☆ विविधा: तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी ☆
आज सकाळी एका मैत्रिणीने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला…”
तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा..’ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?
मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,
ह्यात ‘तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर , ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?
तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.
आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल …पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण तिन्ही म्हणजे काय?
…आणि मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले..त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं..
मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…!!
पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की-
‘तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर (भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.
पहाट आणि सायंकाळ ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या….तिन्ही सांजा !!*
‘तिन्हीसांज’ प्रमाणे ‘त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.
हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं..की रात्र सम्पून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..
दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..
व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..
दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच!!
त्यामुळे, “तिन्ही सांजा” हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.
तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे ,तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून..असा भावार्थ जाणवतो.
दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती..अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे..माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..
झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.
हा मला समजलेला अर्थ आहे.
आज त्या मैत्रिणीने तिन्ही सांजा बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला.
संदर्भासाठी ‘तिन्ही सांजा ..’हे गीत दिले आहे..
तिन्ही सांजा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या,
देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
कनकगोल हा मरीचिमाली
कनकगोल हा मरीचिमाली
जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र,
ये जी शांत गभीर निशा
त्रिलोकगामी मारुत,
तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनी हे तव
कर करी धरिला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या…
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत
पाणी जसे मोत्यांत
पाणी जसे मोत्यांत,
मनोहर वर्ण सुवर्णांत
मनोहर वर्ण सुवर्णांत
हृदयीं मी साठवीं तुज तसा
जीवित तो मजला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या,
देई वचन तुला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
-भा रा तांबे
© सुश्री अपर्णा कुलकर्णी
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
तिन्हीसांजा या शब्दाचा अर्थ शोधताना आपण खूपच सुंदर विश्लेषण केले आहे.भा.रा.तांबे यांची कविता दिल्यामुळे लेखाला उठावदार पणा आला आहे आणि संदर्भ म्हणून तो आवश्यकच होता.
आपल्या लेखनाचे स्वागत च आहे.
माझी आवडती पण त्या मधील आशय समजायला अतिशय कठीण अशी ही भा. रा. तांबे यांची कविता.बासरीवर वाजवण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा ही कविता तिच्या अंतरंगा पासून शोध घेतल्याशिवाय नीट जमणार नाही हे लक्षात आले.मग मी यावरील जी काही माहिती मिळत गेली ती वाचली.आपण ही माहिती चांगली दिली आहे.त्याचा उपयोग मला झाला.धन्यवाद. शब्दांचा अर्थ आणि त्यातील भावना समजल्यानंतर त्या अनुरूप सूर निघण्यास मदत होते.अजून थोडे तपशीलवार रसग्रहण केले तर ते वाचायला आवडेल.कविराज,लताबाई आणि हृदयनाथ यांच्या प्रतिभेची झेप किती उत्तुंग आहे हे पाहिल्यावर थक्क व्हायला होते.