सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ शारदोत्सव ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
घरोघरीचे गणपती विसर्जन झाले आणि अनंतचतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम संपली की वेध लागतात ते शारदीय नवरात्रोत्सवाचे.
दरवर्षी नवरात्र आले की, हमखास आठवण होते ती आमच्या शाळेच्या
“शारदोत्सवाची.”
आमची शाळा फक्त मुलींची. म.ल.ग.हायस्कूल, कोल्हापुर. मी पहिली ते अकरावी तिथेच शिकले. आमच्या शाळेत अश्विन नवरात्रीत ” शारदोत्सव ” साजरा केला जात असे. त्यामुळे देवी उपासनेचे संस्कार घरात आणि शाळेत ही झाले.
कोल्हापुरवासिनी श्री अंबाबाई, घरची देवी श्री एकवीरा, आणि शाळेतली श्री सरस्वती अशा पूजनाच्या उत्सवाचे नवरात्रीचे दिवस संस्मरणीय आहेत. संस्कारक्षम वयातला देवीशक्तीचा उत्सव आध्यात्मिक आणि वैचारिक मानसिकतेचा भक्कम पाया ठरला.
शारदोत्सवाच्या आधीच्या आठवड्यात तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी 4/4 मुलींचे ग्रुप केले जायचे. डेकोरेशन करणे, पूजेची तयारी करणे – यात पूजेची भांडी रोज स्वच्छ करणे, तेल,तूप, अगरबत्ती, कापूर, हार फुले, प्रसाद ( फळे)याची जमवाजमव, खरेदी करणे, यातून टीम वर्क, कुठलेही काम करण्याची तयारी हे गुण अंगवळणी पडत. आम्ही मैत्रिणी या कुठल्याही कामामध्ये दरवर्षी अतिशय उत्साहाने सहभाग घेत होतो . त्यावेळी शाळेत वातावरण खूप प्रसन्न असायचे.शाळेत आहोत असं वाटण्यापेक्षा एका ऊर्जेने भारावलेल्या मंदिरात आहोत, असेच वाटायचे. अगरबत्तीच्या घमघमाटाने सगळे वातावरण भारावून गेलेले असायचे.
सर्व तयारी करून शाळा भरण्याच्या वेळी सामूहिक आरती होत असे. संगीत हा विषय शिकवणारे टेंबेसर व नंतर सौ.शैलाताई कुलकर्णी पेटी ( हार्मोनियम) वाजवून साथ द्यायचे.
‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी , अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी ‘ ही आरती झांज, हार्मोनियम च्या तालावर सुरात म्हणताना एक प्रसन्न आनंद व्हायचा.
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली, वीणा हाती असलेली, कमळात आसनस्थ, नेत्रांतून अपार प्रेम, माया बरसणारी देवी सरस्वतीची मूर्ती अजुनही डोळ्यांसमोर येते.
आरती-प्रसाद झाल्यावर शाळा सुरु होत असे. चार वाजल्यानंतरचे तास नसायचे. कारण त्यावेळेत रोज व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. पहिल्या दिवशी वेदशास्त्र संपन्न प.पू.जेरेशास्त्री यांचे देवी शक्ती, देवी अवतार अशा विषयांवर प्रवचन असे. त्यानंतर रोज प्रख्यात लेखक, वक्ते, निर्माते, चित्रकार, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ,अशा थोर व दिग्गज व्यक्ती, कलाकारांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. प्रा.शिवाजी भोसले, श्रीमती लीलाताई पाटील, भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, कॅप्टन थोरात, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची व्याख्याने अजूनही आठवतात.
प.प.जेरेशास्त्री जे काही सांगायचे ते सगळेच तेव्हा समजायचे असे नाही, पण ते काहीतरी भव्य दिव्य छान वाटायचे.
आपल्या प्रवचनामध्ये सुंदर मानव बनण्यासाठी तुमचे मन सुंदर असले पाहिजे, निर्मळ असले पाहिजे, असे सांगायचे. त्याचा अर्थ पुढे आयुष्यात समजून आला. मोठ्या व्यक्ती कोण, त्या का मोठ्या आहेत, हे समजून घेणे याची शिकवण मिळाली. एका जागी तीन तास बसून व्याख्यान कसे ऐकायचे, याची सवय झाली. शारदोत्सवाचे ते नऊ दिवस अतिशय उत्साहाचे व भारलेले होते. सरस्वती पूजनाने व व्याख्यानाच्या विषयांतील शब्दांचा, विचारांचा परिणाम नकळत मनावर होत होता. आमचे शिक्षक आणि शिक्षिका ( आमचे सर आणि बाई) त्या विचारांना अनुसरूनच शाळेतल्या इतर कार्यक्रमांची आखणी करत, आणि भाषणातले विचार दैनंदिन व्यवहारात ही कसे अंगिकारायचे, हे आम्हां मुलींकडून करवून घेतले जाई. त्यामुळे दरवर्षी अकरावीची पास झालेली बॅच ही सुसंस्कारितच असेल, हेच आमच्या शाळेचे ध्येय, प्रयत्न आणि यश होते.
प्रत्येक स्त्री मध्ये देवीशक्तीचा अंश असतो. स्वतःतल्या शक्ती चा आदर ठेवून समाजात वावरणे, स्त्री अबला नाही तर सशक्त, स्वयंपूर्ण आहे, याची जाणीव होणे, तसेच आत्मशक्तिचा अहंगंड न ठेवता किंवा आपण कुणापेक्षा वरचढ आहोत, या भ्रामक कल्पना न बाळगता त्या शक्तीचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सेवेसाठी, देशसेवेसाठी करणे ह्याचे बाळकडू देणारा शाळेतला शारदोत्सव त्या काळातल्या आमच्या पिढीच्या मानसिकतेचा सुसंस्कारित पैलू होता.
नवरात्र म्हटले की शाळेचे ते दिवस अजूनही आठवतात. मनोमन देवीला नमस्कार केला जातो.
त्यावेळी म्हणत होतो ते,
” या कुंदेन्दु तुषार हार धवला ” हा श्लोक आणि
” विधी तनये शारदे कामदे” हे गीत प्रत्येक नवरात्रात ओठावर येते.
श्री शारदा देवी आणि माझ्या शाळेला भक्तीभावनेने नमन!
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈