सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 9 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
सध्याच्या digital युगाच्या झपाट्याने बदलत असलेल्या वेगानं पुढे जाणा-या जगात धावताना माणसाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय असे वाटू लागले आहे. जे नैसर्गिक होतं ते कृत्रिम झाले आहे. हल्ली रडावंसं वाटतं असताना रडलं तर लोक हसतील किंवा आपण कमकुवत ठरू म्हणून लोक रडण्याचं टाळतात, डोळ्यातलं पाणी परतवून लावतात. तेव्हा ते रडणारं ह्रदय घाबरतं आणि आपलं काम करताना त्याचाही तोल ढळतो. ह्रदयाच्या आजाराचं आणि अकार्यक्षमतेचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. मन व शरीर यांची एकरूपता म्हणजे तंदुरुस्ती. अशी निरामय तंदुरुस्ती हवी असेल तर संवेदना बोथट होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शारिरीक व मानसिक सुदृढतेसाठी आचार-विचार, आहार-विहार या सह हसू आणि आसू दोन्ही आवश्यक आहेत.
देवाने सृष्टी निर्माण करताना डोळ्यात पाण्याची देणगी दिली आहे.
गाई म्हशी, कुत्रे घोडे, याकडे, हत्ती असे पशू रडून आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांना अश्रू आवरण्याची बुद्धी नाही म्हणून ह्रदयाचे दुखणे नाही. या दैवी देणगी चा प्रसंगी अडवणूक करून, नाकारून आपण अपमान तर करत नाही ना असा विचार मनात येतो.
थोडक्यात काय तर आपल्या भावना आणि मन खुलेपणाने योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त होणे महत्वाचे. सुख-दुःख, हसू-आसू, ऊन- सावली यांचं कुळ एकच. नैसर्गिकता. दुःख न मागता येतंच, सावली आपल्याला हवीच असते. मग आसू का नाकारायचे? ते सकारात्मतेने अंगिकारून व्यक्त करावेत. मन हलकं होतं……..
(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈