☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

खरच नावांप्रमाणे आमचे बालपण मोरपंखी होतं. कसलेच टेंशन नाही.

दिवस भर शाळा करायची. भरपूर वेळ खेळायचे आणि उरलेला वेळ अभ्यास करायचा. थोडा अभ्यास पुरायचा कारण त्यावेळी मुलं शाळेत शिक्षक काय शिकवतात हे लक्ष देऊन ऐकायचे, कारण क्लास लावणे हे परवडत पण नव्हते आणि फॅड पण नव्हते आणि कोणत्याच शिक्षकांचा तो व्यवसाय पण नव्हता तेव्हा कोणतेच शिक्षक पैसे कमावण्यासाठी शिकवत नव्हते तर कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो त्याच प्रमाणे विद्यार्थी घडवत होते.

पोहायला शिकण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्लासला घालावे लागले नाही. आमच्या गल्लीत विजू काका म्हणुन एक काका होते त्यांनी गल्लीतल्या प्रत्येक मुलाला पोहायला आलेच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला होता. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत ते सगळ्या मुलांना पाटील विहिरीत घेऊन जायचे शिकवायला. कोणी येणार नाही म्हणायचेच नाही तर, त्यांनी प्रत्येक  मुलाला उत्तम पोहायला शिकवले. तिथे तासावर नाही तर तासनतांस डुंबत रहायचो आम्ही सगळे. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागले की यायचो घरी, डबे, ट्यूब आणि दोर हे सारे साहित्य घेऊन. कोणतीही फी न घेता आत्मियतेने शिकवणार्या माझ्या त्या काकांना माझा सलाम. नित्य नेमाने त्यांच्याबरोबर जायचे हीच त्यांची फी.

आमच्या वेळी सायकल शिकायची म्हणजे पण एकधमाल असायची. एका तासाला आठआणे भाडे देऊन आधी सायकल भाड्याने घ्यायची आणि मग गल्लीतले ताई दादा यांनी कोणीतरी सायकल शिकवायची. मला आमच्या घराच्या शेजारी सुगंधा म्हणून रहायची, तिने सायकल शिकवली. कितीदा तरी पडले, खरचटले पण धडपडत सायकल शिकले एकदा, आणि सुरुवातीला त्याला एक घंटी असते हे लक्षातच यायचे नाही. घंटी वाजवायच्या ऐवजी मी तोंडानेच सरका सरका असे म्हणायचे. आत्ता मुलांना आधी नवीकोरी सायकल मिळते मग ते चालवायला शिकतात आमच्या वेळी मात्र आधी चालवायला शिका मग सायकल मिळेल अस होतं.

गेले ते दिवस जेव्हा रणरणत्या उन्हांतही आंबे तोडतांना झाडाची सावली मिळायची, चिंचा पाडताना, नकळत आंबट चव जिभेवर रेंगाळायची, मित्र जमवून जिगळी तयार करताना न कळत आपुलकी वाढायची.

आता मुलांच्या खिश्यात असतात कॅडबरी, च्युईंगम, टाॉफी , आमच्या वेळी खिसे भरलेले असायचे  आवळा, सुपारी आणि बोरांनी. मन तृप्त व्हायचे पेरू आणि करवंदानी. चिमणीचा घास म्हणून आवळा जेव्हा तोडला जायचा तेव्हा तो ऊष्टा कोणाला वाटत नसे. कोणीतरी खिश्यातून आणलेली मीठ मसाल्याची पुडी असायची त्याला तो लावून खाल्ला की त्याची चव तर अवर्णनीय असायची. आत्ता सारखे चॉकलेट नसायचे आमच्याकडे पण खिसे लाल वाटाणे, शेंगदाणे आणि फुटाणे ह्यानी भरलेले असायचे. आत्मियतेने भरलेले हे खिसे कधी रिकामे होऊन त्याच्या जागी शिष्टाचार आला हेच कळले नाही. कोणाच्याही झाडावर चढून पेरू तोडून खाताना कधी कमीपणा वाटला नाही, ना पकडले गेल्यावर एक धपाटा खाण्यात कमीपणा, कारण त्या धपाट्यात पण आपलेपणा असायचा आणि त्या काकूही दुसरे दिवशी आमची वाट पहायच्या. हेच जर आत्ता सापडलो तर लगेच म्हणतील विचारून घ्यायचा ना मी दिला असता, पण त्यांना कुठे माहिती की चोरून पेरू तोडून खाण्यात आणि त्या आपुलकीच्या धपाट्यात किती माया दडलेली असायची ते.

पूर्वी घरचे भडंग, कांदा कैरी अस घेऊन आम्ही उद्यानात जात असू आता हीच जागा पॉपकॉर्न कुरकुरे ने घेतली. एखाद्या वेळी येताना गुर्ऱ्हाळ्यात जाऊन उसाचा रस आणि आलेपाक म्हणजे आमच्या साठी मेजवानी असायची आणि आता पिझा, बर्गर ही संस्कृती होऊन बसली.

नारळाच्या शहाळ्याची जागा कधी पेप्सी ने घेतली हे कळलेच नाही,तसेच लिंबू सरबत कधी हद्द पार झाले आणि फ्रीझ मधे कोल्ड्रिंक कधी दिमाखात सजले ते ही कळलेच नाही. कोकम सरबताची जागा मीरिंडा ने घेतली आणि फ्रेंड सर्कल चा एक भाग बनून गेली.

आमच्या बालपणी कोणत्याही मित्र, मैत्रिणींच्या घरी थेट आत प्रवेश असायचा. आत्तासारखी फोन वर अपॉइंटमेंट घ्यावी लागत नसे.

मग सुट्टीत रंगायचा आमचा पत्यांचा एक डाव, कॅरम, नाहीतर कोणाच्या तरी गल्लीत लपंडाव, लगोरी, छप्पी. आताच्या मुलांना हे खेळ माहितही नसतील, बरोबर आहे म्हणा आम्ही रिकामे होतो ते बिझी असतात मोबाईल गेम्स आणि टीव्ही कार्टून पाहण्यात. आणी चुकून बाहेर पडलेच तर मॉल मधे जाऊन डॅशिंग कार खेळतात.

मला अजून एका गोष्टीची आठवण होते. मला आठवते ती टणटण वाजणारी हातगाडी. तो आवाज आला की सगळे गोळा व्हायचे  मस्त ऑरेंज, कोला चा बर्फाचा गोळा खायला आणि मुद्दामून जीभे वर चोळून जीभ रंगवायची. गेले ते दिवस गोळ्याचे, कुल्फी चे आणि हात गाडीच्या ऑरेंज कंँडीचे.

आता मिळते ती ट्रिपल लेयर, कसाटा , मस्तानी.

पण बर्फ चोखून खाल्लेले  समाधान यात कुठे ? पावसाळ्यात ते भाजलेले कणीस नाहीतर शेंगा म्हणजे आहाहा !!!! पर्वणीच. काय आली ना आठवण तुम्हाला पण तुमच्या बालपणीची??

खरच किती आठवणी, आता आठवणीच राहिल्या नाही का?

कुठे हरवले ते दिवस जेव्हा धडपडत सायकल शिकली जायची, कोणी तरी हक्काने पोहायला शिकण्यासाठी स्वतःच्या जिवाचा आटापिटा करायचे, आणि रणरणत्या उन्हातही सुखद सावली मिळायची.आपण मनात आणले तर हेच मोरपंखी दिवस आपण आपल्या पुढच्या पिढीला ही देऊ शकू, नाही का ?

पुन्हा कोकम, पन्ह, फ्रीझ मधे विराजमान होईल, कॉल्डड्रिंक, पीझा, बर्गर हद्द पार होतील आणि घरच्या भडंगाचा आस्वाद जिभेवर पुन्हा रेंगाळेल.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?1. 9.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments