? विविधा ?

☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

दुदुंभी राक्षसाच्या उत्पातामुळे हिमवान त्रस्त झाले. तरीही शांतब्रम्ह्य अविचल राहिले. त्यांनी मानसिक शांतता ढासळू दिली नाही. निळसर पांढर्‍याशुभ्र ढगांच्या आकारांत प्रसन्नपणे हिमवान त्या राक्षसासमोर येऊन अत्यंत सौम्यपणे विचारले, “हे राक्षसा! कां त्रास देतोस मला..?”

त्यावर दुदुंभी म्हणाला, “मी असे ऐकले की, तुला आपल्या बळाची, सामर्थ्याचे फार घमेंड आहे, म्हणुन तुला युध्दाचे आव्हान देण्यास आलो आहे.”

हिमवान स्मित करीत म्हणाले, “तू चुकीच्या ठिकाणी आला आहे. मी काही युध्दकुशल, युध्दनिपुण नाही, युध्द करणे हा माझा मनोधर्मच नाही. उगीच शिलावर्षाव करुन कां मला त्रस्त करतो आहेस? अरे! मी हिमालय म्हणजे शांतीचे वसतिस्थान. तपस्यांचे माहेर आहे. तपश्चर्येचे निजधाम आहे. इथे पुण्यवंतांचे पुण्य फुलते. तुला एवढीच युध्दाची हौस आली असेल तर किष्किंधा नगरीत महापराक्रमी, महाप्रतापी वानरराज वाली राज्य करीत आहे. तोच तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

हिमवानाचे भाषण ऐकुन दुदुंभी आणखीनच चढला. हातातील गदा सांभाळीत  किष्किंधा नगरीत प्रविष्ट झाला. जोरजोरांत डरकाळ्या फोडत वालीला युध्दासाठी पुकारु लागला. पराक्रमी वालीने आव्हान स्विकारले. दोघांमधे घनघोर युध्द सुरु झाले. हळुहळू दुदुंभीची शक्ती क्षीण होऊ लागली व  वालीची शक्ती वाढू लागली. अखेर वालीने त्याला ठार केले. अजस्र राक्षस चेतनाहीन होऊन खाली कोसळला.

वाली एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अविचाराने दुदुंभीचे प्रेत उचलुन गरागरा फिरवले व एक योजनाभर  लांब भिरकावुन दिले.

दूदुंभीचे प्रेत मतंगत्रृषींच्या आश्रमावरुन पलीकडे फेकल्या गेले. त्यावेळी त्याच्या मुखातुन अंगातुन जे रक्ताचे थेंब उडाले ते सबंध आश्रमावर पडले. स्वतः मतंगत्रृषी एका शिलेवर तपश्चर्या करीत असतांना त्यांच्याही अंगावर अंगावर त्या रक्तांचे थेंब पडले.

मतंगत्रृषींची तपश्चर्या भंग पावल्याने त्यांनी डोळे उघडुन पाहिले, तर काय! त्यांच्या सर्वांगावर रक्ताचे थेंब पडले होतेच. शिवाय आश्रमभर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. ते पाहुन त्यांचा अतिशय संताप झाला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असतां, आश्रमाच्या पलीकडे त्रृध्यमूक पर्वताच्या पलीकडे एका अवाढव्य असूराचे प्रेत पडलेले दिसले.

त्रृषींनी अंतर्दृष्टीने पाहिले असतां ही सारी करामत वालीची आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याची सहनशक्ती नष्ट झाली. त्यांनी वालीला शाप दिला, “त्या दुर्बुध्दी वालीने या राक्षसाच्या रक्ताने हा आश्रम अपवित्र केला, हा पर्वत दूषित केला. जर कां त्याने या पर्वतावर पाय ठेवला तर त्याला तात्काळ मरण येईल, त्याचे जे मित्र इथे असतील त्यांनी ताबडतोब हा पर्वत सोडावा, अन्यथा त्यांना मरण पत्करावे लागेल. उद्या जो कोणी वालीचा मित्र इथे दृष्टीस पडला तर त्याचे रूपांतर होईल.”

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments