सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
विविधा
☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
तुलसी श्रीसखी शिवे । पापहारिणी पुण्यदे |
नमो नारायणप्रिये ! नमस्ते नारदनुते ! नमो नारायणप्रिये ||
प्रत्यक्ष श्रीकृष्णांची सखी असणाऱ्या, पवित्र, पापांचे हरण करणाऱ्या, पुण्य प्रदान करणाऱ्या, नारदाकडून स्तुती केल्या गेलेल्या, नारायणाला प्रिय असलेल्या तुळशीला प्रणाम असो—- सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा घालण्याचे वेळी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. तुळशीत असलेल्या अनेक गुणांमुळे तिच्या सानिध्यात राहण्याने मिळणाऱ्या फायद्यामध्येच या प्रथेचे मूळ असावे.
तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते | तद् गृहं नोपसर्पंति कदाचित् यमकिंकरा: ||
—-स्कंद पुराणात असा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात नेहमी तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. तिच्या मंजिरी विष्णूला अर्पण केल्या तर मोक्ष मिळतो.
….. एका कीर्तनकाराने तिची कथा सांगितली होती ती अशी……
….. एका गावात तुळशी नावाची एक काळी सावळी मुलगी रहात होती. तिची आई लहानपणीच वारली. सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची. म्हणायची, ” तू इतकी काळी. तुझे लग्नच होणार नाही.” तुळशी मोठी झाली आणि तिने एक दिवस आईला उत्तर दिले ,” पंढरपूरचा विठुराया माझ्यापेक्षा काळा आहे. तो करेल माझ्याशी लग्न.”
आई म्हणाली, ” जा मग त्याच्याकडेच. नाहीतरी तू भूमीला भार आणि खायला कहार आहेस.” तुळशी देखील रागारागाने घराच्या बाहेर पडली. पंढरपूरला आली. तिथल्या बायका तिला चिडवू लागल्या. ” अग, त्याचे रुक्मिणीशी लग्न झाले आहे, तो तुझ्याशी कसा लग्न करेल? नुसता भुईला भार आहेस.” तुळशी रात्रंदिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिली. तिने अन्न पाणी सोडले. विठुराया काही तिच्याकडे आला नाही. तिने भूमातेला वंदन केले व आर्त विनवणी केली. ” आता माझ्याने सहन होत नाही. तू मला तुझ्या उदरात घे.” आणि खरोखरच भूमाता दुभंगली. तुळशी विठ्ठल विठ्ठल करत गडप होऊ लागली. इकडे विठुरायाला ते समजले. तो धावत धावत त्या ठिकाणी आला. पण उशीर झाला होता. तुळशी गडप व्हायला लागली होती. त्याने तिचे फक्त केस दिसले तेवढे घट्ट धरून ठेवले. पण तुळशी गडप झाली. आणि विठोबाच्या हातात फक्त तिचे केस राहिले. त्याने मूठ उघडली आणि त्याच्या डोळ्यांतले अश्रू त्या केसांवर पडले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या. विठोबाने त्या आपल्या हृदयाशी धरल्या आणि तेथील जमिनीवर पेरल्या. तिथे एक झाड उगवले .त्याला सगळे तुळशी म्हणून लागले. रखुमाईला ते समजले. इकडे विठोबा सारखे तुळशी तुळशी म्हणून उदास होत होता. रखुमाईला राग आला. ती म्हणाली सारखं तुळशी तुळशी करताय. घ्या तिला गळ्यात बांधून. आणि विठोबाने देखील तुळशीचा हार तयार केला आणि आपल्या गळ्यात घातला. तेव्हापासून ती त्याच्या हृदयापाशी रहात आहे…
तुळस अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत. तिच्या बुंध्याभोवतीची काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यावर लावली तर उपयोग होतो. मधमाशीने दंश केल्यास त्या जागी तुळशीतील माती लावतात. आराम पडतो. किडा, मुंगी, डास चावल्यास पानांचा रस दंशाचे जागी लावतात. आग थांबते. तिचे खोड, मूळ, फुले आणि मंजिरी अँटिबायोटिक म्हणून वापरतात. ताप आला, घसा खवखवू लागला तर तिची पाने चघळावी. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप लावावा. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी आपोआप शुद्ध होते. फुफ्फुसे हृदय व रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानासोबत देतात. तुळशीचा रस मधाबरोबर दिला तर सर्दी पडसे नाहीसे होते. तिच्या पानांचा रस लहान मुलांना दिला तर त्यांचा खोकला बरा होतो व टॉनिकप्रमाणे उपयोग होतो. नायटा झाल्यास तिच्या पानांचा रस लावतात. तिचे बी पाण्यात पाच-सहा तास भिजवून, दूध साखर घालून खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते.
….. देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. पण देवाला वाहिलेल्या तुळशीचे निर्माल्य होत नाही. तिची पाने, फांद्या झाडापासून तोडल्या तरी तिच्यातील प्राणशक्ती जिवंत असते. तुळशीमध्ये वनस्पतीज सोने असते. धातू रूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने जास्त प्रभावी असते.
….. तुळशीला इंग्रजीत बासिल म्हणतात. हिंदीत विश्व पूजिता ,विश्व पावन, भारवी, पावनी, त्रिदशमंजिरी, पत्रपुष्पा, अमृता, श्रीमंजरी, बहुमंजरी, वृंदा ,वैष्णवी, अशी अनेक नावे आहेत. विठोबाच्या गळ्यातील तुळशीला वैजयंती म्हणतात.
….. तुळशीवरून काही वाक्प्रचार देखील आपण वापरत असतो.
१) तुळशी उचलणे म्हणजे शपथ घेणे.
२) तुळशी उपटून भांग लावणे म्हणजे चांगल्या माणसाला काढून वाईट माणसाची संगत धरणे
३) तुळशीच्या मुळात कांदा लावावा लागणे म्हणजे चांगले हेतू साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयीची सबब सांगणे.
४) तुळशीत भांग उगवणे म्हणजे चांगल्या माणसांच्या समुदायात चुकून एखादा वाईट माणूस आढळणे.
५) तुळशीत भांग व भांगेत तुळस उगवणे म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असणे.
६) तुळशीपत्र कानात घालून बसणे म्हणजे ऐकले न ऐकलेसे करून स्वस्थ बसणे.
७) घरादारावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरादाराचा त्याग करणे.
—–तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे महत्त्व प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे.
महाप्रसाद जननी
सर्व सौभाग्यवर्धिनी
आधिव्याधी हरा नित्यं
तुलसी त्वं नमोऽस्तुते ||
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈