डॉ गोपालकृष्ण गावडे
विविधा
☆ बुद्धांनी देवत्व का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
बुद्धांनी देवत्व का नाकारले ?
सामान्य लोक महापुरूषाच्या अंगात दैवी शक्ती आहे असे मानून त्यांच्या निस्पृहतेच्या कठिण मार्गावर चालण्याच्या खडतर कामापासून स्वतःला सोईस्कर रित्या दूर करून टाकतात. म्हणूनच बुद्धांनी देवत्वच नाकरले. बुद्धांनी अनुयायांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवला नाही. “बुद्ध देव होते. त्यांना जे जमले ते आपल्याला कसे जमेल?” असे बोलायची सोय ठेवली नाही.
आपल्या प्रत्येक समस्येला आपली हाव आणि आळस जबाबदार असताना ते खापर दुसऱ्या कुणाच्या तरी माथी मारून त्यांचा तिरस्कार करणे ही बहुतेक सामान्य माणसांची सहज प्रवृत्ती असते. पण असे का होते?
या जगात काहीही परिपूर्णपणे चांगले नाही. शोधले तर रामात-बुद्धातही दुर्गुण सापडतात. तसेच काही महाभागांनी रावणात आणि म्हैशासुरातही सद्गुण शोधून काढलेले आहेतच. आपण तर सामान्य लोक आहोत. आपण स्वतः परिपूर्णपणे चांगले नसताना जगाकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे. तरी पण आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. अपेक्षित गोष्टी जागेवर उपस्थित असतील तर त्याचे कुणाला फारसे कौतुक वाटत नाही. उदा. जेवणात योग्य प्रमाणात मीठ पडले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. तसाच नव-याचा निर्वसणी असणे हा वाखाणण्याजोगा गुणही ब-याच वेळा दुर्लक्षिलाच जातो.
आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींमध्ये काही अपरिपुर्णता आली तर तो मात्र अनपेक्षित धक्का असतो. उदा. नेहमी सुग्रण होणाऱ्या जेवणात मीठ कमी वा जास्त पडले. निर्व्यसनी नवरा झिंगत घरी आला. असे नकारात्मक प्रसंग अनपेक्षितरित्या धक्कादायक असल्याने मेंदूत खोलवर नोंदले जातात. अशा तणाव निर्माण करणाऱ्या नकारात्मक गोष्टी परत घडू नये म्हणून अशा गहन चिंतन चालू होते. म्हणजे आपण नकारात्मक गोष्टींचाच विचार करत बसतो. आयुष्यातील सर्व चांगल्या सकारात्मक गोष्टी अपेक्षित असल्याने दुर्लक्षित राहतात तर प्रत्येक नकारात्मक गोष्टींवर गहन चिंतन होते. अशा प्रकारे बहुतेक व्यक्तीचे बहुतांश विचार नकारात्मक असतात.
आजुबाजूला घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी आणि अपेक्षांचा सरळ संबध आहे. जितक्या आपल्या अपेक्षा मोठ्या तितके अनपेक्षित नकारात्मक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. तितके जास्त नकारात्मक विचार चिंतन चालू होते. तितके दुःख मोठे होत जाते.
जगात आपल्यासहित काहीच परिपुर्ण नाही. आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थां यामधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन आनंदी आणि समाधानी होते. याऊलट यातील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन दुःखी आणि असमाधानी होते.
स्वतःला दुःखी करणारे आत्मघाती नकारात्मक विचार करणारे लोक आता स्वतःच्या मनात खदखदणा-या दुःखाच्या वड्याचं तेल काढायला बाहेर वांगे शोधतात. त्यातून मनात जन्माला येतो राग, तिरस्कार आणि ईर्षा. असे मन एक प्रकारे कचरापेटी होते. दुर्देवाने कचरापेटीला सर्वात जास्त त्रास कच-याचाच होत असतो. रागाचा सर्वात जास्त त्रास कुणाला होतो? राग, तिरस्कार वा इर्षा या दुःखद भावना आपल्याच मनाला दुःखी करतात.
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈