सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ विविधा ☆ त्रिकूट…भाग 1 ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
मी एक प्राणी प्रेमी. त्यातही थोडी अधिकच मार्जार प्रेमी. घरात मांजर नाही असं कधीच झालं नाही. आता सध्या आमच्याकडे तीन मांजर (आमची मुलं) आहेत. सुंदरी आणि तिची मुलगी टिल्ली या दोन मुली आणि काळूराम हा बोका. मुलगी सुंदरी आता आजी पण झाली. दोघींचीही आता कुटुंब नियोजनाची ऑपरेशन झाली आहेत.
सुंदरी नावाप्रमाणे दिसायला खूपच सुंदर अगदी दृष्ट लागावी अशी. जणू रंभा उर्वशी अप्सरांच सौंदर्य. अंगाने गुबगुबीत, भरपूर सुळसुळीत केस, जाड आणि डौलदार शेपूट, पिवळा पांढरा सगळे रंग तिच्यामध्ये मिसळलेले अशी ती मोठी झालेली कुठून तरी आली. सगळ्यांनाच आवडली. लळा लावलान आणि आमचीच झाली. स्वभावाने तर अतिशय गरीब. कधी कोणाला चावणार नाही, तर कधी रात्रभर बाहेर असलेलं दूध सांडणार नाही.ओरडण्याचा आवाज सुद्धा अगदी मृदू आणि हळुवार. एखाद्या सोज्वळ आणि शांत मुलीसारखा.खरी भूक लागली असेल तरच घातलेलं दूध पिणार.नाहीतर वास घेऊन निघून जाणार. कॅटफूड मात्र आवडीने खाणार. दुसऱ्याच्या उष्ट्या ताटलीत घातलेलं आवडत नाही. वेगळ्या ताटलीत घालायला हव. तिघांच्या मिळून सात ताटल्या आहेत. तिला काहीही नको असलं तरी ह्यांच्या मागोमाग इतकी करत रहाते की जणू ह्यांची ती बॉडीगार्ड किंवा पाठराखीणच आहे की काय असं वाटावं कोणाच्याही मांडीवर बसायला तिला फार आवडतं.
तिची मुलगी टिल्ली. .दिसायला अगदी आईसारखे रंग. पण आई सुंदरी जास्तच रुपवान. टिल्लीला पहिल्यांदाच गोजिरवाणी तीन पिल्ल झाली. खूपच लहान वयात आई झाली. पण आईची जबाबदारी छान पार पाडलीन तिनं. पिल्ल चांगल्या घरी गेली. टिल्ली म्हणजे जरा जास्तच आढ्यतेची. तिला शिळं दूध आवडत नाही. ताज हवं. .त्यातही वारणा दूध असेल तर एकदम खुश. भूक नसताना गवळ्याच दूध दिल तर वास घेऊन मानेला हिसका देऊन नाक मुरडून निघून जाते. झोपायलाही छान माऊ गाडी लागते. दिवसातला बराच वेळ गच्चीमध्ये कुत्र्यांबरोबर निवांत असते. टेबल टेनिसच्या बाल बरोबर आईशी खेळते. कधी आम्हीही तिच्याशी खेळत बसतो. तिला एकटीला खेळायला फारसे आवडत नाही. पण उचलून मांडीवर खांद्यावर घेतलेलेही तिला आवडत नाही. एखादं घरातलं शेंडेफळ कसं लाडात लाडात असतं ना, अगदी तशीच सगळ्यांशी लाडलाड करत असते. मी तर तिला नेहमी म्हणते, (किती नाटकं करतीस ग मागच्या जन्मी कुणी राणी कि राजकन्या होतीस का ग?” मी तर हिरोईनच म्हणते तिला.
काळूराम बोका शुभ्र पांढरा आणि कुट्ट काळा असे दोनच रंग आहेत त्याच्यात.नाकावर डार्क काळ्या रंगाचा मोठा ठिपका असल्यामुळे तो अगदी विदूषक का सारखा दिसतो. बोका म्हणून अंगात रग जरा जास्तच.साडेचार वर्षाच वय,तारुण्यातली मस्ती अंगात मुसमुसलेली, एखाद्या उनाड मुलासारखा. बाहेर गेला की कधीकधी दोन-तीन दिवसांनी ही परत येतो. येतो तो मित्रमंडळान बरोबर मारामाऱ्या करुनच येतो. आणि मग कुठेतरी पायाला लागलेलं असतं. नाक सुजलेला असत. मग आम्ही औषधोपचार करायचे. अस चालत हे सगळं.त्याची खाण्यापिण्याची आढ्यता, तक्रार नाही. फक्त जे खायचं ते भरपूर हव. दूध पोळी कॅटफूड व्हिसकस या सगळ्या बरोबर श्रीखंड तर त्याला फारच आवडतं बोका म्हणून उगीचच दोघींवर दादागिरी करत असतो. सुंदरीला कारण नसताना घराबाहेर हाकलत राहतो.थोड्या वेळानंतर लगेच परत येते बिचारी.तो मात्र आमच्याकडून रागावून घेतो.सकाळी सात साडेसात पर्यंत एकानंतर एक असे तिघेही येतात. त्रिकूट तयार होत.सकाळी घरातले सगळेजण उठले की कोणाला दूध दिल, कोणाला खायला दिलं कोणाला दिलं नाही अशी चर्चा सुरू होते.
या त्रिकुटा बरोबर रहाताना खरोखरच कुठलेही ताणतणाव,काळज्या,या सगळ्यांपासून आपण दूर जातो. म्हणतात ते खरंच आहे “घरात पाळीवप्राणी असले की रक्तदाबाचा बीपीचा त्रास होत नाही”. जे
सध्या काळूराम प्रकृती अस्वास्थ्यामुळे बेचैन आहे ते पुढील लेखात.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈