? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग दुसरा ) ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

 (हृदयस्पर्शी अनुभव ) – जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!

मी असं ऐकलंय, की भातुकलीचा डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतो… आपला हा पण खेळ आता अर्ध्यावरच मोडेल ना बाबा….? 

बोला ना बाबा, गप्प का?

बाबा, तुम्ही आणि आई मला देवाघरी रहायला पाठवणार आहात ना?

का? मी मुलगी आहे म्हणुन…?

मुलगी असणं दोष आहे का बाबा?

तुमची आई, पण एक मुलगीच आहे ना…!

बाबा, देवाचं घर कसं असतं हो…?

तीथं आई-बाबा पण असतात की  आईबाबांना नको असणा-या   माझ्यासारख्या सर्व मुलीच असतात…..?

सांगा ना बाबा, तुम्ही गप्प का? 

बाबा, मला तुम्ही देवाच्या घरी रहायला का पाठवताय?  आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का?

मी ना बाबा, आपल्या मनीमाऊ सारखी काॕटखाली झोपून राहीन एकटीच, तुम्हाला आणि आईला मी कध्धी कध्धी त्रास देणार नाही बाबा…. मला नका ना पाठवू देवाघरी…. प्लीज बाबु…!

बाबा, आपली आई कशी दिसते हो? मी तर तिला पाहिलं पण नाही…. आणि आता देवाघरी गेले तर पाहू पण शकणार नाही….

खरं सांगू बाबा, मी खूप स्वप्नं पाहिली होती, पण यातलं एकही खरं होणार नाहीये. 

मला आभाळात उंच भरारी घ्यायची होती हो, पण मला काय माहित… जन्माला येण्याआधीच तुम्ही मला आभाळात पाठवणार आहात ते, कायमचं!

आज मी बोलतीये बाबा, पण उद्या मी नसणार आहे.

आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्याल मला बाबा….?

पाठीवर थोपटून एकदा तरी जवळ घ्याल मला  बाबा??

फक्त एकदाच लाडानं कपाळावरुन हात फिरवाल बाबा…???

बोला ना बाबा, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे…. रात्र संपत चालली आहे…. बोला ना बाबा… बोला ना…

बापरे…. बोलता बोलता सकाळ झाली….  तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये निघालात सुद्धा…???

आता कुंडीतून गुलाबाचं रोपटं उचकटून फेकून द्यावं तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देतील…

तुम्ही हे बघू शकाल का बाबा?

फुलासारख्या नाजूक तुमच्या ठमाकाकुला आईच्या पोटातून ओढून बाहेर फेकून देणार आहेत डाॕक्टर काका…  बाबा तुम्ही सहन करू शकाल हे…?

बाबा, हे डाॕक्टर काका, मला आणि आईला घेवुन कुठे चालले आहेत…?

कसले कसले आवाज येताहेत इथं बाबा… मला भिती वाटत्येय… आईला थांबवा ना… या डाॕक्टर काकांना थांबवा ना… बाबा थांबवा ना यांना प्लीज…

डाॕक्टरकाका, तुम्ही तरी ऐका…  मी माझी बाहुली देते तुम्हाला… हवं तर माझ्याकडची सर्व चाॕकलेट्स देते… पण आईबाबांपासुन दूर नका ना करु मला काका….

बाबा, तुम्ही माझा हात नका ना सोडु… प्लीज बाबु… सांगा ना या डाॕक्टरकाकांना… आई, तू तरी सांग ना… तू गप्प का…?

असह्य वेदना होत आहेत बाबा मला….

बाबा मला वाचवा…. बाबा मला वाचवा…. बाबा…. बाबा… बाबु…. बाबड्या…!

….. बाबा रडताहात तुम्ही?

आता नका रडु… गेले मी केव्हाच तुमच्यामधुन…

तुमचे डोळे पुसणारे इवलेसे हात आता अस्तित्वात नाहीत, तुमच्या डोक्याला आता मी बामही नाही लावू शकणार, लपाछपीच्या डावात आता मी तुम्हाला कध्धी कध्धीच  सापडणार नाही बाबा, दारामागुन आता तुम्हाला भ्भ्वाँव करायलासुद्धा मी येवु शकणार नाही… आणि हो, लंगडीच्या खेळात पण आता तुम्हाला मी कध्धीच  हरवायला येणार नाही बाबा… तुम्ही जिंकलात बाबा कायमचे!

तुमची चिमणी आता खूप दूर उडून गेली आहे, आभाळात…. तुम्हालाही तेच हवं होतं ना…?

जाऊदे बाबा, आता मला कसलाही त्रास होत नाहीय,  कसली ही वेदना नाही, संवेदना सुद्धा नाही…. मी या पलीकडे गेले आहे.

सारं कसं शांत शांत झालंय बाबा…

आता शेवटचा… अगदी शेवटचा एक हट्ट पुरवाल….?

आता फक्त एकदा एकदाच कुशीत घेउन मला ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवाल???

चिडवा ना बाबा…प्लीज…. शेवटचं… मी नाही रागावणार  तुमच्यावर…!

देवाघरी गेलेल्यांना रागावण्याचा हक्क असतोच कुठे म्हणा…!

तुमचीच जन्माला न आलेली,

अभागी ठमाकाकू

समाप्त

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments