श्री तुकाराम दादा पाटील

☆ विविधा ☆ ती, स्वप्न, आणि पणती ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

अंधार  सरेल,उजाडेल आणि सार लख्ख प्रकाशमान होईल. मग सार मळभ सरून आसमंत स्वच्छ दिसेल. हवं ते मिळेल आपल्याला. मग येईल समाधानान जगता.  म्हणून तिने प्रसन्न मनाने खूप प्रतिक्षा केली. वाट पाहून पाहून ती थकली, कंटाळली, अखेर वैतागली.

असा अंधाराचा अंदाज घेत कसं, किती आणि कुठवर जायच ? पण आशा मनाची,मरत नव्हती.‌सरत नव्हती. चाचपडत चाचपडत जगताना मनात धैर्य ठेऊन वावरताना तिला एक पर्यायी तेजाची ठिणगी असणारी पणती सापडली. खूप आनंद  झाला तिला. आता आपल्या या अंधारलेल्या वाटेवर थोडाफार  प्रकाश  पडेल. अडखळत चालणं संपेल. आश्वासक  पावलं टाकता येतील आयुष्याच्या वाटेवर. म्हणून तिने ती पणती  हळुवार  हातात घेतली.  पदराआड लपवली. पणती अधीक तेजाळली. आकर्षक व मोहमयी दिसू लागली. आशाळभूत होऊन  लाचावली ती.  तिने आपले लालचुटूक महतप्रयासान जपून ठेवलेले ओठ पदराआडच पणतीच्या प्रखर ज्योती जवळ नेले. तिला दाह जणवला. ती मुळीच घाबरली नाही. मन मात्र खंबीर ठेवून ती ज्योतीला म्हणाली.

“आता तूच काय तो माझा भक्कम आधार  आहेस माझ्या पुढच्या अंधारलेल्या आयुष्यात”.

पणती  परकीय होऊन हलकेच  हसल्याचा भास झाला तिला. ती सुखावली मनातून.  तिला वाटलं   पणतीच्या प्रकाशात पुढची सारी जीवनवाट प्रकाशमय  होऊन न्हाऊन निघेल, वाटनिश्चीत करून मिळणा-या सांद्रमंद  प्रकाशात  ती पुढे पुढे  निर्वेधपणे

चालतं राहिली. पुढे जाण्यापुरता सहवासाचा उजेड मिळतोय याचाच आनंद  तिला समाधान देत होता. तोच उजेडाची स्वप्न  रंगवायला साथ देणार होता तिला.  आनंदाने अंगभर नटलेली ती स्वप्नसुखाच्या राजरस्त्यावर

पुढे पुढे चालत असताना तिच्या मागे अंधाराची जडशीळ पावले पाठलाग करत येत आहेत याचे भानच राहीले नाही तिला. तो अंधार तिच्या नकळत तिच्या

साम्राज्यात  पुन्हा  प्रवेश करणार होता. हे तिला उमजलच नाही. करण ती स्वप्नं पहाण्यात  रंगुन गेली होती.

ती बेसावध असताना अचानक पाठीमागून  तिच्या डोक्यावर जबरदस्त तडाखा बसला. हातातील  पणती हातातून   गळून पडली. फुठली. तिचे तुकडे इतस्ततः विखरून गेले. तेजोमय प्रखरतेने जळणारी प्रकाश देणारी

वात  बाजुला पडली. वात काही काळ धुपली. मग सावकाश  शांत  झाली. आणि निपचित  पडलेल्या तिच्या स्वप्नाळू विश्वा भोवती अंधाराने आपला अंमल सुरू केला.तिला त्या अंधारात  किती लागल, ती शुद्धिवर आली की तशीच संपून गेली. हे कुणाला कधीच  कळणार नव्हत.कारण हे सारं घडलं होतं अंधारात, आणि अंधाराला कुठे डोळे असतात. पुन्हा जे घडतंय ते पहाण्या साठी. आता ती, तिची स्वप्न, ती पणती, आणि पणतीत जळणारी वात काळोखाच्या खोल खोल डोहात कायमची समाधीस्थ होऊन गेली आहेत.

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments