सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
या सूर्यालाही खग्रास ग्रहण लागले.स्वतःच्या बचावाचे जे भाषण टिळकांनी कोर्टापुढे केले, ते जवळजवळ साडेचार दिवस चालले.पण गेंड्याचे कातडे पांघरलेल्या त्या ज्युरी आणि न्यायाधिशांवर त्याचा शून्य परिणाम झाला. त्यांना राजद्रोही ठरवले. त्यांना सहा वर्षाचे काळे पाणी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सारा महाराष्ट्र या शिक्षेचे वृत्त ऐकून हादरून गेला. मी तर पूर्ण कोसळून गेले. मधुमेहाने शरीर आतून पोखरले होते, या बातमीने ते कोलमडून गेले. अंथरूणावर उठून बसण्याचे त्राण माझ्या मध्ये राहिले नाही.
तुरुंगवासातल्या एकांताचा टिळकांनी फार चांगला सदुपयोग केला. त्यांनी गीतेवर टीका लिहिली आणि गीतारहस्य हा हा साडेआठशे पानांचा ग्रंथ लिहिला. पाली, हिब्रू, फ्रेंच, जर्मन या भाषाही ते तिथे शिकले. वयाच्या 52 व्या वर्षी ते विद्यार्थी होते.
तिकडून येणाऱ्या पत्रांवरून आम्हाला त्यांचे वर्तमान कळे. मुलेही त्यांच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे वागत. कोणीतरी मला पत्रातील मजकूर वाचून दाखवे. त्यांच्या अचाट आणि अफाट बुद्धिमत्तेचे मला आश्चर्य वाटे. त्यांनाही मधुमेह होता. पण त्यावर ही ते कशी मात करत होते, ते आणि परमेश्वर जाणे. मी मात्र त्यांच्या कुठल्याच राष्ट्रकार्यात मदत करू शकत नसे म्हणून मला फार वाईट वाटे. पण साधी अक्षर ओळखही नसलेली मी, चार भिंती बाहेरचे जग न पाहिलेली मी, बाहेरच्या जगाचा थोडाही अनुभव नसलेली मी काय करणार होते? मुलांकडे पाहत कशीतरी दिवस अन रात्र ढकलत होते. रात्र-रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. शरीराचा डोलारा कोलमडतोय हे मला जाणवायला लागले होते. या जन्मी पुन्हा त्यांचे दर्शन होणार नाही, ते भेटणार नाहीत, याची खात्री पटली होती. गळ्यातले मंगळसूत्र सोडून सगळे दागिने मी काढून ठेवले. रोज काळे साडी नेसायला सुरुवात केली. आजूबाजूचे काही समजेनासे झाले. कोणी काही बोललं तरी तिकडे लक्ष देण्याचा मी टाळायला लागले. फक्त “भक्त विजय” हा ग्रंथ कोणी वाचून दाखवला तर मात्र मनःपूर्वक भक्तिभावाने ऐकत होते. त्यांच्या कार्याला यश मिळो, अशी परमेश्वराला आळवणी करत होते. मुलांच्यावर निदान त्यांचे कृपाछत्र राहो म्हणून प्रार्थना करत होते. भारतातल्या जनतेला भविष्यात तरी शांतता, सुख समृद्धी आणि स्वातंत्र्य लाभो अशी आळवणी करत होते. देशाला स्वातंत्र्याचा सूर्य लवकर पहायला मिळवून म्हणून त्या मातृ देवतेला अश्रूंचा अभिषेक करत होते. अशातऱ्हेने का होईना, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंड यामध्ये माझ्या देहाची समिधा अर्पण करायला मी आतुर झाले होते.
अखेर तो दिवस उगवला. त्यांची भेट झाली नाही, तरी सौभाग्यलेणं लेवून,अहेवपणी समाधानाने,दोन्ही मुलांना आशीर्वाद देत मी या जगाचा निरोप घेतला.
टिळकांना या बातमीचा जबर धक्का बसणार याची खात्री होती. पण आहे आघात धीराने, शांतपणे ते पचवतील हेही माहीत होते. कारण डगमगून जायला ते सर्वसामान्य होते काय ? ते तर प्रखर तेजस्वी सूर्य पुत्र होते आणि मी त्यांची तेजशलाका!
समाप्त
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈