सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ ती हाक येई कानी ….. भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )
( तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता. ) इथून पुढे —-
‘एका कवितेत अनेक कविता गुंफणे,’ हे त्यांचे वाखाणण्यासारखे वैशिष्ट्य होते. ‘ एक कहाणी ‘ या कवितेत बारा कविता, ‘ चमेलीचे झेले ‘ या कवितेत तीन कविता त्यांनी गुंफल्या होत्या. या प्रकारातील एका कवितेचं उदाहरण द्यायलाच हवं असं —- ‘ एका वर्षानंतर ‘ ही ती कविता —-
ती तू दिसता हृदयी येती कितीक आठवणी ।
मम सौख्याची झाली होती तुझ्यात साठवणी ।।
— अशा प्रसन्न भावनेने सुरुवातीला प्रेम व्यक्त करणारी ही कविता —
सुहासिनी का दर्शन देशी, मी हा दरवेशी ।
समोरुनी जा, झाकितोच वा, हृदयाच्या वेशी ।।
—- असे प्रेमातील अपयशामुळे आलेले नैराश्य व्यक्त करत संपते. पण या दोन टोकांमध्ये यशवंतांनी टप्प्याटप्प्याने आठ कवितांची मालिका रचलेली आहे.— त्यांची प्रयोगशीलता दाखवणारी “ जयमंगला “ ही कविता म्हणजे २२ भावगीतांमधून हृदयसंगम दाखवणारी आणि प्रत्येक भावगीत म्हणजे एक स्वतंत्र कविता असली तरी त्यांची एकत्र गुंफलेली मालाच वाटणारी कविता तर वाचकाला थक्क करणारीच. —–इथे एक वेगळेच कवी यशवंत भेटतात.
त्यांचे सुरुवातीचे महाराष्ट्र- प्रेम बहुदा त्यांच्याही नकळत राष्ट्रप्रेमाकडे झुकले, आणि त्यांनी राष्ट्रीय वृत्ती जोपासणाऱ्या, व त्याच्या जोडीनेच सामाजिक आशयाच्याही कविता लिहिल्या. आकाशातील तारकांच्या राशी, लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन ।
पण स्वातंत्र्यलक्ष्मी तुझ्या चरणांशी लीन होईन ।।
ही स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी ‘ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा ‘ ही कविता, तसेच,सिंहाची मुलाखत, गुलामांचे गाऱ्हाणे, इशारा, यासारख्या, राष्ट्रजीवनातल्या पुरुषार्थाला जाग आल्याची भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक कविता त्या काळात खूप लोकप्रिय झाल्या होत्या.
वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती । मन्मना नाही क्षिती ।
भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी । मुक्त तो रात्रंदिनी ।।
— “ तुरुंगाच्या दारात “ कवितेतल्या, स्वातंत्र्ययोद्धयांना प्रोत्साहन देतादेता त्यांच्या बेधडक वृत्तीचे कौतुक करणाऱ्या या ओळी आवर्जून आठवाव्यात अशाच आहेत.
“ शृंखला पायात माझ्या चालतांना रुमझुमे । घोष मंत्रांचा गमे ।। —-”
अशा देखण्या ओळींमधून त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी वर्णन केले होते.
“ मायभूमीस अखेरचे वंदन “ या कवितेत मृत्यूवर मात करू शकणारी झुंझार वृत्ती दाखवून दिली होती. अशी ही इतिहासातले स्फूर्तिदायक क्षण शब्दात रेखाटणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा यासाठी भावनात्मक आव्हान करणारी, आणि निरंतर स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी– त्यांची मनावर ठसणारी कविता.
१९१५ ते ८५ या ७० वर्षांत, जीवनाचे विविध पैलू लख्खपणे उलगडून दाखवणारी विपुल काव्यसंपदा त्यांनी निर्माण केली. ‘ सुनीत ‘ या नव्या काव्यप्रकारावर आधारित स्फुट कविता, “ बंदिशाळा “ हे बालगुन्हेगारांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य, “ काव्यकिरीट “ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्याभिषेकावरचे खंडकाव्य, “ छत्रपती शिवराय “ हे महाकाव्य, “ मुठे लोकमाते “ हे पानशेत धरण- दुर्घटनेवरचे दीर्घकाव्य, “ मोतीबाग “ हा बालगीतांचा एकमेव संग्रह, — अशी सगळी त्यांची पैलूदार काव्यप्रतिभा अचंबित करणारी आहे. तुटलेला तारा, पाणपोई, यशवंती, यशोगंध, वाकळ, यशोधन, यशोनिधी, असे त्यांचे कवितासंग्रह, आणि “ प्रापंचिक पत्रे “ या नावाने ललित लेखन प्रसिद्ध झालेले आहे. हा त्यांचा सगळा काव्यप्रवास म्हणजे एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवनविकासाचा आलेख असल्याचे उचितपणे म्हटले जाते.
“ घायाळ “ ही यशवंतांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या “ Downfall of the Heart “ या दीर्घकथेचे रूपांतर आहे, आणि मूळ लेखकाची पूर्ण माहिती देणारी दीर्घ प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे.
ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते, आणि जव्हार संस्थानाचे ‘ राष्ट्रगीत ‘ त्यांनी लिहिले होते, ही एक वेगळी माहिती. १९५० साली मुंबईत भरलेल्या ३३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
कवितेने केव्हाही आणि कुठूनही हलकीशी जरी साद घातली, तरी तिच्या त्या हाकेला तत्परतेने, आणि आत्मीयतेने “ओ “ देत तिचे डौलदार स्वागत करणारे महान कविवर्य यशवंत यांना अतिशय श्रद्धापूर्वक आदरांजली.
समाप्त.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈