सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
समाज कार्य, शिक्षण प्रसार असे करताना त्यांनी, कुटुंबाकडे दुर्लक्ष केले असे मात्र नाही बर ! मोठ्या मुलींची लग्ने, चांगली घरे पाहून करून दिली.. त्यांच्याहून धाकटी तीन मुले शिकत होती. थोरला कॉलेजचे शिक्षण घेत होता. – – – – पण —
त्यावर्षी महाराष्ट्रावर दोन मोठ्या आपत्ती कोसळल्या. दुष्काळ आणि प्लेग. माणसे पटापटा मरत होती. दुर्दैव म्हणजे आमच्या थोरल्या लाही ही प्ले ग ची लागण झाली आणि आम्हा वर दुःखाचा डोंगर कोसळला.पण टिळक त्याही परिस्थितीत लोकांना मदत करत होते. सगळीकडे हाहाकार उडाला,पण सरकार मात्र थंड होते. घरे स्वच्छ करण्याच्या नावाखाली गोऱ्या सैनिकांनी प्रजेचे अतोनात हाल केले. छळ केला. त्याबद्दल टिळकांनी “केसरी” वृत्तपत्रात खूप कडक शब्दात लेख लिहिले. त्याचे परिणाम भलतेच होत होते. जनमानसात प्रचंड असंतोष होता अन तशातच गोर्या रॅन्ड साहे बां चा खून झाला. धर पकड दंड धमक्या अशाप्रकारे सामान्य जनतेचा जास्तच छळ सुरू झाला.तेव्हा टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहिला, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे.” त्यामुळे त्या खु ना मागे टिळकांचा हात आहे, असा इंग्रज सरकारचा कयास होता, पक्की खात्री होती. त्यामुळे वॉरंट काढून त्यांना अटक केली गेली. खटला मुंबईला चालला. सरकारने त्यासाठी विशेष न्यायाधीश नेमला आणि त्यांना अठरा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या शिक्षेने मी मात्र पुरती कोसळले, मोडून गेले. यांचा काही अपराध नसताना, केवळ संशय, शंका म्हणून एका बुद्धिवान तपस्व्या ला एवढी घोर शिक्षा? मुलाच्या जाण्याचे दुःख आणि हे मोठे संकट, त्यामुळे सभोवताली घरामध्ये काय चाललंय हेच मला कळत नव्हते. जे थोडे कानावर पडत होते ते क्लेशकारक होते. एल एल बी, केसरी कार, प्राध्यापक टिळकांना तुरुंगामध्ये काथ्याकु टावा लागत होता. गुन्हेगारां बरोबर वावरावे लागत होते. जाड भाकरी आणि कांदा घातलेले कालवण खायला मिळत होते. त्यांना कांदा आवडत नसल्यामुळे कोरड्या भाकऱ्या खाव्या लागत. ऐकून माझ्याही घशाखाली घास उतरत नसे.
मात्र पुष्कळ प्रयत्न करूनही इंग्रज सरकारला त्या खुनाशी टिळकांचा संबंध जोडता आला नाही. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आणि अखेर काही अटींवर, सरकारने कोणालाही कळू न देता, गुपचुप त्यांना घरी आणून सोडले. या तुरुंगवासात त्यांची तब्येत खूपच खालावली. त्यांचे 137 पाउंड वजन 113 पाउंड झाले होते. डोळे खोल गेले होते. चेहऱ्यावर तेलकट पणा आला होता त्यांच्याकडे पाहूनच पोटामध्ये ढवळून येत होते.
सुटून आल्यावर राष्ट्र कार्यामध्ये त्यांनी पुन्हा झोकून दिले. त्यांचे वाचन, लिखाण, अधिवेशन, भाषण, प्रवास हे अव्याहतपणे सुरूच होते. त्यांची लोक मान्यता वाढत होती. “टिळक बोले आणि जनता चाले” असे काही चालले होते.
देशातील वातावरणअधिक गरम गरम होत चालले होते. त्यातच बंगालमध्ये बॉम्बचा स्फोट झाला. “तरुणांनी हा मार्ग पत्करला हे देशाचे दुर्दैवच आहे. पण या मुलांना या मार्गावर जायला कोणी भाग पाडले? सरकारने!या गोष्टीसाठी सरकारच जबाबदार आहे.” असे आणि देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत हे दोन जळजळीत लेख केसरीमध्ये लिहिल्यावर इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहा चा खटला चालू केला. कोर्टामध्ये आपले काम टिळक स्वतः चालवत असत. तेजस्वी सूर्याला दुसर्या कोणाचा आधार घेण्याची जरुरी काय?
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈