सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ तोरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
चैत्र पाडवा! नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस! श्री राम वनवासाहून परत आले तो हा दिवस! त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले गेले. मराठी कालगणनेनुसार चैत्र वर्षाचा पहिला महिना! रोजच्या व्यवहारात आपण इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष सुरू करतो. परंतु हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा पहिला मराठी महिना आणि नवीन वर्षारंभ सुरू होतो.
तोरण म्हंटले कि सण आठवतात. तसेच कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करताना आपण तोरण बांधतो. दसरा,दिवाळी, पाडवा, चैत्र पाडवा या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधतो. तोरण हे शुभ गोष्टींचे प्रतीक आहे.
तोरण म्हंटले की आणखी एक प्रचलित वाक्य आठवते. ‘शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले’ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. आपल्या नवीन कामाची सुरुवात करतानाही आपण तोरण बांधतो. नवीन आॅफिस, नवीन घर, नवीन कामाची जागा घेतली की तोरण बांधून मगच नवीन जागेत प्रवेश केला जातो.
पण मला आत्ता वेगळेच तोरण डोळ्यासमोर आहे! आकाशात ढग जमून आले आहेत. पावसाचा थेंब फुटला आहे. अशावेळी आकाशात सप्तरंगांची कमान दिसू लागते! जणू आभाळात सात रंगांचे सुंदर तोरण बांधले आहे असं वाटतं! ढगांचे पडघम वाजू लागतात. उंच उंच झाडे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. चराचरामध्ये चैतन्याची चाहूल लागते. दिवसभर होणारी काहिली जरा कमी होऊन दुपारनंतर आभाळ बदलू लागते. अतिशय गर्मी ओसरून एकदम कुठून तरी धुरळा उठतो. आभाळ मेघाच्छादित होते. ढगांच्या गडगडाटात पावसाची एखादी सर येते. मृदगंधा चे अत्तर दरवळू लागते आणि अशावेळी ऊन-पावसाचा खेळ चालू होऊन आकाशात सप्तरंगी तोरण दिसू लागते. जणू नवचैतन्याची सुरुवात झालेली असते.
तसे तोरणाचे विविध प्रकार आहेत. आंब्याची पानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतात म्हणून दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याची पूर्वापार पद्धत पडली असावी! झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या दोन्हीचे एकत्र तोरण आपण बांधतो. अलीकडे प्लास्टिकची झेंडूची फुले किंवा पाने असलेली मण्यांची, टिकल्यांची अशी विविध प्रकारची तोरणे मिळतात.
त्यात पानांवर स्वस्तिक, कलश, श्री, देवी अशी विविध चित्रे वापरून तोरणे बनवली जातात. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे चित्र असलेले तोरण सगळीकडे दिसते. तर साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीचे चित्र तोरणावर दिसते. दसऱ्याला विशेष करून झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते.
नवीन लेखनाची सुरुवात करून लेखक साहित्यिक तोरण बांधतो. तर राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी पक्ष कार्यालयाला तोरण बांधून सुरुवात केली जाते. तोरण शब्दावरून आज विविध प्रकारची तोरणे डोळ्यासमोर आली आणि माझ्या नवीन लेखनाचा शुभारंभ करताना मीही आज चैत्र पाडव्याला शब्द मण्यांचे, शब्द कळांचे तोरण बांधत आहे.
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈