सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ ती हाक येई कानी ….. भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )
(ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य यशवंत, म्हणजे कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा काल, दि . २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन होता. ( ९/३/१८९९ — २६/११/८५ ) त्या निमित्ताने त्यांच्या काव्य-कर्तृत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. )
“ महाराष्ट्र कवी “ असा ज्यांचा अतिशय गौरवाने उल्लेख केला जातो, त्या कवी यशवंत यांच्याबद्दल, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल किती आणि काय काय सांगावे ते कमीच वाटावे, असेच म्हणायला हवे.
लौकिक जीवनाचा अतिशय खडतर मार्ग आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती यामुळे यशवंत यांना फायनलनंतर पुढचे शिक्षण घेता आले नव्हते, हे, त्यांची समृद्ध काव्यसंपदा पाहता कुणालाच खरे वाटणार नाही असे सत्य होते. त्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि नामवंत कवी व कादंबरीकार श्री. गो.गो.मुजुमदार ( साधुदास ) यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर मोठाच प्रभाव होता. आणि बहुदा त्यामुळेच ते त्या वयात कवितेच्या प्रेमात पडले होते. जन्म चाफळचा असल्याने समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांना त्यांच्या भावविश्वात जणू अढळ स्थान होते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती उत्सवाचा मनावर मोठाच संस्कार झालेला होता. “ छंद लागला टिटवीला । तिने समुद्रही आटविला ।। हे टिळकांबद्दलचे स्फूर्तिदायक शब्द मनावर कोरून घेऊनच त्यांनी आपला मुक्काम पुण्याला हलवला आणि त्यांच्या आयुष्याला नवे सुंदर वळण मिळाले.
पुण्यात त्यांना अभिरुचीसंपन्न कवी गिरीश हे मित्र मिळाले. व्युत्पन्न आणि मनस्वी कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधव ज्युलियन यांचा सहवास मिळाला. दिनकरांसारखे चोखंदळ वाचकमित्र मिळाले — आणि त्यांना कवितेचे नवे लोभस क्षितिज खुणावू लागले. चौफेर आणि चोखंदळ वाचनाने त्यांनी औपचारिक शिक्षणाची उणीव भरून काढली. “ रविकिरण मंडळ “ या आधुनिक कवितांची नवी परंपरा सुरु करणाऱ्या कविमंडळातल्या सप्तर्षींमध्ये माधव ज्युलियन यांच्याबरोबर कवी यशवंत यांचेही नाव अग्रक्रमाने झळकू लागले. “ वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळत रहावी , त्याप्रमाणे मी अंतर्यामीची कवितेची आवड सांभाळली, जोपासली, “ असे कवितेवर अनन्य निष्ठा असणारे यशवंत म्हणत असत. एकीकडे कारकून म्हणून रुक्ष व्यावहारिक जीवन जगत असतांना, ‘ काव्य हे एक व्रत ‘ मानून त्यांनी मनापासून काव्याची उपासना केली, असेच म्हणायला हवे.
एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये प्रामुख्याने जोपासल्या जाणाऱ्या शाश्वत जीवनमूल्यांचे सतत समर्थन करतांना, त्यांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांमधून नकळतच प्रकट झालेली असायची. ‘ दैवते माय-तात ‘ ही आईवडलांबद्दलची कृतज्ञता परिणामकारकपणे व्यक्त करणारी कविता, आईचे महत्त्व सांगणारी “ आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी। ती हाक येई कानी, मज होय शोककारी “ ही अतिशय लोकप्रिय झालेली, आणि आर्तपणे मनाला भिडणारी कविता, या त्यांच्या अशा आत्मनिष्ठतेमुळेच इतक्या सुंदर जमून गेल्या आहेत, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यांची कविता मनातील असंख्य भाव-भावना, आशा-निराशा, तीव्र दुःखाच्या छटा, जीवनातले प्रखर वास्तव, अशा सगळ्या अनुभवांचे यथार्थ चित्रण करणारी होती. –याचे उदाहरण म्हणून, ‘ समर्थांच्या पायाशी ‘, ‘ बाळपण ‘, ‘ मांडवी ‘, अशासारख्या किती कविता सांगाव्यात ?
माझे हे जीवित, तापली कढई,
मज माझेपण दिसेचिना—
माझे जीवित, तापली कढई,
तीत जीव होई लाही – लाही ।।
—- स्वतःच्या आयुष्यातल्या प्रखर वास्तवाचे चित्रण करणारी “ लाह्या-फुले “ ही तशीच एक कविता. अशा वेगळ्याच धाटणीच्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत.
‘ प्रेमकविता ‘ ही त्यांची आणखी एक खासियत, ज्यात प्रेमाचे साफल्य आणि वैफल्य, मृत्युवरही मात करू शकणारे प्रेमाचे चिरंजीवित्व, अशा प्रेमाच्या अनेक छटा त्यांनी उत्तम चित्रित केल्या आहेत. यासंदर्भातले त्यांच्या विचारांचे वेगळेपण हे की, प्रेमाची परिणती आत्मिक मीलनात होणे ही प्रेमाची खरी परीक्षा असते हा त्यांचा विचार, आणि तो अधोरेखित करणाऱ्या— तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता.
क्रमशः….
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈