ढेरीपाॕम…. ढेरीपाॕम… म्हणुन चिडवेन….
ढोलुराम पळायला जात जा की जरा… !
काय म्हणालात… ?
हो, मी मुलगी म्हणुन जन्मले तरी तुमची आई म्हणुनच जगेन…. !
पण मला जन्माला तरी येवु द्या बाबा….
बाबा तुम्हाला वेणी घालता येते का हो ? नाही….?
कसा रे तू बाबड्या….!
बरं भांडीकुंडी तरी खेळता येतात का… ? नाही….???
बाई गं…. काहीच कसं करता येत नाही तुम्हाला… ???
मग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता तरी काय…?
आता लंगडी घालता येते का म्हणून अज्जिबात विचारणार नाही मी या ढेरीपाॕमपाॕमला… ढोलुराम कुठले… !
भातुकली तरी खेळता येते का बाबा तुम्हाला…. ???
क्रमशः….
© डॉ. अभिजित सोनवणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈